१९ ते २४ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम : देशभरातून संत-महंत, अन्य मान्यवर राहणार उपस्थित

पणजी : श्री दत्त पद्मनाभ पीठाधीश्वर ब्रह्मेशानंद स्वामींच्या मार्गदर्शनाखाली गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल २०२६ या भव्य-दिव्य फेस्टिवलचे (Goa spiritual festival) आयोजन सत्गुरु फाऊंडेशनद्वारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा सरकार यांच्या सहकार्याने दि. १९ ते २४ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे.
नारीशक्तीच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या पर्वामुळे गोव्याचा आध्यात्मिक वारसा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक ठळकपणे अधोरेखित होईल.
या ऐतिहासिक सोहळ्यास अनेक महामंडलेश्वर, संत, आध्यात्मिक गुरू, जगद्गुरू शंकराचार्य, विविध पीठांचे पीठाधीश्वर, अखाड्यांचे संत-महंत तसेच शासकीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
फेस्टिवलची सुरुवात दि. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता सांगे येथे होणार असून गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल तथा संगमपूर शिव साम्राज्य समितीच्या आयोजनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी श्री संगमेश्वर पूजन, संतांच्या उपस्थितीत महाआरती, कलश यात्रा व संत आशीर्वचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता पणजी येथे ‘गोवा व्हिजन समिट’अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा व परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दि. २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ६.३० वाजता कळंगुट समुद्रकिनारी संतपूजन, योगसाधना, सामुदायिक श्री हनुमान चालीसा पठण, रन फॉर स्पिरिच्युअॅलिटी मॅरेथॉन तसेच संत सान्निध्यात समुद्रस्नान आयोजित करण्यात आले आहे.
दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता समुद्र महाआरती, रथयात्रा, सामुदायिक श्रीमद्भगवद्गीता पठण, संतपूजन व संतांचे आशीर्वचन, संगीत प्रस्तुती : गजर गोमंतक असा कार्यक्रम होणार आहे. दि. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता पणजी येथे स्पिरिच्युअल क्रूज अंतर्गत म्हादई नदी पूजन, ‘संगीत सरिता’, सत्कार सोहळा व संत सान्निध्यात नौकाविहाराचे आयोजन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला आयोजन समितीच्या अध्यक्षा नीलिमा मांद्रेकर, केंद्रीय पदाधिकारी शुभक्षण नाईक, सुवर्णलता वायंगणकर, रामचंद्र नाईक, श्रीराज शेलार, सचिन गांवकर, वेदमूर्ती साईश परब, शिवानंद नाईक उपस्थित होते.
२४ रोजी समारोप
दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता तपोभूमी येथे गोमाता पूजन, देवस्थान व संत संमेलन, सद्गुरु भक्ती महायज्ञ व ब्रह्मानुष्ठान सोहळ्याने गोवा स्पिरिच्युअल फेस्टिव्हलची सांगता होणार आहे.