समाज नियमांचा पाषाण भंग करणारी : 'पाषाण कळी'..!

Story: पुस्तक |
18th April, 11:25 pm
समाज नियमांचा  पाषाण भंग करणारी :  'पाषाण कळी'..!

‘पा​​षाण कळी' माझ्या वाचन प्रवासातला महत्त्वपूर्ण भाग.खरंतर हिच्यामुळे मी कादंबरीच्या प्रेमात पडले असं म्हणायला हरकत नाही.अकरा-बारा वर्षांचं पोरसंवदा वय आणि हातात पडलेला हा धगधगता निखारा.ही कादंबरी मला इतकी भावली की आज माझं लेखनासाठी असलेलं नाव 'अनु' हे या नायिकेच्या प्रेरणेतून मी स्विकारलं आणि अजून एक गोड योगायोग म्हणजे ही नायिका माझ्या वाढदिवसादिवशीच जन्मली आहे नि माझ्यासम पाऊसवेडी आहे.माझ्या हाती ही अनुवादित आवृत्तीच आली होती तरीही मी या कादंबरीच्या प्रचंड प्रेमात होते आणि अजूनही आहे.या कादंबरीमुळे आणि यातल्या अनुमुळे मी लेखनाकडे वळले; माझ्यातल्या या सुप्त कलेची मला जाणीव झाली.या अनुमुळे आजवर मी तरले आहे.तिने कालही मला जगायला शिकवलं,आजही शिकवते आहे नि पुढेही माझी सखी म्हणूनच माझ्या सोबत राहील.आयुष्य आपलं आहे त्यामुळे काही वेळा समाजाला काय वाटेल या विचारापेक्षा आपण एखादा निर्णय निभावून नेण्यासाठी समर्थ आहोत का असा प्रश्न स्वतःला विचारणं आवश्यक असतं याचीच झलक म्हणजे 'पाषाण कळी'. आपल्या अंगी असणारी कुठलीही कला ही आपल्या स्वप्नाळू ध्येयांची पुर्तता असते असं मला नेहमी वाटतं.एखाद्या कलेच्या माध्यमातून आपण आपले सुप्त विचार बेधडकपणे मांडू शकतो.त्याला काल्पनिकतेची जोड असल्यामुळे आपण त्या जगात बिनधास्त वावरत असतो.अशीच काहीशी या कादंबरीची मांडणी आहे.यातील नायिका अनुष्का उर्फ अनु एक मोहाचा क्षण स्वप्नाळूपणे अनुभवते मात्र वास्तव समोर आल्यावर बेदरकारपणे त्याचा सामना करत ती पुर्ण विचारांती समाज नियमांना धुडकावून स्वतःच्या कृतीची जबाबदारी स्वतः घेत योग्य निर्णय घेते.

ही कादंबरी अक्षरशः शब्दांचा सिनेमा आहे.कारण यातील प्रत्येक शब्द वाचकाच्या डोळ्यासमोर जिवंत चित्र उभं करतो.यात अनेक ठिकाणांचा उल्लेख आहे.उदाहरणार्थ दिल्ली,पुरानी दिल्ली, निजामुद्दीन रेल्वे स्थानक, कोलकत्ता, बेंगळुरू, अमेरिका इत्यादी.पण या कादंबरीची खासियत आहे गोवा.हिचा निम्मा अधिक भाग गोवाभरातल्या वर्णनांनी व्यापलेला आहे.करमळी रेल्वे स्टेशन,रायबंदर फाटा,मिरामार समुद्र किनारा,खांडेपार,सार्वर्डे,कोलवा, म्हापसा, मडकई,ओल्ड गोवा, मडगाव, माशेल, पर्वरी, हणजुणे,दोनापावला आणि जिथे नायक नायिका वास्तव्य करतात ती सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र राजधानी 'पणजी'.ग्रीष्म ऋतूत गोव्याच्या भूमीत अवतरलेली नायिका इथले सारे ऋतू अनुभवते.रखरखणारी गर्मी, धुंवाधार पाऊस नि झोंबणारी सर्दी..या ऋतुचक्रासोबतच लेखिकेने इथल्या सणांचंही वैशिष्ट्यपुर्ण वर्णन केलं आहे.खांडेपारची चतुर्थी, म्हापसा बोडगेश्वराची जत्रा,रामनाथी जत्रेचा रथोत्सव,मडकईची जत्रा,ओल्ड गोव्याचे फेस्त,माशेलची मालिनी पुनवेची जत्रा अशा अनेक सणांची वैविध्यपूर्ण माहिती प्रसंग रुपात वाचकाला अनुभवता येते.इथले खाद्य जीवन रेखाटताना ही लेखिकेने भरपूर सैल हात सोडलेला आहे.आडसरां(शहाळी),खेकड्यांची गाथन,सूरमई,कर्ली (तिचे असंख्य काटे), बांगडुल्या (छोटे बांगडे),व्हेज पुलाव, कालवण, तळण तसाच बिअरचा ही एखाद दुसरा उल्लेख वाचनात येतो.या कादंबरीच्या निमित्ताने मन भरून वर्षभराचा गोवा फिरता येतो असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.या कादंबरीत कोंकणी संवादांची रेलचेल आहे; तसेच ठिकाणांची मनमोहक चित्रणं आहेत.नायक,नायिका व इतर पात्रांची व्यक्तीचित्रणं ही सुंदर शब्दात रंगवलेली आहेत.या कादंबरीच्या मुखपृष्ठावर अनुरूपी स्त्रीचं चित्र रेखाटलेलं आहे तसेच जेष्ठ कथाकार श्री.नारायण महाले यांनी या कादंबरीला प्रस्तावना दिलेली आहे.

​ही कादंबरी अनुष्का (अनु) या नायिकेच्या आत्मकथनावर आधारित आहे. श्रीमंत घरातील पोकळ नात्यांना कंटाळून अनु दिल्ली सोडून गोव्याला आपल्या मावशीकडे (सीमा) येते. तिथे मावशीचा पती मयूर याच्या सहवासात ती नकळत त्याच्याकडे आकृष्ट होते. एका मोहाच्या क्षणी दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होतात, मात्र आपली चूक उमजताच मावशीचा संसार वाचवण्यासाठी ती पुन्हा दिल्लीला परतते.

​दिल्लीत आल्यावर आपल्याला दिवस गेल्याचे अनुला समजते. ती ही बाब मयूरला कळवते आणि खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेते. पालकांच्या संमतीने ती कोलकात्याच्या मिशनरी शाळेत शिक्षिकेची नोकरी स्वीकारते आणि आपल्या बाळाला जन्म देण्याचा निर्धार करते. एका उच्चशिक्षित तरुणीचा विचारी आणि धडाडीचा प्रवास म्हणजे 'पाषाण कळी' ही कादंबरी!


- अनु देसाई, हळर्ण पेडणे-गोवा

कादंबरी : पाषाण कळी, मुळ लेखिका : ज्योती कुंकळकार (कोंकणी),  अनुवाद : चित्रसेन शबाब (मराठी)