जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : रस्ता सुरक्षित करण्यावर भर

पणजी : शिरगाव येथील प्रसिद्ध लईराई देवीची जत्रा २१ एप्रिल रोजी होणार असून, त्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने कडक पावले उचलली जात आहेत. आरबीएल बँक ते होमकुंड दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे आणि भिंती ३ दिवसांच्या आत हटवून रस्ता सुरक्षित करावा, असे आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी शिरगावला भेट देऊन जत्रेच्या तयारीची आणि सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. होमकुंडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला काही नवीन बांधकामे झाल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. जत्रेच्या वेळी 'धोंड' आणि भाविकांची मोठी गर्दी याच रस्त्यावरून होणार असल्याने, हा रस्ता तातडीने मोकळा करणे आवश्यक आहे. रस्त्यावरील खड्डे भरून आणि अडथळे दूर करून रस्ता रुंद करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस आणि शिरगाव पंचायतीला देण्यात आले आहेत. डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी ३ दिवसांत या कारवाईचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जत्रेच्या काळात शॉर्टसर्किट किंवा वीजवाहिन्यांपासून कोणताही अपघात होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश वीज खात्याला दिले आहेत. भाविकांची गर्दी आणि वाहनांची ये-जा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. नवीन रस्ते आणि पार्किंगच्या जागेचीही पाहणी करण्यात आली.
दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी
गेल्यावर्षी शिरगाव जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे भाविकांना प्राण गमवावे लागले होते. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कडक सुरक्षा उपाययोजना राबवल्या जात आहेत. डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दररोज शिरगावला भेट देऊन कामांच्या स्थितीचा आढावा घेत आहेत. जत्रेचे व्यवस्थापन पूर्णपणे सरकारी देखरेखीखाली सुरू आहे.