जादुई अंगठी - भाग -२

मागच्या भागात आपण वाचले, ​व्यापाऱ्याच्या दोन मुलांनी व्यापारात प्रगती केली, पण तिसऱ्याने तीन रुपयांत प्राणी वाचवल्यामुळे वडिलांनी त्याला घराबाहेर काढले. जीवदान मिळालेल्या सापाने कृतज्ञतेने त्याला दिव्य अंगठी मिळवण्यासाठी आपल्या तपस्वी वडिलांकडे जाण्यास सांगितले. आता तो मुलगा निस्वार्थी सेवेचे फळ मिळवण्यासाठी नदीकाठच्या वारुळापाशी पोहोचला आहे.

Story: भरजरी |
18th April, 11:19 pm
जादुई अंगठी - भाग -२

​मुलगा नदीकाठी गेला. नदीकाठी त्याला वारूळ दिसले. त्याला जागेची खूण पटली. भल्या पहाटे मुलगा वारुळाजवळ गेला. वारुळाजवळची सगळी जागा साफ केली. नदीचे पाणी आणून ती जागा चांगली शिंपली. त्यावर शेण-मातीचा काला करून ती जागा सारवून घेतली. चंदनाची लाकडे जाळून त्यावर धूप घातला. चंदनाच्या आणि धुपाच्या सुगंधाने ती जागा घमघमून गेली. आजूबाजूची रानफुले आणून तो परिसर सजवला.

​पहाटे वारुळातून तपस्वी साप अंघोळीसाठी बाहेर निघाला. त्याला ही सगळी व्यवस्था दिसली. सापाला फार आनंद झाला. आनंदाने त्याने पुकारले, “ज्या कोणी हे धूप-दीप लावून इथे घमघमाट केला आहे, त्यामुळे मी फार प्रसन्न झालो आहे. तेव्हा जो कोणी असेल त्याने माझ्यासमोर यावे आणि आपल्याला हवा तो वर मागावा.”

​हे शब्द ऐकताच मुलगा सापासमोर आला. “मुला, तुझ्या या सेवेने मी प्रसन्न झालो आहे. पण माझी अशा प्रकारे सेवा करावी हे तुला कोणी सुचवले? कारण माझ्याबद्दल कोणालाच माहिती नाही.” त्यावर मुलाने घडलेली सर्व हकीकत सांगितली.

​“मुला, तू निस्वार्थीपणाने माझ्या मुलाचा तसेच कुत्र्याचा आणि मांजराचा प्राण वाचवलास. याचा मला आनंद आहे. माझ्या शेपटीला ही एक जादुई अंगठी आहे. तुझ्या या निस्वार्थी भावनेचा सन्मान म्हणून मी ही अंगठी तुला देत आहे. तुला जे जे हवे आहे, ते सर्व ही अंगठी मिळवून देईल. तुझे कल्याण होवो.” तिसऱ्या मुलाला न मागता तपस्वी सापाकडून जादुई अंगठी मिळाली.

​अंगठी बोटात घालून मुलगा कामधंदा शोधण्यासाठी दुसऱ्या नगरात गेला. तिथे राजाचा सेवक दवंडी पिटवत होता, “ऐका, ऐका… राजाची मुलगी राजकुमारी रूपवती विवाहयोग्य झाली आहे. मुलीच्या स्वयंवरासाठी राजाची अशी अट आहे की, जो कोणी सात समुद्रांच्या मधोमध, सात खांबांवर सात मजली राजवाडा बांधेल, त्यालाच माझी मुलगी वर म्हणून वरमाळा घालणार.”

​दवंडी ऐकताच नगरामध्ये मोठी चर्चा होऊ लागली, “ही अट कोणीच पूर्ण करू शकणार नाही. राजकुमारी रूपवती आयुष्यभर कुमारीच राहणार असे वाटते.” त्या मुलाने ही अट ऐकली. हातामध्ये असलेली अंगठी आणि तिची सत्यता तपासण्याची हीच योग्य संधी आहे, असे मुलाला वाटले.

​मुलगा राजाकडे गेला. “महाराज, मी आपली अट पूर्ण करून हे स्वयंवर जिंकू शकतो. मला एक संधी द्या.” सर्वसाधारण कपडे घातलेला हा साधा मुलगा स्वयंवर पूर्ण करण्याच्या बाता मारतोय हे पाहून सगळा दरबार त्याला हसू लागला. पण मुलाचा आत्मविश्वास जरासुद्धा डगमगला नाही. हा आत्मविश्वास पाहूनच राजाने त्याला एक संधी दिली.

​मुलगा समुद्रकिनारी आला. आपल्या हातातील चमकणाऱ्या अंगठीकडे पाहिले आणि सूचना केली, “हे जादुई अंगठी, आत्ताच्या आत्ता सात समुद्रांच्या मधोमध सात खांबांवर एका रात्रीत आलिशान राजवाडा बांध. त्या राजवाड्यामध्ये आधुनिक सर्व सुखसोयी असाव्यात, तसेच विपुल दास-दासी असावेत.”

​आणि काय चमत्कार! अंगठीचे तेज वाढू लागले, त्याने मुलाचे डोळे दिपले. क्षणात ती अंगठी मुलाच्या बोटापासून दूर झाली आणि समुद्रात गडप झाली. बघता बघता समुद्राच्या मधोमध मुलाला हवा तसा राजवाडा उभा राहिला, तोही फक्त एका रात्रीत! नगरातले सगळे लोक अचंबित झाले. काही क्षणात ही वार्ता राजाच्या कानापर्यंत पोहोचली. राजाने सन्मानाने मुलाला राजवाड्यात बोलावून घेतले. त्याचा यथायोग्य सत्कार करून आपल्या रूपवतीचा हात मुलाच्या हाती दिला. तसेच आपले सारे राज्य आपल्या जावयाला देऊन टाकले.

