
पणजी : बेचाळीसावा सुरश्री केसरबाई केरकर संगीत महोत्सव २८ फेब्रुवारी आणि १ मार्च दरम्यान कला अकादमी (Kala Academy Goa) येथे होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन २८ रोजी संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.
महोत्सवात स्थानिक तसेच देशभरातील नामवंत कलाकार शास्त्रीय संगीत, नृत्य सादर करणार असल्याचे कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर यांनी सांगितले. बुधवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रवीण गावकर, प्रेमानंद पोळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कवळेकर यांनी सांगितले की, काही कारणास्तव मागील तीन वर्षे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. यंदा मात्र आम्ही हा महोत्सव करण्याचे ठरवले आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर गोव्याच्या पल्लवी पाटील शास्त्रीय गायन सादर करतील.
यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता मुंबईचे भाग्येश मराठे गायन सादर करणार आहेत. १ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता गोव्याच्या शकुंतला भरणे गायन करणार आहेत. दुपारी ११.४५ वाजता छत्तीसगड येथील आर्या नांदे या ओडिशी नृत्य कला सादर करतील.
१ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता किशोर तेली आणि बुद्धेश तालकर यांच्यातील जुगलबंदी पाहण्याची संधी मिळणार आहे. संध्याकाळी ५.४५ वाजता दिल्ली येथील मीता पंडित शास्त्रीय गायन करतील. तर संध्याकाळी ७.३० वाजता मूळचे गोमंतकीय असणारे रघुनंदन पणशीकर गायन करतील.
महोत्सवात रोहिदास परब, अमर मोपकर, शैलेश गावकर, मयंक बेडेकर, उदय कुलकर्णी, सुभाष फातर्पेकर, दत्तराज सुर्लकर, दत्तराज म्हाळशी, वसंत गावकर आणि वासिम खान साथ देतील असे कवळेकर यांनी सांगितले.
लवकरच त्रुटी दूर करणार
प्रवीण गावकर यांनी सांगितले की, कला अकादमी कृती दलाने तज्ञांचा सल्ला घेतला होता. यानुसार येथील ध्वनी, प्रकाश योजना, एकोस्टिक आणि एसीमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. जून पर्यंत त्रुटी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महोत्सवात ध्वनी योजना बाहेरून मागवण्यात येणार आहे.