चांगुणेच्या मनासारखे घडून आले. ती आता उतणार मातणार तर नाही ना? असे भय कदाचित देवाला वाटले असावे. तिच्या भक्तीवर ते प्रसन्न होते.आता तिचे कार्य सिद्धीस आले तर ती देवाला विसरू शकते म्हणून ही कदाचित अशी कठीण परीक्षा त्यांनी घेतली असावी. चांगुणा त्यांनी घेतलेल्या सत्वपरिक्षेत खरी उतरली.

न्याया सवळा गे न्यायाच वस्तूर
न्याया सवळ्याची गे झोळी शिवली
हाती घेतला पात्र खाकी रायली झोळी
हिंडता फिरता गेले चांगुने वाड्यार
घरात कोण गे नारी.. आम्हा धरम वाढा
पाच मुठी साळी गे पाच मुठी दाळी
घातले सुपावरी
नार ती गेली गे धरम वाढूक
तसला धरम आम्हा नको नारी
चिलया बाळाक दी भोजनाक...
अंगाला भस्म, काखेला झोळी, गळ्यात माळा असा एक जोगी भक्त चांगुणाच्या घरी येतो. खरंतर त्याला तिची सत्त्वपरीक्षा घ्यायची असते. तिच्या भक्तीची ती परीक्षा असते. चांगुणा भगवान शंकराची भक्ती करायची. तिला मुलबाळ नव्हते. भोलेनाथांच्या कृपाशीर्वादानेच तिला
पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव ठेवले चिलया. चांगुणा आणि चिलयाची कहाणी लोकपरंपरेने फुगडीगीते, जत, कहाणी, गावनकाणी अशा विविध प्रकारानी हाताळली आणि याच माध्यमातून त्या अभिव्यक्त झाल्या. चांगुणा नारीची परीक्षा घेण्यासाठी साक्षात भगवान शंकर वेष बदलून येतात. भर दुपारी जेवण करून वाढायचा आग्रह धरतात. दरवाजावर जोगी आलेला पाहून त्याला धरम वाढण्याची तयारी चांगुणा नारी करते. पाच मुठी साळी, पाच मुठी डाळी असे धान्य वाढण्यासाठी ती बाहेर येते खरी, परंतु
असला धरम आम्हा नको नारी
चिल्लया बाळाक दी भोजनाक
काणून कुटून मच्छार रानून
दी आम्हा गा भोजनाक
चांगुणा कळवळली. एकूलता एक मुलगा नवसाने झालेला भगवान शंकराची कृपा म्हणून ह्या मुलाचा जन्म झाला होता आणि तोच मुलगा इथे धरम मागण्यासाठी आलेल्या गोसाव्याला हवा होता. चांगुणा भयभीत झाली तिच्या काळजात धस्स झाले. आता करायचे तरी काय? हा प्रश्न तिला सतावू लागला. भर दुपारी घरी धरम मागायला आलेल्या गोसाव्याला विन्मुख पाठवले, तर त्याचा कोप घेणार आणि त्याच्या मागणी प्रमाणे जर स्वताच्या मुलाचा वध करून त्याचे मच्छार रांधून वाढले, तर पुढे जीवन जगून तरी काय फायदा? ती तळमळली कळवळली. तिच्या काळजात वेदनेची एक तीव्र कळ उमटली. तिची ही अशी झालेली अवस्था तो गोसावी पाहात होता. त्याला तिची अजिबात दयामाया येत नव्हती.
एक माझा तान्हा गा बाळ
कशी मी वधू माझ्या बाळाक
तिने बळ एकवटले. मनोमन देवाचा धावा केला आणि चिलयाला हाक मारली. आईच्या हाकेने बाळ धावत पळत घरी आले.
