श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण, फातर्पा

फातर्पा हे स्थळ गोमंतकाच्या धार्मिक नकाशावर तेजाने झळकत आहे. त्याचे कारण इथे वसलेली श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवी. गोमंतकाच्या रक्षणासाठी ती उभी आहे. कुंकळ्ळीच्या इतिहासात श्री शांतादुर्गा देवीचे मंदिर हे धर्मसंरक्षण, संस्कृतीची पुनर्स्थापना आणि लोकएकतेचे प्रतीक आहे.

Story: देवभूमी गोवा |
16th February, 11:59 pm
श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण, फातर्पा

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवी हे गोमंतकाचे श्रद्धास्थान आहे. देवीवरील भक्तिभाव फक्त हिंदूंमध्येच नाही, तर अनेक ख्रिस्ती बंधू-भगिनींमध्येही आढळतो. तिला ख्रिस्ती लोक ‘मामाई सैबिन’ म्हणून संबोधतात. देवीची महिमा अगाध आहे. ती भक्ताच्या हाकेला ‘ओ’ देते, नवसाला पावते. अनेकांना स्वप्नात दर्शन देऊन मार्गदर्शन करते. कधी कधी ती स्वप्नातच भक्तांकडून वस्त्र, दागिने किंवा अन्य वस्तूंची मागणी करते. अशा वेळी मंदिरात ‘प्रसाद कौल’ लावून देवीच्या इच्छेची खात्री केली जाते. त्या विधीनंतरच ती वस्तू देवीला भक्तिभावाने अर्पण केली जाते. याच प्रथेमुळे तिचे ‘मागणीची देवी’ हे नावही प्रसिद्ध झाले आहे.

पोर्तुगीजांच्या धर्मछळाला कंटाळून भक्तांकडून मूर्तीचे फातर्पा येथे स्थलांतर

प्रारंभी श्री शांतादुर्गा देवी कुंकळ्ळी गावात होती. कुंकळ्ळी गाव प्राचीन काळी सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र होते. येथे अनेक मंदिरे होती. सोळाव्या शतकात पोर्तुगीज राजवटीतील धार्मिक अत्याचार आणि धर्मांतर मोहिमेमुळे गोव्यात मोठ्या उलथापालथीचा काळ सुरू झाला. कुंकळ्ळीतील हिंदूंनी धर्मछळाला ठाम विरोध केला. यालाच ‘१५८३ चा कुंकळ्ळी उठाव’ असे म्हणतात. या उठावाचे नेतृत्व कुंकळ्ळीच्या १७ महानायकांनी, देवीच्या महाजनांनी केले. हा उठाव गोव्याच्या इतिहासातील पहिला सशस्त्र स्वातंत्र्य संघर्ष म्हणून ओळखला जातो. पोर्तुगीजांच्या विध्वंसापासून रक्षण करण्यासाठी १५८३ साली देवीच्या आणि इतर देवतांच्या मूर्तींचे गुप्तपणे फातर्पा येथे स्थलांतर करण्यात आले. आजही ती ‘श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण’ म्हणूनच ओळखली जाते. कुंकळ्ळीतून स्थलांतरित झालेली श्री शांतादुर्गा !

महाजनांची प्राचीन परंपरा

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्थानचे आद्य संस्थापक आणि महाजन हे कुंकळ्ळी गावातील क्षत्रिय मराठा समाजातील शहाण्णव कुळातील मराठे (नाईक देसाई) मानले जातात. महाजनांची परंपरा अत्यंत प्राचीन असून, त्यांचे महाजनपद ‘बारा वांगडी’ व्यवस्थेमध्ये सामावलेले आहे. हे बारा वांगडी म्हणजे म्हाल, शेटकार, नाईक, मांगरो, सोंबरो, थोंबडो, पोरोब, सिद्धकाली, लोककली, बांदेकार, रोवणो आणि भेकलो. या सर्व वांगडातील कुटुंबांना एकत्रितपणे ‘गावकार’ असे संबोधले जाते. या परंपरेमुळे देवस्थानातील धार्मिक विधी भक्तिभावाने आणि परंपरेचा आदर राखून चालत आले आहेत.

