पणजीत ओल्या काजुगराचा वाटा ४०० रुपयांना

कांदे, बटाटे स्वस्त : लसूण, ढब्बू मिरची, भेंडीच्या दरात वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th February, 11:29 pm
पणजीत ओल्या काजुगराचा वाटा ४०० रुपयांना

पणजी : पणजी बाजारात सध्या ओल्या काजुगरांची (बिबे) (raw cashew nut) आवक सुरू झाली आहे. या काजुगरांच्या एका वाट्याची किंमत ४०० रुपये इतकी आहे.
त्यासोबतच बाजारात कैऱ्यांची आवकही वाढली असून, १०० रुपयांना ६ नग या दराने कैऱ्या विकल्या जात आहेत. विशेष म्हणजे, ६ हजार रुपये डझन दराने विकला जाणारा मानकुराद आंबा सोमवारी बाजारातून गायब झाला.

कांदा आणि बटाट्याचे दर ५० रुपयांवरून ४० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. लसणाच्या दरात मात्र १०० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारात लहान लसूण ४८० रुपये, तर मोठी लसूण ६०० रुपये प्रति किलो दराने आहे. ढब्बू मिरचीच्या दरात वाढ होऊन ती दर्जानुसार १०० ते १२० रुपये झाली आहे. भेंडीच्या दरातही २० रुपयांची वाढ झाली असून, सध्याचा दर १०० ते १२० रुपये प्रति किलो आहे.

मेथीची एक जुडी २५ रुपये, पालक, कांद्याची पात प्रत्येकी १५ रुपये जुडी, शेपू २५ रुपये, तर कोथिंबीरची जुडी २० रुपयांना एक होती. नारळ आकाराप्रमाणे ३० ते ५० रुपये प्रति नग या दराने होता.

शेवग्याच्या शेंगांची अद्याप टंचाई

शेवग्याच्या शेंगा अजूनही महागच असून १०० रुपयांना ५ शेंगा मिळत आहेत. आले २०० रुपये किलो, टोमॅटो ४० रुपये किलो, मटार आणि गाजर प्रत्येक ८० रुपये किलो, फ्लॉवर ५० रुपये नग, तर कोबीचे दर ४० रुपये किलो होते. वांगी ६० ते ८० रुपये किलो, वालपापडी ८० ते १२० रुपये किलो, काकडी ८० रुपये, तर मिरची १२० रुपये किलो होती.