लक्ष्मी

हातातील बांगड्या, गळ्यातील मणी, केसांतील फुले, पायांतील जोडवी आणि कपाळावरील ठसठशीत कुंकू ही तिच्या जगण्याची प्रेरणा होती. तिचे अस्तित्व त्या त्या घराला जाणवायचे, ते मुळी परंपरेने श्रेष्ठ ठरविलेल्या याच प्रतीकांतून! सासू, सासरे, नणंद, दीर यांना जरी तिने नावे ठेवली, तरीही कुटुंबासाठी राबताना त्यांच्यासाठीही सर्व काही केले जायचे.

Story: लोकरंग |
07th February, 10:24 pm
लक्ष्मी

परंपरेने चालत आलेली एकत्र कुटुंबपद्धती ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक होती. शेतीभाती, जनावरे आणि माणसांचा राबता मोठा होता. एखाद्या कुटुंबात जेवढी जास्त माणसे, तेवढेच त्यांच्या घरी कामही जास्त असायचे. त्यातही अलिखित अशी कामाची वाटणी केली जायची. घरातील स्त्रियांच्या वाट्याला खूप कष्टप्रद जगणे यायचे. लाकूडफाटा आणण्यासाठी सकाळ-संध्याकाळ डोंगरावर जायचे, कुमेरी शेतीसाठी कष्ट घ्यायचे; इतकेच नाही तर सकाळ-संध्याकाळ दळण-कांडण करून कुटुंबासाठी राबराब राबायचे. कपडे, धुणी-भांडी, केरवारा, घरातील जाणत्यांची व नेणत्यांची दुखणी-खुपणी, सणवार इत्यादी सर्व कामे घरच्या गृहिणींनाच करावी लागायची.

अशा वेळी भांड्याला भांडी लागायचीच, मात्र घरातील मोठ्या व्यक्तीसमोर तोंडातून एक शब्दही काढता येत नसे. अशा वेळी तिची घुसमट व्हायची. एरव्ही चुलीतल्या जाळात ती घुसमटून जायचीच, त्यातही तिच्या या आंतरिक उमाळ्याला व तगमगीला शब्दांत व्यक्त करण्याचीही भीती होती. सासू-सासरा, नवऱ्याचा धाक, नणंदेच्या चहाड्या, जावेचे टोमणे, दिराचा ऐतखाऊपणा, शेजारीणबाईची भांडणे, हे सर्व सहन करीत तिची वाटचाल सुरू होती. त्यातल्या त्यात एखादीला जर मूलबाळ झाले नाही, तर मात्र तिची किंमत शून्य असायची.

असे असूनही लोकपरंपरेतील स्त्रियांनी हा जाच मुकाट्याने सोसला असे म्हणता येणार नाही; परंतु मोठ्याने भांडण उकरून काढून सासू-सासऱ्यांपासून वेगळे बिऱ्हाड थाटले असेही नाही. सगळे सोसूनही ती सण-उत्सवांत सक्रिय राहिली. सासूला प्रत्यक्षात उलट उत्तरे देता येत नव्हती, म्हणून मग तिने मनातील घुसमटीलाच शब्द दिला आणि त्याचेच गीत करून कुटुंबातील कोणकोणती मंडळी कसा जाच करतात, ते अगदी नेमकेपणाने सांगून त्यांच्याविषयीचा राग फुगडीगीतांतून व्यक्त केला.

लोकपरंपरेतील सासू खाष्ट, भांडखोर आणि सुनेला त्रास देणारी अशीच आहे. ती मुलाला आणि नातवाला आपले मानणारी, मात्र सुनेला तिने कायमच परके मानले. संसाराच्या आणि त्यातल्या त्यात सून करीत असलेल्या सर्वच गोष्टींत नाक खुपसणारी सासू! लोकगीतांत तिचे वर्णन करताना म्हणतात...