मंदिराचा पहिला जीर्णोद्धार १८२२ मध्ये, तर दुसरा १९८९ मध्ये

कुंकळ्ळीतून फातर्पा येथे देवीचे स्थलांतर झाल्यानंतर श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवालयाचा प्रथम जीर्णोद्धार इ.स. १८२२ (शके १७४४) मध्ये करण्यात आला. त्या काळात बांधलेले देवालय दीडशे वर्षांहून अधिक काळ टिकूनही देखणे आणि भव्य दिसत होते. मात्र कालांतराने मंदिराचे पुनर्निर्माण आवश्यक बनले. पुनर्स्थापनेच्या वेळी गर्भगृह आणि देवालय यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी इ.स. १९७४ ते १९७७ या कालावधीत नव्या मंदिराचा आराखडा आणि प्रतिकृती तयार करण्यात आली. इ.स. १९८५ मध्ये बांधकामास अधिकृत प्रारंभ झाला. दैनंदिन धार्मिक विधींना व्यत्यय न आणता हे कार्य चालू राहिले. मार्गशीर्ष वद्य नवमी, शके १९१०, रविवार, १ जानेवारी १९८९ रोजी देवीची पुनर्प्रतिष्ठापना उत्साहात पार पडली.

सर्वांत उंच शिखर आणि दीपस्तंभ

आजचे मंदिर हे आधुनिक आणि पारंपरिक शिल्पकलेचा सुंदर संगम मानले जाते. त्याचे शिखर हे गोव्यातील मंदिरांतील सर्वांत उंच शिखर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या प्रांगणात नव्याने उभारलेला दीपस्तंभ वास्तुशिल्पाच्या दृष्टीने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. आधुनिक रचना आणि पारंपरिक सौंदर्य यांचा सुंदर मेळ या दीपस्तंभावर दिसून येतो. दीपस्तंभाची उंची ७८ फूट असून, दक्षिण भारतातील या प्रकारातील तो सर्वांत उंच दीपस्तंभ मानला जातो. धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांचा संगम साधणारा हा दीपस्तंभ एक अप्रतिम शिल्पकृती आहे. फाल्गुन शुद्ध सप्तमी, शके १९३१ अर्थात रविवार, २१ फेब्रुवारी २०१० रोजी या दीपस्तंभाचे धार्मिक विधी करून उद्घाटन झाले. आज हा दीपस्तंभ फक्त श्रद्धेचे प्रतीक नाही, तर फातर्पा मंदिराचे एक प्रमुख पर्यटन आकर्षणही आहे.

अत्यंत भव्य महाद्वार

मंदिराचे महाद्वार उंच कमानीसह अत्यंत भव्य आणि शोभिवंत आहे. कमानीवर कोरलेल्या देवतांच्या मूर्ती, सुबक नक्षीकाम आणि लाकडी कोरीव तपशील यामुळे प्रवेशद्वार पाहताक्षणीच भक्ताचे मन प्रफुल्लित होते. या महाद्वाराचे उद्घाटन पौष शुद्ध पंचमी, शके १९२२ अर्थात शनिवार, ३० डिसेंबर २००० रोजी धार्मिक विधीपूर्वक पार पडले. महाद्वारातून आत येताच काही पावलांवरच श्री शांतादुर्गेचे भव्य मंदिर दृष्टीस पडते.

चतुर्भूज रूपातील देवीची मूर्ती

मंदिराच्या गर्भगृहात उंच स्थानावर श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीची चतुर्भूज मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या वरच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे, तर वरच्या डाव्या हातात पद्म (कमळ) आहे. खालच्या दोन हातांतून देवी शुभाशीर्वाद व अक्षयवचन देताना दिसते. देवीच्या सभोवती कोरलेल्या नक्षीकामाने सजलेला चांदीचा मंडप अप्रतिम आहे. पाठीमागील चांदीची प्रभावळही अत्यंत आकर्षक असून तिच्या सूक्ष्म कोरीव कामातून भक्तिभाव जागृत होतो.

महिषासुरमर्दिनी रूपातील मूळ प्राचीन पंचधातूचा विग्रह

मुख्य स्थानाच्या चौथऱ्याखाली देवीचा मूळ प्राचीन पंचधातूचा विग्रह प्रतिष्ठापित आहे. ही मूर्ती महिषासुरमर्दिनी रूपातील असून षड्भुजा स्वरूपात आहे. मधल्या दोन हातांत ढाल व तलवार, तर खालच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे. देवीच्या पायाशी मर्दन झालेला महिषासुर दर्शविला आहे. हे दर्शन म्हणजे देवीच्या शौर्य, करुणा आणि शक्तीचा एकत्र अनुभव होय.

