रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणात गोवा देशात शेवटच्या स्थानी

राज्यात ९१ टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th February, 11:33 pm
रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणात गोवा देशात शेवटच्या स्थानी

पणजी : गोवा राज्यात (Goa) ९१ टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण (electrification of railway route) झाले आहे. विद्युतीकरणाचे हे प्रमाण मोठे असूनही रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणात गोवा राज्य देशात शेवटच्या स्थानावर आहे. प्रकल्प स्थळावर होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या घटना हे विद्युतीकरणाला विलंब होण्यामागचे एक कारण असल्याचे रेल्वे मंत्रालयाने दिले आहे.

रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. वर्ष २०१४ पर्यंतच्या ६० वर्षांच्या काळात २१,८०१ किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले होते. परंतु, २०१४ ते २०२५ या काळात ४६,९०० किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

देशातील एकूण ३० राज्यांमध्ये रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. आतापर्यंत ३० पैकी २५ राज्यांमध्ये हे काम पूर्ण झाले असून ५ राज्यांमध्ये अद्याप काम बाकी आहे. गोवा राज्य ९१ टक्के विद्युतीकरणासह सर्वांत शेवटी म्हणजे तिसाव्या स्थानावर आहे. तर राजस्थान ९९ टक्के, आसाम ९८ टक्के, तामिळनाडू ९७ टक्के आणि कर्नाटक राज्यात ९७ टक्के रेल्वे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण विविध घटकांवर अवलंबून असते. यामध्ये वन खात्याकडून मिळणारा दाखला, अडथळा ठरणाऱ्या गोष्टींचे स्थलांतरण, विविध अधिकाऱ्यांकडून मिळणारे वैधानिक दाखले, प्रकल्प स्थळावर निर्माण होणारे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आणि हवामानाची स्थिती यामुळे विद्युतीकरणाच्या कामावर परिणाम होतो.

कोकण रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण
गोवा राज्य कोकण रेल्वे आणि दक्षिण-पश्चिम रेल्वे क्षेत्रात येते. कोकण रेल्वेची सेवा पेडणे ते काणकोणपर्यंत आहे, तर दक्षिण-पश्चिम रेल्वे वास्को ते कुळे दरम्यान सेवा देते. गोव्यातील कोकण रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे, तर दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या विद्युतीकरणाचे ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे.

दुपदरीकरणाला विरोधामुळे विद्युतीकरण रेंगाळले
दक्षिण-पश्चिम रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठी वेळसाव आणि चांदोर येथे तीव्र विरोध झाला होता. तिथे स्थानिक आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी स्थानिकांवर गुन्हे देखील नोंदवले होते. दुपदरीकरणाच्या कामामुळे दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम रेंगाळले आहे.