मातेन धरीले गे पित्यान वधीले
शीर गे काढून थेयला शिक्यांवरी
मधल्या लुणाचा मस्य रानीला
उठा गा गुरुबाबा भोजन करा
तसला भोजन आम्हा नको नारी
शीर कांडूनी मत्स्यार गे करा
गोसाव्याच्या या मागणीने चांगुणा नार पूर्णपणे कोलमडून गेली. ती ढळढळा रडू लागली. रडत रडतच तिने शिंक्यावर ठेवलेले चिलयाचे शीर काढले. ते वायनात घातले. वरून मुसळाचे जसे धाव पडू लागले, तसतसे आईच्या काळजाचे तुकडे तुकडे होत होते. तिच्या काळजातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.
चिलयाची आई गे घळघळा रडे
वरसून घालता मुसळाचे घाई
आकांत करी गे चिलयाची आई
कांडूनी कुटूनी मत्स्यार रानीला
उठा गा गुरुबाबा भोजन करा
आता मात्र गोसावी आनंदाने उठला. त्याने एकवार चांगुणाकडे कटाक्ष टाकला. त्यांच्या डोळ्यात अथांग करूणा भरली होती. पाने वाढायला घेतलेल्या चांगुणा नारीला आदेश दिला...
“करा गे चार ही पाना” असे सांगितले. त्यावर ती गोसाव्याला विचारू लागली, चार पाने कोणासाठी वाढायची गुरुबाबा? गुरुबाबानी तिला सांगितले..
चिलया बाळ म्हणून हाकशी मारा
चांगुणा नारीन हाक शी मारली
धावून चिलया बाळ तो आला
आईच्या मिरीयांक गोंधळला
तू खय होतंय बाळा
गेललंय गे गुरूच्या मठा
धावता पळता पडलंय माते
साद आयकान धावत इलंय...
फुगडी गीतातून गुंफली गेलेली ही भक्त चांगुणा आणि चिलया बाळाची कहाणी. सुरुवात कारुण्याने भरलेली. पण शेवट गोड होतो. चांगुणेची सत्व परीक्षा अशी कठोर पद्धतीने घेतली जाते की तिच्यासाठी ती जीवघेणी ठरते.
लोकपरंपरेत नैतिक मूल्यांची रुजवण करण्यासाठी, भक्तीचे महात्म्य अधोरेखित करण्यासाठी, पातिव्रत्याची सत्त्वपरीक्षा घेण्यासाठी अशीच अघोरी कृती करावी लागते. याची अनेक उदाहरणे आपल्याला अनुभवता येतात. आजच्या विज्ञान युगात अशी कृती आपल्याला पटणार नाही. दुष्ट आणि सुष्ट शक्तींच्या झगड्यात नेहमीच सुष्ट व्यक्तीचाच विजय होत असतो. ही परंपरेची धारणा होती. पतीशी एकनिष्ठ असलेली स्त्री कुठलेही दिव्य करायला मागेपुढे पाहात नसे. तसेच ज्या गुरूने आपल्याला ज्ञान दिलेले आहे त्या गुरूने गुरुदक्षिणा म्हणून प्राण जरी मागितले तरीही शिष्य तत्परतेने त्यांची आज्ञा मान्य करीत असत. चांगुणेची अशीच सत्त्वपरीक्षा घेण्यात आली होती. भगवान शंकराच्या कृपाशीर्वादाने चांगुणेला नवससायाने पुत्रप्राप्ती झाली होती. चांगुणेच्या मनासारखे घडून आले. ती आता उतणार मातणार तर नाही ना? असे भय कदाचित देवाला वाटले असावे. तिच्या भक्तीवर ते प्रसन्न होते.आता तिचे कार्य सिद्धीस आले तर ती देवाला विसरू शकते म्हणून ही कदाचित अशी कठीण परीक्षा त्यांनी घेतली असावी. चांगुणा त्यांनी घेतलेल्या सत्वपरिक्षेत खरी उतरली. चांगुणेचा देवावर विश्वास होता. त्याचे फलित तिला मिळाले. लोकपरंपरेत मालनींनी या कथेला स्वतःचे एक वेगळे रूप दिले. आपण खरे असलो, प्रामाणिकपणे वागलो तर आपले भलेच होणार ही नैतिकतेची शिकवण कदाचित या निमित्ताने समाजमनाला द्यायची असेल...

- पौर्णिमा केरकर