‘कला राखण मांड’चा आक्रमक पवित्रा; अध्यक्ष कवळेकरांशी चर्चा

कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर यांच्याशी चर्चा करताना कला राखण मांड संघटनेचे पदाधिकारी.
पणजी : कला अकादमीच्या ‘अ’ गट राज्य नाट्य स्पर्धेत झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ एफआयआर नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी ‘कला राखण मांड’ या संघटनेने केली आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्पर्धेच्या नियमांत बदल करून कला अकादमीच्या अधिकाऱ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घालावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
नाट्य स्पर्धेतील गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत कोणती कारवाई झाली, याची विचारणा करण्यासाठी कला राखण मांडच्या शिष्टमंडळाने कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर संघटनेचे अध्यक्ष देविदास आमोणकर म्हणाले की, आम्ही अध्यक्षांना कारवाईबाबत विचारले असता, त्यांनी सध्या संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, पुढील ठोस कारवाई अद्याप झालेली नाही, अशी माहिती दिली.
९ मार्च रोजी महत्त्वाची बैठक
अध्यक्ष बाबू कवळेकर यांनी या प्रकरणात कडक कारवाई करून लोकांपर्यंत स्पष्ट संदेश पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, कला अकादमीच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी आणि नव्या नियमावलीवर चर्चा करण्यासाठी ९ मार्च रोजी एक विशेष बैठक बोलावली आहे. जुने कायदे कालबाह्य झाले असून, त्यात बदल करणे गरजेचे असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
सांस्कृतिक धोरणाला धक्का
हा गैरव्यवहाराचा प्रकार आम्ही अतिशय गांभीर्याने घेतला आहे. यामुळे कला अकादमीची प्रतिमा केवळ गोव्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातही बदनाम झाली आहे. कलाकार एवढी मेहनत घेतात आणि बक्षिसे जर मागच्या दाराने दुसऱ्यालाच दिली जात असतील, तर हा आमच्या सांस्कृतिक धोरणाला बसलेला मोठा धक्का आहे, असे मत आमोणकर यांनी व्यक्त केले.
तज्ज्ञ समितीची मागणी
यावेळी ज्ञानेश मोघे यांनी सांगितले की, नाट्य स्पर्धेत अकादमीच्या कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यास बंदी घालणारा नियम पूर्वी होता, तो आता गायब झाला आहे. तो नियम पुन्हा लागू करावा. तसेच, निकालात फेरफार करण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. या समितीत राजकारणी नसावेत, तर केवळ ज्येष्ठ आणि निष्पक्ष कलाकार असावेत, अशी मागणीही मोघे यांनी केली.