
वास्को : मुरगाव तालुक्यातील बायणा समुद्रकिनाऱ्यावर (Baina Beach) अज्ञात व्यक्तींनी वॉटर स्पोर्ट्स (Water sports) उपकरणांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसविण्याची मागणी स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका जेट स्कीच्या इंजिनमध्ये साखर टाकून ते निकामी करण्यात आले. तर दुसऱ्या ‘बनाना बंपर’ या उपकरणाला धारदार वस्तूने कापून नुकसान करण्यात आले. या प्रकारामुळे संबंधित व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटरनी बीच परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे. पर्यटकांची सुरक्षितता आणि व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून; अज्ञात आरोपींचा शोध घेतला जात आहे.