निसर्गाचा गायक आणि जंगलचा पाहुणा: सिकाडा

​सिकाडा हा कीटक झाडाच्या खोडावर बसलेला आढळतो. तिथे बसून तो सतत 'किर्र किर्र सीऽऽऽ... किर्र किर्र सीऽऽऽ' असा आवाज काढत असतो. २ ते ५ सेंमी लांबीचा हा कीटक त्याच्या दिसण्यापेक्षा आवाजामुळेच जास्त ओळखला जातो.

Story: साद निसर्गाची |
18th April, 11:18 pm
निसर्गाचा गायक आणि जंगलचा पाहुणा: सिकाडा

अापल्यापैकी प्रत्येकजण उन्हाळ्यात निसर्गभ्रमंती किंवा जंगल भटकंतीसाठी गेलाच असेल. अगदी ट्रेकिंगच्या नावाखाली गेलो नसलो, तरी रानमेवा तोडण्यासाठी किंवा ओहोळ/नदीमध्ये पोहण्यासाठी प्रत्येकाने जंगलवारी केलीच असेल. जंगलात गेल्यावर कानाला सतत वैताग आणणारा कर्कश-तीव्र 'किर्र किर्र सीऽऽऽ... किर्र किर्र सीऽऽऽ' असा आवाज आपण ऐकला आहे का? उन्हाळ्याच्या दिवसात जंगलात भटकत असताना तुमच्या अंगावर कधी पाण्याचे तुषार पडलेले आठवतात का? 'किर्र किर्र सीऽऽऽ' असा आवाज काढत मूत्राचे फवारे सोडणारा हा कीटक म्हणजे 'सिकाडा'.

​सिकाडा हा कीटक झाडाच्या खोडावर बसलेला आढळतो. तिथे बसून तो सतत 'किर्र किर्र सीऽऽऽ... किर्र किर्र सीऽऽऽ' असा आवाज काढत असतो. २ ते ५ सेंमी लांबीचा हा कीटक त्याच्या दिसण्यापेक्षा आवाजामुळेच जास्त ओळखला जातो. सिकाडाची जास्तीत जास्त लांबी १५ सेंमी इतकी असू शकते. सिकाडांचा रंग बहुधा सौम्य ते गडद असतो. लहान ते मध्यम आकाराच्या या कीटकाला दोन मोठे डोळे व पंखांच्या दोन जोड्या असतात. पंख सुंदर व रंगबेरंगी असून त्यांच्यामध्ये अनेक शिरा असतात.

​भारतात सिकाडाच्या तब्बल २०० प्रजाती आढळतात. सिकाडाच्या बहुतेक जाती या 'सिकाडीडी' कुळातील आहेत. प्रत्येक प्रजाती वेगवेगळ्या कंपनाचा आवाज निर्माण करत असते. नराने काढलेले विविध कंपनांचे आवाज वेगवेगळ्या कारणांसाठी असू शकतात. काही सिकाडा नियतकालिक (नियमित काळानंतर येणारे) असतात, तर काही वार्षिक (दरवर्षी येणारे). भोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी हा कीटक 'छद्मरूपण' (Camouflage) करत असतो आणि म्हणूनच तो पटकन दृष्टीस पडत नाही.

​मादी सिकाडामध्ये आवाज काढणारा अवयव नसल्याने केवळ नर सिकाडाच आवाज काढतो. सिकाडा नर-मादीचे मिलन फार रंजक असते. नर सिकाडा मादीला आकर्षित करण्यासाठी विशिष्ट कंपनाचा आवाज काढत तिच्या मागे-मागे जातो. मादी कितीतरी वेळ खोडावर शांतपणे बसून राहते. नर सिकाडा संयमाने तीव्र आवाज काढत मादीच्या मागे तासनतास बसून राहतो. एक क्षण असा येतो जेव्हा मादी हलकेच आपले पंख हलवते आणि नर-मादीचे मिलन होते; पंख हलवणे हा कदाचित मादी सिकाडाने दिलेला होकार असतो.

​मादी सिकाडा झाडावर अंडी घालते. काही दिवसांनी अंड्यातून अळी बाहेर पडते. अळी बाहेर पडल्यानंतर झाडाच्या खोडावरून खालच्या बाजूला प्रवास करते. प्रवास करत ती मातीमध्ये बीळ खणून झाडाच्या मुळापर्यंत जाते. कालांतराने झाडाच्या मुळाचा रस पिऊनच ती मोठी होते व रात्रीच्या वेळी कोषातून प्रौढ सिकाडा बाहेर येतो. बाहेर पडल्यानंतर पंख उघडून ते सुकेतोवर प्रौढ सिकाडा कोषाचा आधार घेतो. पंख सुकल्यानंतर ते जास्त आकर्षक व चकचकीत दिसतात. पक्षी, सरडा व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा सिकाडा हा मुख्य अन्नस्रोत आहे. भक्षकांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हा कीटक छद्मरूपण करतो. वार्षिक व नियतकालिक सिकाडाची मिलन आणि अंडी घालण्याची प्रक्रिया सारखीच असते. फरक इतकाच की, नियतकालिक प्रौढ सिकाडाचा मातीतून बाहेर येण्याचा काळ वार्षिक सिकाडापेक्षा जास्त असतो.

​सिकाडाचा जीवनकाळ साधारणपणे चार आठवड्यांचा असतो. सिकाडा झाडाचा रस पिऊन आपला उदरनिर्वाह करतात. झाडातील 'झायलम' उतीमधून वाहणारा रस हे सिकाडाचे मुख्य अन्न आहे. हा रस झाडांच्या मुळांकडून वरच्या बाजूला वाहत असतो. झायलम रसामध्ये पाण्याची मात्रा जवळजवळ ९५ टक्के असते. त्यामुळे सिकाडाला आवश्यक पोषकतत्वे मिळवण्यासाठी जास्तीत जास्त रस प्यावा लागतो. सिकाडा दररोज त्याच्या शरीराच्या वजनाच्या ३०० पट जास्त झायलम रस पितो आणि रसातून प्यायलेले पाणी सातत्याने मूत्राद्वारे विसर्जित करतो. आपल्या जेमतेम चार आठवड्यांच्या जीवनकाळात हा कीटक परिसंस्थेतील संतुलन राखून ठेवण्याचे काम करत असतो.


- स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)