सावर्डेचे जिल्हा पंचायत सदस्य मोहन गावकर यांचे स्पष्टीकरण

पणजी : शिवमहोत्सवाच्या वेळी पत्रकारांविषयी केलेल्या विधानाचा गैरसमज झाला आहे. पत्रकारांना दुखावण्याचा किंवा त्यांना दोष देण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. एका व्यक्तीने आमच्या कार्यक्रमाला विरोध केला होता, त्याला उत्तर देण्यासाठी मी ते विधान केले होते. जर माझ्या वक्तव्यामुळे पत्रकार दुखावले असतील, तर मी माफी मागतो, असे सावर्डेचे जिल्हा पंचायत सदस्य मोहन गावकर यांनी म्हटले आहे.
साकोर्डा येथे माहिती आणि प्रसिद्धी खात्याने आयोजित केलेल्या शिवमहोत्सवाच्या व्यासपीठावरून गावकर यांनी एका पत्रकारावर आरोप केल्यानंतर गोव्यातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण देताना गावकर बोलत होते.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि मी भाजप एसटी मोर्चाचा अध्यक्ष असल्या कारणाने मला प्रत्येक वेळी पत्रकारांची गरज भासते. त्यामुळे त्यांना दुखावून राजकारण करण्याचा माझा उद्देश नाही.एक ठराविक व्यक्ती आमच्या धर्मावर किंवा आम्ही करत असलेल्या कार्यक्रमांवर टीका करू इच्छिते. समाजातील जे लोक तिकीट काढून कार्यक्रम पाहू शकत नाहीत, त्यांच्यासाठी सरकार पैसे खर्च करून कार्यक्रम आयोजित करते. अशा वेळी एखादी व्यक्ती आरोप करून तो कार्यक्रम रद्द करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा लोकांना वाईट वाटते. या गोष्टीमुळे आमचा एसटी समाज दुखावला गेला होता आणि मी मोर्चाचा अध्यक्ष असल्यामुळे त्यांना उत्तर देणे माझे कर्तव्य होते, असे गावकर यांनी सांगितले.
- मोहन गावकर, जिल्हा पंचायत सदस्य