गोव्यातून १८ हजार कोटींच्या मालाची अन्य देशांत निर्यात

१० महिन्यांतील आकडेवारी : औषध उत्पादनांची सर्वाधिक ९,२६३ कोटींची निर्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26 mins ago
गोव्यातून १८ हजार कोटींच्या मालाची अन्य देशांत निर्यात

पणजी : गोव्यातून एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या दहा महिन्यांत १८ हजार ४८१ कोटी रुपयांच्या मालाची अन्य देशात निर्यात झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग खात्याने ही आकडेवारी जाहीर केली आहे. वरील कालावधीत उत्तर गोव्यातून ८३२०.५७ कोटी, तर दक्षिण गोव्यातून १०,१६१.१२ कोटी रुपयांच्या उत्पादनाची निर्यात झाली आहे. गोव्यातून सर्वाधिक ९,२६३ कोटी रुपयांची औषध उत्पादनांची निर्यात झाली. राज्यातून झालेल्या एकूण निर्यातीत औषध उत्पादनांचा वाटा ५०.१५ टक्के होता.
यानंतर ४,१४५ कोटी रुपयांच्या अभियांत्रिकी मालाची निर्यात झाली. एकूण निर्यातीपैकी अभियांत्रिकी मालाची टक्केवारी २२.४२ इतकी होती. वरील कालावधीत राज्यातून १,२३० कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक उत्पादने, १,४०२ कोटी रुपयांची रासायनिक उत्पादने, ९१८ कोटी रुपयांची मरीन उत्पादने, ४३० कोटी रुपयांची प्लास्टिक व लिनोलेयम उत्पादने, तर १,६२२ कोटी रुपयांची अन्य मिश्र उत्पादने गोव्यातून निर्यात करण्यात आली आहेत.
याशिवाय वरील कालावधीत गोव्यातून १०.८७ कोटी रुपयांचे मसाल्याचे पदार्थ, ३१.७० कोटी रुपयांचे सिरॅमिक, तर ३.४४ कोटी रुपयांच्या हस्तकला उत्पादनांची निर्यात झाली होती. नोव्हेंबर २०२५च्या तुलनेत डिसेंबर २०२५ मध्ये अभियांत्रिकी मालासह इलेक्ट्रॉनिक, मरीन, औषध, प्लास्टिक, लोहखनिज व अन्य मिश्र उत्पादनांची निर्यात किंचित कमी झाल्याचे आकडेवारीत नमूद केले आहे.
२९१ कोटींची लोहखनिज निर्यात
वाणिज्य आणि उद्योग खात्याच्या आकडेवारीनुसार, वरील काळात गोव्यातून २९१ कोटी रुपयांच्या लोहखनिजाची निर्यात झाली. लोहखनिज निर्यातीत गोवा देशात तिसऱ्या स्थानी होता. तर ओडिशा प्रथम व कर्नाटक दुसऱ्या स्थानी होता.
काजू निर्यातीत गोवा आठव्या स्थानी
वरील कालावधीत देशातून ३,१९८ कोटी रुपयांच्या काजूची निर्यात झाली. यातील गोव्यातून १६.८२ कोटी रुपये किंमतीच्या काजूची निर्यात झाली आहे. काजू निर्यातीत गोवा देशात आठव्या स्थानी होता. वरील कालावधीत केरळमधून सर्वाधिक १,०५८ कोटी रुपयांच्या काजूची निर्यात झाली.