गेल्या भागात आपण वाचले: कष्ट उपसून प्रकाशला अधिकारी बनवणाऱ्या वृद्ध माता-पित्यांना आणि धाकट्या भावाला, प्रकाश व त्याची पत्नी प्रमिला यांनी घराबाहेर काढले. मुलाच्या उपेक्षेमुळे आजारी आई-वडील आणि बेरोजगार भाऊ सध्या अन्नाविना हाल सोसत आहेत.

गेले चार दिवस मात्र त्याचा पत्ता नव्हता. मागचं सारं आठवून विचारांच्या ताणाने शहाण्यांचा तोल गेल्यासारखा झाला. स्वतःला सावरत ते जमिनीवर बसले.
सारं पाहत असूनही बाज्या काही करू शकत नव्हता. डॉक्टरांनी पूर्वीच सांगून ठेवलं होतं की, हृदयावर ताण पडेल असं काही केलंत तर ऑपरेशन करावं लागेल. "मीच आजारी पडलो तर आई-बाबांना कोण बघणार? मलाच काहीतरी करावं लागेल," बाज्या स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता.
झिजलेल्या स्लीपर पायात चढवत तो आत डोकावला. "जरा जाऊन येतो, पाहतो काय होतंय का," असं म्हणत तो भरदुपारी पुन्हा बाहेर पडला.
वाट फुटेल तिकडे तो चालत राहिला होता. मनाची अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढत चालली होती. काही धंदा-व्यवसाय करावा म्हटलं बैठा, तर हातात फुटकी कवडी सुद्धा उरली नव्हती. विचारांच्या भरात चालत चालत कधी संध्याकाळ उलटून गेली हे कळलं सुद्धा नाही; तो घरापासून खूप दूर आला होता.
समोरून दोन हिजडे येत होते. त्यांना पाहून तो बाजूला सरकला. ते गेल्यावर तो पुढे जायला निघाला. लोक त्यांना भिऊन त्यांच्या हातावर पैसे ठेवत होते. "लहानपणापासून मला त्यांची भीती वाटायची. ते जवळ आले की रडायला यायचं. आईने हातावर पैसे ठेवताच ते निघून जायचे. 'काय करत नाहीत ते, पैसे दिले की..' आई त्यावेळी सांगायची. मग भीती जरा कमी व्हायची," बाज्याला आठवत होते. आजही तो त्यांना पाहून गोंधळल्यागत झाला होता, तरीही तो पुन्हा पुढे निघाला.
"आपल्या आई-वडिलांसाठी आपण काहीतरी करायला हवं. कामही मिळत नाही. देवा, काय करू मी आता...!" विचारांचा चाळा मनाशी करता करता अचानक एक विचार मनात तरळून गेला. त्यामुळे त्याच्या भुकेने काळवंडलेल्या क्षीण चेहऱ्यावर हास्य तरळले. तो तसाच लांब टांगा टाकत घराच्या दिशेने निघाला.
"अरे, किती उशीर...! किती काळजी वाटत होती तुझी.. होतास कुठे?" शहाणे विचारत होते.
"काम मिळवण्यासाठी गेलो होतो," बाज्या काहीसा विचार करत त्यांना म्हणाला.
"मग...! मिळालं का?" शहाण्यांचा नेहमीचा प्रश्न.
"हो," तो ठामपणे म्हणाला. "निदान दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न तरी सुटेल," तो मनात उद्गारला.
खोकून खोकून थकव्याने सुमतीबाईंना गाढ झोप लागली होती. शहाणे झोपण्यासाठी आपल्या जाग्यावर गेले. बाज्या सतरंजी अंथरून आडवा झाला. बराच वेळ विचार करत तो जागाच होता. उशिराने त्याला डोळा लागला.
सकाळी उठल्यावर कालच्या विचाराने त्याला थोडी तरतरी आली. आंघोळ-पाणी आटोपून त्याने रोजच्याप्रमाणे पिण्यासाठी पाण्याची कळशी भरून आणून ठेवली. स्वयंपाकखोलीत एका कडेला असलेल्या सुमतीबाईंच्या पेटीतून त्याने काही वस्तू काढून आपल्या जवळील पिशवीत ठेवल्या. अंगावर कपडे चढवत, आई-बाबांना नमस्कार करून बाज्या घराबाहेर पडला.
भराभर पावले टाकत तो शेताच्या रस्त्याने जाऊ लागला. आजूबाजूला असलेल्या झाडीच्या आड जात त्याने जवळपास कोणी नसल्याची खात्री केली. असं करताना त्याचं मन त्याला खात होतं, पण आई-बाबांचा थकलेला, भुकेला चेहरा समोर येताच त्याने मन घट्ट केले.
मनोमन देवाला स्मरत माफी मागून त्याने पिशवीतून आणलेली सुमतीबाईंची जुनी साडी आणि ब्लाऊज बाहेर काढून, डोळ्यात पाणी आणत अंगावर चढवले. लाल-हिरव्या काचेच्या बांगड्या पिशवीबाहेर काढत हातात घातल्या. कानातले, गळ्यातले... सारं काही घालत तो मनावर दगड ठेवून तयार होत होता. सुमतीबाईंचे जुने, फार वर्षांपूर्वीचे गंगावनही पेटीत पडलेले होते, तेही त्याने घालून घेतले. त्याची वेणी घालून केसात अडकवून पिनअप करत तो तयार झाला.
अंगावरचे कपडे पिशवीत भरत बाज्याने शबनम पिशवी खांद्याला लावली. जरा मुरकतच रस्त्यापर्यंत पोहोचत तो पुढे चालू लागला.
बाजारात पोहोचताच त्याला जवळ येताना पाहून हातावर पैसे टाकत लोक दूर निघून जात होते. टाळ्या वाजवून पैशाची मागणी दुकानदारांकडे करताना ते काही पैसे का असेना हातावर टेकवत होते.
'आपण पुरुष असूनही हे असं सोंग घेऊन आपल्याला दारोदार फिरावं लागतंय, तेही एक हिजडा बनून... मी उपाशीपोटी जगात येईल तितके दिवस जगून मरेनही, पण माझ्या आई-वडिलांना त्यांचा हा मुलगा जिवंत असेपर्यंत तरी कोणापुढे हात पसरावे लागू नयेत. भुकेसाठी रोज रोज जिवंत मरण भोगावं लागू नये....' एक उसासा टाकत बाज्या पुन्हा विचार करत चालू लागला.
'आज संध्याकाळी मिळालेल्या पैशांतून खाणं नेल्यावर सगळे किती आनंदाने बसून खातील. या कुशीचं त्या कुशीवर रात्र रात्र भुकेमुळे जागत, रिकाम्या पोटी असलेले माझे आई-वडील शांतपणे झोपू शकतील... यासाठी मला हे करायलाच हवं..' असा निर्धार करत त्याने पुढचे पाऊल उचलले. समाप्त ...

- गौरी भालचंद्र