‘प्रभू व्हायोलटा’तील रहिवाशांचे देवाला साकडे

प्रशासनाकडून दुर्लक्ष : दाबोळीत सकाळी पूजा, सायंकाळी क्रॉससमोर प्रार्थना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
45 mins ago
‘प्रभू व्हायोलटा’तील रहिवाशांचे देवाला साकडे

दाबोळीत पुजेसाठी जमलेले निवासी संकुलातील रहिवाशी.

वास्को : दाबोळी येथील ‘प्रभू व्हायोलटा’ निवासी संकुलातील रहिवाशांनी आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नावरून आता दैवी शक्तीचा आधार घेतला आहे. सरकारी यंत्रणा, बिल्डर आणि राजकारणी यांच्याकडे वारंवार दाद मागूनही समस्या सुटत नसल्याने रहिवाशांनी मंगळवारी सकाळी संकुलात पूजा केली आणि सायंकाळी पवित्र क्रॉससमोर प्रार्थना करून साकडे घातले.या संकुलातील पिण्याच्या पाण्यामध्ये सांडपाणी मिसळल्याने १५० जणांना अतिसारची लागण झाली होती. सदर प्रकार १३ मार्चपासून सुरू होता. लहानथोरांना अतिसाराची लागण होऊ लागल्याने तेथील रहिवाशी धास्तावले होते. याप्रकरणी रहिवाशांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस, उपजिल्हाधिकारी कार्यालय आदींना माहिती दिली होती. या सरकारी यंत्रणेने आपल्यापरिने कामे केली. मात्र, समस्या मुळापासून सुटलेली नाही.
समस्या दूर होत नसल्याने रहिवाशांनी शेवटी देवाचा आधार घेण्याचे ठरविले. त्यानुसार मंगळवारी सकाळी त्या संकुलात असलेल्या वडाच्या झाडाखाली सार्वजनिक पूजा बांधण्यात आली. तसेच सायं. ७ वा. तेथील क्रॉससमोर प्रार्थना करण्यात आली. यावेळी आमच्या सदर समस्या दूर करा, आम्हाला स्वच्छ पाणी पुरवठा होऊ दे आदी साकडे घालण्यात आले.
सध्या रहिवाशांना दैनंदिन गरजांसाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे, तर पिण्यासाठी विकतच्या बाटल्या वापराव्या लागत आहेत. दरम्यान, स्थानिकांनी किमान पिण्यालायक स्वच्छ पाणी देण्याची मागणी केली आहे.
बैठक पुढे ढकलल्याने स्थानिकांत नैराश्य
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी (दि.६) संबंधित अधिकारी आणि रहिवाशांची संयुक्त बैठक होणार होती, परंतु ती आता १३ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. वारंवार मिळणाऱ्या आश्वासनांमुळे येथील रहिवाशांमध्ये नैराश्य पसरले आहे.      
हेही वाचा