काँग्रेसचा आरजीला सल्ला : युतीवरून दोन्ही पक्षांत संबंध ताणले

पणजी येथे पत्रकार परिषदेत बोलताना अमरनाथ पणजीकर. सोबत इतर.
पणजी : आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर कलम ३९ (अ) विरोधात आपल्या प्राणांची बाजी लावून लढा देत आहेत. मात्र, अशा गंभीर परिस्थितीत आरजीपी आणि काँग्रेसमध्ये युतीवरून कलगितुरा रंगला आहे. मनोज परब यांनी सध्या वीरेश बोरकरांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, जाहीर सभांमध्ये युतीवर भाष्य करू नये, असा खोचक सल्ला काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी दिला आहे.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत पणजीकर बोलत होते. यावेळी दक्षिण गोवा काँग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा आणि उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर उपस्थित होते.
कलम ३९ (अ) विरोधात आझाद मैदानावर झालेल्या महाआंदोलनात बोलताना आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. जर युती करायची असेल तर सर्वांनी सहकार्य करावे, अन्यथा आम्ही स्वबळावर लढण्यास सक्षम आहोत, असे विधान परब यांनी केले होते. या विधानावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे.
युतीची चर्चा होते बंद दाराआड
पणजीकर म्हणाले की, पक्षाच्या अध्यक्षांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. सार्वजनिक कार्यक्रमात युतीची चर्चा होत नसते, त्यासाठी बंद दाराआड चर्चा करावी लागते. मनोज परब सध्या केवळ २०२७ च्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले आहे. जर त्यांना खरोखरच युती हवी होती, तर २०२२ मध्ये त्यांनी पुढाकार का घेतला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसचा ३९ (अ) कलमाला विरोध कायम
काँग्रेस आरजीपीच्या विरोधात नाही, परंतु त्यांच्या काही विचारधारेशी आमची मते जुळत नाहीत, असे पणजीकर यांनी स्पष्ट केले. आमची ही टीका आरजीपीविरोधात नसून मनोज परब यांच्या भूमिकेविरोधात आहे. काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने कलम ३९ (अ) च्या विरोधात असून, सरकारने हे कलम तातडीने रद्द करावे, अशी मागणी यावेळी पणजीकर यांनी केली.