फोंडा : कुर्टी क्रीडा संकुलाला रवी नाईक यांचे नाव

सहा महिन्यांच्या बसवणार रवी नाईक यांचा अर्धपुतळा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th February, 11:35 pm
फोंडा : कुर्टी क्रीडा संकुलाला रवी नाईक यांचे नाव

फोंडा : कुर्टी येथील क्रीडा संकुलाचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक (Ravi Naik) क्रीडा संकुल असे नामकरण करण्यात आले. सोमवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, कला मंदिरचे अध्यक्ष तथा नगरसेवक रितेश नाईक, सरपंच नावेद तहसीलदार, जिल्हा पंचायत सदस्य प्रितेश गावकर, नगरसेवक रॉय नाईक, विश्वनाथ दळवी, हरीश नाईक, आनंद नाईक, रूपक देसाई आदी व्यासपीठावर होते.
मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले की, रवी नाईक यांनी राजकारणाबरोबर क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात चांगले योगदान दिले आहे. त्यांचा हा वारसा युवा पिढीसाठी आदर्श ठरावा, याच हेतूने या क्रीडा संकुलाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. येत्या वर्षभरात या संकुलाचे नूतनीकरण करून सहा महिन्यांच्या आत तिथे रवी नाईक यांचा अर्धपुतळा बसवण्यात येईल.
क्रीडामंत्री रमेश तवडकर म्हणाले की, बहुजन समाजाच्या हितासाठी शेवटपर्यंत लढलेला असा संवेदनशील नेता म्हणून रवी नाईक यांचे नाव सदैव स्मरणात राहणार आहे. फोंडा परिसरातील शैक्षणिक क्रांती करताना एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय आजही राज्याच्या हितासाठी काम करत आहेत. गोव्याला पुढे नेण्यासाठी युवकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे.
क्रीडा खात्याचे संचालक अजय गावडे यांनी स्वागत केले, तर सरपंच नावेद तहसीलदार यांनी आभार मानले.
..
क्रीडाप्रेमी व्यक्तीचा खराखुरा सन्मान!
कुर्टी संकुलाला रवी नाईक यांचे नाव दिल्याबद्दल संपूर्ण फोंडावासीयांच्या वतीने व आमच्या कुटुंबीयांच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री व सरकारचे आभार व्यक्त करीत आहोत, असे नगरसेवक रितेश नाईक म्हणाले. एका क्रीडाप्रेमी व्यक्तीचा खराखुरा सन्मान आज सरकारने केला असल्याचे त्यांनी सांगितले.