​विवाहानंतर मुलगा रूपवतीला घेऊन आपल्या समुद्रात बांधलेल्या राजवाड्यात सुखी संसार करू लागला. तिथूनच राजकारभार चालवू लागला. मुलाची दिवसेंदिवस चंद्राच्या कलेप्रमाणे प्रगती होत गेली. आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि प्रामाणिकपणाने त्याने प्रजेला आपलेसे केले. प्रजा आपल्या राजावर जीव ओवाळू लागली. प्रत्येक जण आपापला व्यवहार प्रामाणिकपणे केल्यामुळे राज्य अजून समृद्ध झाले.

​या राज्याच्या शेजारीच अजून एक राज्य होते. त्या राजकुमाराचा डोळा रूपवतीच्या राज्यावर होता. रूपवतीशी लग्न केल्यानंतर तिचे राज्य आपल्याला मिळेल आणि आपण त्या नगराचे राजा होऊ, अशी इच्छा त्याने मनात बाळगली होती. पण रूपवतीच्या स्वयंवरामुळे त्याची मनीषा अपूर्ण राहिली. तो रात्रंदिवस विचार करू लागला, 'या सामान्य दिसणाऱ्या नागरिकाने सात समुद्रांच्या मधोमध राजवाडा कसा काय बांधला? ही काहीतरी दैवी शक्ती आहे. पण ही दैवी शक्ती त्याला कशी प्राप्त झाली असेल?' याचे त्याला कोडे पडले. हे कोडे त्याला रात्रंदिवस चैन पडू देईना. त्याची ईर्षा दिवसेंदिवस वाढू लागली. शेवटी त्याने एक उपाय शोधून काढला. आपल्या एका चतुर पण वयस्कर दासीला मुलाच्या राजवाड्यावर पाठवण्याची योजना त्याने आखली.

​इकडे समुद्रकिनाऱ्यावर मुलगा राजवाड्यावर जाण्यासाठी नावेत बसत असताना त्याला एक वृद्ध महिला किनाऱ्यावर भीक मागताना दिसली. आपल्या राज्यात ही कोण म्हातारी भीक मागत आहे, याची चौकशी करावी म्हणून मुलगा नावेतून उतरून म्हातारीकडे गेला.

“आजी, आपण कोण आहात? आणि अशी भीक का मागत आहात?”

“मुला, तू कोण आहेस? तुझ्या पोशाखावरून तरी तू राजा वाटतोस. तू राजा असशील तर मला मदत कर. माझ्या घरी कोणीही नाही. मला दोन वेळचे अन्नसुद्धा मिळत नाही, म्हणून मी इथे भीक मागत बसले आहे. तू राजा असल्याने दयाळू असशील. तू मला तुझ्या घरी दासी म्हणून ठेवल्यास माझे दुःख दूर होईल.”

​मुलाला त्या म्हातारीची दया आली. त्याने तिला नावेत बसवून आपल्या राजवाड्यावर आणले. अशा प्रकारे त्या चतुर दासीला राजवाड्यात प्रवेश मिळाला. आता तिचे पुढचे काम होते, या मुलाला दैवी शक्ती कुठून प्राप्त होते हे शोधण्याचे.

​कित्येक महिने लोटल्यावर एके दिवशी म्हातारीच्या लक्षात आले की, मुलाच्या हातात एक जादुई अंगठी आहे. ती अंगठी मुलगा सांगेल ते काम करते. या अंगठीमुळेच मुलाला सात समुद्रांच्या आत राजवाडा बांधणे शक्य झाले. या अंगठीमुळेच मुलगा सर्व शत्रूंवर मात करतो. मुलाच्या यशाचे रहस्य त्याच्या अंगठीत लपलेले आहे हे निश्चित झाल्यावर म्हातारीने ती अंगठी पळवण्याचा विचार केला. अंगठी चोरण्याची ती संधीच शोधत होती आणि एके दिवशी तिला ती संधी मिळाली.

​सकाळी मुलगा स्नानगृहात आंघोळ करून बाहेर येताना आपल्या बोटातील ती अंगठी पुन्हा घालायला विसरला. त्याची अंगठी स्नानगृहातच राहिली, हे चाणाक्ष म्हातारीच्या नजरेतून सुटले नाही. ती तत्काळ अंगठीजवळ गेली. ती आपल्या हातात घेऊन तिने हुकूम सोडला, “आत्ताच्या आत्ता मला या राजवाड्यावरून माझ्या राजासमोर उभी कर.”

​अंगठीच ती! जो हुकूम देतो त्याचे ती ऐकते. जो हातात घालतो त्याची ती दास होते. आता ती अंगठी म्हातारीची दास झाली होती. एका क्षणात अंगठीतून प्रकाश येऊ लागला आणि त्या प्रकाशासरशी म्हातारी तिथून गायब झाली. ती थेट शेजारच्या राज्यातील राजकुमारासमोर प्रकट झाली.

​इकडे मुलाला आपण अंगठी स्नानगृहात विसरल्याची जाणीव होताच तो लगबगीने तिथे गेला. पण ती अंगठी आपल्या जागी नव्हती आणि तिथे काम करणारी ती म्हातारीही तिथे नव्हती. मुलगा जे समजायचे ते समजून गेला. त्याला अपार दुःख झाले. त्याने कपाळाला हात लावला.

​(क्रमशः)


- गाैतमी चाेर्लेकर गावस