
पणजीः राज्य सरकारच्या गोवा स्टार्टअप (Goa Startup) एक्सीलरेटर उपक्रमाने एक महत्त्वाचा पायरी पार केली आहे. उपक्रमाखाली १६० पेक्षा जास्त स्टार्टअप्सनी अर्ज केले होते. त्यातील ४५ स्टार्टअप्सची निवड होऊन त्यांना मागील आठवड्यात ‘बिझनेस मॉडेल’ सुधारणे, उत्पादन-बाजारपेठेचा समावेश करणे, तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करणे, वाढ करण्याची धोरणे आणि गुंतवणूकदारांसाठी सज्जता अशा अनेक विषयांवर सत्रे घडवून आणली.
राज्याच्या स्टार्टअप परिसंस्थेला बळकट करण्याच्या उद्देशाने गोवा सरकारच्या (Goa Government) माहिती तंत्रज्ञान (Information Technology), इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्युनिकेशन संचालनालयाने स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलच्या (IT Promotion cell) माध्यमातून गोवा स्टार्टअप एक्सीलरेटर हा उपक्रम सुरू केला आहे.
१२ फेब्रुवारी २०२६ या दिवशी सुरू झालेल्या या उपक्रमात मागील ५ महिन्यांच्या काळात एक्सीलरेटर कार्यक्रम, स्टार्टअप्सना मार्गदर्शन, बाजारपेठेत प्रवेश आणि वाढीच्या संधी वाढवण्यासाठी कार्यक्रम आखले आहेत. या पायरीचा एक भाग म्हणून ३० आणि ३१ मार्च २०२६ या दिवसांमध्ये ‘डेमो डे’ झाला.
त्यात सुमारे ४१ स्टार्टअप्सनी आपले प्रकल्प सादर केले. स्टार्टअप्सनी त्यांच्या कल्पना, नविनीकरण आणि उपक्रमाच्या माध्यमातून झालेल्या विकासाविषयी माहिती दिली. सादरीकरणानंतर, पुढील पायरीसाठी २६ स्टार्टअप्सची निवड झाली. ही निवड गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांच्या एका खास ज्युरी पॅनलने केली.
या विषयी अधिक माहिती देताना माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक कबीर शिरगांवकर यांनी सांगितले की, स्टार्टअप्सना सुटसुटीत प्रक्रीया आणि सतत आधार देण्यासाठी गोवा स्टार्टअप एक्सीलरेटर राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. स्टार्टअप्सचा प्रतिसाद आणि त्यांचा दर्जा गोव्यातील युवकांमधील ऊर्जा दाखवते.