पेडणे येथील श्री देवी भगवती रवळनाथ व तद् नुषंगिक देवस्थानच्या कक्षेत एकूण १२ देवस्थाने आहेत. पेडणे बाजारपेठेत असलेले हे मंदिर प्राचीन कलेतून बांधण्यात आलेे आहे. मंदिराच्या मुख्य द्वारावर दोन प्रचंड हत्ती येणाऱ्या भाविकांचे स्वागत करीत असतात.

गोमंतकाच्या उत्तरेकडे वसलेला पेडणे तालुका अत्यंत निसर्गरम्य, वनराई, तसेच माड, पोफळी व इतर बागायतींनी समृद्ध आहे. पेडणे तालुक्यातील उत्तरेला प्राचीन मंदिरेसुद्धा आहेत. श्री देवी भगवती रवळनाथ व तद् नुषंगिक देवस्थानच्या कक्षेत एकूण १२ देवस्थाने आहेत.
श्री देवी भगवती मंदिर : हे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या मुख्य द्वारावर दोन प्रचंड हत्ती येणाऱ्या भाविकांचे स्वागत करीत असतात. पेडणे बाजारपेठेत असलेले हे मंदिर प्राचीन कलेतून बांधण्यात आलेले आहे. श्री देवी भगवती हे अत्यंत जागृत देवस्थान असून, येथील नवरात्रोत्सव गोवा, महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यांत प्रसिद्ध आहे.
श्री देव रवळनाथ : श्री रवळनाथ देवाची पुनर्प्रतिष्ठापना फेब्रुवारीत झाली. जवळजवळ ६०० वर्षांनंतर पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. हे दैवतसुद्धा जागृत असून ते अनेक भाविकांचे कुलदैवत आहे.
श्री देव भूतनाथ : हे दैवत पेडणे येथील माळरानावर आहे. या ठिकाणी मारुतीची प्राचीन मूर्ती आहे. येथे वार्षिक जत्रोत्सव मोठ्या दिमाखाने साजरा केला जातो.
श्री देव मूळवीर : हे मंदिर मालपे पेडणे येथे आहे. हे श्री शंकराचे अत्यंत जागृत देवस्थान असून निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात पौराणिक अशा प्रकारचे कावीचे चित्रण आहे. या ठिकाणी बारा महिने वाहणारा पाण्याचा झरा असून हे पाणी आरोग्याला चांगले आहे.
श्री देवी माऊली : श्री देवी माऊली हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची बांधणी श्री देव मूळवीर मंदिरासारखीच आहे. या मंदिरात कावीची अत्यंत दुर्मिळ अशी कलाकृती आहे. या मंदिरासमोरही बारा महिने पाण्याचा झरा वाहत असतो. श्री देवी माऊली अनेक भक्तांची कुलदेवी असून वर्षभर भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.
श्री देवी सातेरी : श्री देवी सातेरी हे मंदिर श्री देवी भगवती मंदिराशेजारी असून हल्लीच, म्हणजे मार्च २०२५ मध्ये या देवीची पुनर्प्रतिष्ठापना झाली आहे. मंदिरात श्री देवी सातेरीची मूर्ती अत्यंत सुबक अशी आहे.
श्री द्वारपाल : हे मंदिर श्री देवी सातेरी मंदिरापासून अगदी थोड्या अंतरावर आहे. मंदिरात जवळजवळ ८ फूट उंचीची श्री द्वारपालाची मूर्ती आहे. या मंदिराचे अलिकडेच सुशोभीकरण करण्यात आले आहे.
श्री देव गौतमेश्वर : हे मंदिर पेडणे बाजारपेठेत असून शंकराचे जागृत देवस्थान आहे.
श्री देव नारायण : हे मंदिरसुद्धा पेडणे बाजारपेठेत असून श्री गौतमेश्वराच्या शेजारीच वसलेले आहे. संपूर्ण देवस्थानच्या पंचायतनातील एकमेव असे श्री भगवान विष्णूचे मंदिर आहे. येथे देवस्थानचा जत्रोत्सव होत असतो.
श्री देव हनुमान : हे मंदिर मालपे येथे असून श्री हनुमानाची मूर्ती दक्षिणाभिमुख वसलेली दुर्मीळ आहे. श्री हनुमान (मारुती) हे जागृत देवालय आहे.
श्री सतियादेवी : श्री सतियादेवीचे स्थान न्हयबाग पेडणे येथे आहे. दरवर्षी देवस्थानच्या शिमगोत्सवाला येथे हळदोणी करून सुरुवात होते व ७ दिवसांनंतर येथेच समारोप होतो.
श्री आदिस्थान : श्री आदिस्थान (मांगर) हे स्थान म्हाऊसवाडा पेडणे येथे आहे. दरवर्षी साजरा होणारा दसरोत्सव येथूनच सुुरू होतो. पौर्णिमेला येथेच दसरोत्सवाची सांगता होते. दसरोत्सवातील अत्यंत महत्त्वाचे असे स्थळ आहे. दसरोत्सवातील देवाची तरंगे येथे अश्विन शुद्ध द्वादशीला येतात व पौर्णिमा (पुनव) येथेच साजरी केली जाते. भाविकांना पौर्णिमेचा वार्षिक कौल येथेच दिला जातो.
अशा प्रकारे १२ देवालयांचे एकत्रित असे श्री भगवती रवळनाथ तद् नुषंगिक हे देवस्थान आहे.
जगन्नाथ देसाई,
सचिव, श्री देवी भगवती रवळनाथ तद् नुषंगिक देवालय समिती, पेडणे