ग्रामस्थांत संताप : निवडणुकीतील आश्वासने हवेत विरली

फोंडा : बेतोडा पंचायत क्षेत्रातील आशेवाडा भागात पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा बंद झाल्याने पैसे देऊन टँकरच्या पाण्याचा वापर स्थानिक लोकांना करावा लागत आहे. निवडणुकीवेळी दिली जाणारी आश्वासने पूर्ण करण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याने स्थानिक लोक संताप व्यक्त करत आहेत. त्यात समाज कार्यकर्ते शिवप्रसाद शिरोडकर यांनी स्वखर्चाने टँकरचे पाणी रमजानच्या वेळी उपलब्ध करून दिल्याने स्थानिकांनी त्याचे आभार मानले आहेत.
आशेवाडा-बेतोडा येथील लोकांना दरवर्षी पाण्याची समस्या भासते. परिसरात मोठ्या संख्येने अल्पसंख्याक लोक राहतात. घरांना नळाची जोडणी देण्यात आली असली तरी पाणी मात्र उपलब्ध होत नसल्याने स्थानिक महिलांची तारांबळ उडत असते. काही लोक स्वयंपाकासाठी पैसे देऊन टँकरचे पाणी घेऊन येतात. त्यामुळे लोकांना टँकरचे पाणी साठवून ठेवण्यासाठी खास प्लास्टिक बॅरेल्स खरेदी करावी लागत आहेत. त्याशिवाय अन्य भांडीसुद्धा खरेदी करून टँकरचे पाणी भरून ठेवावे लागत आहे. दरवर्षी पाण्याची समस्या निर्माण होते. बांधकाम खात्याकडून आठवड्यातून एक किंवा दोन वेळा टँकरने पाणीपुरवठा केला जातो. काही दिवसांपासून आठवड्यातून एकदाच टँकर येत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या समस्यांत वाढ झाली आहे.
पाण्याची समस्या सोडविण्यासाठी समाजसेवक शिवप्रसाद शिरोडकर यांनी स्वखर्चाने टँकरचे पाणी लोकांना उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. रमजानच्यावेळी पाण्याची समस्या असल्याने आशेवाडा भागात टँकरचे पाणी लोकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
बेतोडा पंचायत क्षेत्रात दरवर्षी पाण्याची समस्या निर्माण होत आहे. नळातून सुरळीत पाणीपुरवठा केला जात नसल्यामुळे लोकांना टँकरचे पाणी विकत घेऊन भरावे लागत आहे. राज्य सरकारने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने लोकांच्या समस्येची दखल घेतली नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, असे ग्रामस्थ देवेंद्र च्यारी यांनी सांगितले.
आशेवाडा गावातील लोकांना पाण्याची समस्या असल्याची माहिती मिळाल्यावर गावात टँकरमधून पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. मतदारसंघात साळावली, ओपा व म्हैसाळ या तीन धरणांचे पाणी उपलब्ध केले जाते. पण योग्य नियोजन नसल्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. सरकारने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे समाज कार्यकर्ते शिवप्रसाद शिरोडकर यांनी सांगितले.