देवीच्या उजव्या बाजूस काळ्या पाषाणातील खंडेरायाची मूर्ती

मंडपाच्या दोन्ही बाजूला वरून खाली झुंबराप्रमाणे दीपमाळा लोंबकळत आहेत. दिव्यांच्या प्रकाशात चमकणारा चांदीचा मंडप आणि त्यात विराजमान असलेली शांतादुर्गा देवी हे दृश्य अत्यंत मनोहर आणि भक्तिभाव जागवणारे आहे. देवीच्या उजव्या बाजूला काळ्या पाषाणातील खंडेरायाची मूर्ती उभी आहे. शुभ्र धोतर व उपरणे परिधान केलेल्या या मूर्तीचे शांत आणि भक्तीपूर्ण रूप श्री शांतादुर्गेकडे एकाग्र दृष्टीने पाहत असल्याचा भास निर्माण करते. श्री देवी वस्त्रालंकारांनी अलंकृत होते, तेव्हा तिचे रूप अपूर्व तेजस्वी आणि मोहक भासते. तिच्या सौंदर्यदर्शनाने भक्ताचे मन श्रद्धा, आनंद आणि भक्तिभावाने भरून येते.

देवालयाच्या परिसरातील मंदिरे

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवालयाच्या उजव्या बाजूला श्री महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर परिसराला एक दिव्य आणि संतुलित आध्यात्मिक वातावरण प्रदान करते. देवालयाच्या प्राकाराच्या बाहेर दोन मिनिटांच्या अंतरावर ‘आकार उदेगीचे’ एक लहानसे टूमदार मंदिर आहे. या मंदिराची रचना साधी असली तरी तिच्यातील भक्तिभाव आणि कलात्मकता मनाला स्पर्शून जाते. देवालयाच्या परिसरात पंचायतन दैवते आहेत. त्यात श्रीसत्पुरुष, श्री सिद्धपुरुष, श्री सिद्धदेव, श्री गोळचो पाईक, श्री राम अवतार, श्रीकृष्ण अवतार, श्री नारायण देव, श्री रामनाथ देव, श्री सांतेरी देवी, श्री नवदुर्गादेवी, श्री घोड्यापाईक, श्री मूळ पूर्वा, श्री चक्र आणि सिडियांचा खेत्री अशी सहपरिवार दैवते आहेत.

मंदिरातील उत्सव

रंगपूजा : दर रविवारी श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्थानात रंगपूजा व पालखी सोहळा होतो. श्री खंडेरायाची उत्सवमूर्ती अलंकार करून पालखीत विराजमान केली जाते. ती पालखी देवालयाच्या सभोवार प्रदक्षिणा करते.

जत्रोत्सव : वार्षिक जत्रोत्सव पौष शुक्ल पंचमीपासून प्रारंभ होतो. पौष शुक्ल दशमीपर्यंत विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. उत्सवाच्या काळात देवीची अंबारी मिरवणूक, फुलांची शोभायात्रा, विजयरथ सोहळा आणि शेवटच्या दिवशी पहाटेची महामहोत्सवी रथयात्रा हा उत्सवाचा परमोच्च क्षण असतो. हजारो भक्त देवीचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून येतात.

रंगपंचमी : रंगपंचमीचा उत्सव फाल्गुन वद्य पंचमीला साजरा होतो. दुपारी दीड वाजता फातर्पे येथून श्री शांतादुर्गेची पालखी निघते. बारा वांगड्यांच्या बारा सुशोभित छत्र्यांसह ही मिरवणूक गोविंदाघाटी व भिवसा मार्गे तळेभाट कुंकळ्ळी या देवीच्या मूळ स्थानाकडे येते. हा सोहळा देवीच्या मूळ स्थानाशी असलेले नाते दृढ करणारा असतो.

नवरात्री : नवरात्रीत मखरोत्सव साजरा केला जातो. पंचमीपासून नवमीपर्यंत श्री देवी मखरात विराजमान राहते व भक्तांना दर्शन देते. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी ४ वाजता श्री शांतादुर्गेची पालखी सीमोल्लंघनासाठी मंदिराबाहेरील पठारावर प्रस्थान करते. तेथे आपट्याच्या झाडाची पूजा केली जाते. त्यानंतर ‘सोने लुटणे’ हा पारंपरिक विधी पार पडतो आणि देवीची पालखी मिरवणुकीसह मंदिरात परतते.

काळाच्या ओघातही ही परंपरा अखंड राहावी, आणि देवीचा कृपाकटाक्ष सर्व भक्तांवर राहो, हीच अखंड प्रार्थना !

अभिदीप विष्णू नाईक देसाई