सासूबाई कशी गं सासूबाई कशी
चुलीकडले भानशिरे कशी गं, भानशिरे कशी

भानशिरे स्वयंपाकघरात गरजेचे होते. ते सगळीकडे मिरवते खरे पण त्याची किंमत शून्य!

माव बाये कसो गे, माव बाये कसो
खान्यार कांबळ घेवन देवचार कसो गे, देवचार कसो

'माव' म्हणजे सासरा. त्याचा धाक घरावर असायचा. त्याच्या शब्दाबाहेर एकही व्यक्ती जात नसायची. तो करारी आणि देहपिंडाने भारी! खांद्यावर कांबळ घेऊन जणू काही तो गावाच्या सीमेवर असलेल्या देवचारासमान हृदयात धडकी भरविणारा असाच होता.

देर बाये कसो गे, देर बाये कसो
माडावयलो कावळो कसो..

प्रत्येकाच्या स्वभावाची वैशिष्ट्ये हेरून या स्त्रियांनी नेमके त्यांचे वर्णन केले आहे. दीर हा घरात बारीक नजर ठेवून वावरणारा. कधी कधी त्याची ती नजर एखाद्या तरण्याताठ्या सुनेला बोचणारी असायची. त्यामुळेच अशा प्रकारे त्याचे वर्णन गीतातून येते...

नणंद बाये कशी गं, नणंद बाये कशी
खडपा पोंदली कुल्ली कशी

लोकपरंपरेतील स्त्रियांनी सर्वात जास्त कोणाला अव्हेरले असेल, तर ते सासूला आणि नणंदेला. सारख्या सूचना करणारी ती सासू, सूचना नको म्हणणारी ती सून आणि 'न-आनंद' देणारी ती नणंद! या नात्यांविषयी त्यांचे सहजासहजी सख्य जुळले नाही; क्वचितच कोठे तरी चांगुलपणाची भावना निर्माण झालेली दिसते.

'कुल्ली' ही खडकाच्या आत सापडते, ती सहज नजरेला पडत नाही. कुल्ली म्हणजे खेकडा. खेकडे नेहमीच वर जाणाऱ्याला खाली खेचतात, शिवाय ते कधी डंख मारतात हेही लक्षात येत नाही. नणंद नेमकी तिला अशीच वाटते, म्हणून तिला 'कुल्ली' म्हटले आहे. नवऱ्याविषयी मात्र ती अपशब्द काढत नाही. त्याने मारले किंवा झापले तरीही तो तिच्यासाठी परमेश्वरच होता. 'पावसावाचून धरतरी आणि कंथावाचून कामिनी' या दोघीही अपूर्णच, अशी तिची धारणा आहे. म्हणून ती म्हणते–

घोव बाये कसो गे, घोव बाये कसो
सूट बूट घालून हिरो कसो

तिच्या कल्पनेतील नवरा तिला क्वचितच लाभला असेल, पण तिथेही तिने कधी स्वतःला उघडउघड व्यक्त केलेले नाही. तिला परंपरेने घरातील 'लक्ष्मी' संबोधले खरे, परंतु प्रत्यक्षात मात्र तिची उपेक्षाच झाली. असे असतानाही ती स्वतःसाठी गाते...

मी बाये कशी गे मी बाये कशी
कपाळाला कुंकू लावून लक्ष्मी कशी...

तिला माहिती होते की तिच्यामुळे घराला घरपण आहे. असे असूनही ती दुर्लक्षित राहिली, परंतु तिने मात्र संसाराकडे दुर्लक्ष केले नाही. सरणावर तिचा देह पोहचण्याची वेळ येईपर्यंत ती राबराब राबायची. तिच्या सूक्ष्म दृष्टीने सभोवतालाला हेरले; निसर्गाचे असे अनेक घटक तिने गीतांतून गुंफले आणि सण-उत्सवांत गायिले. उघडउघड टीका करता येत नाही, मग हा असा मार्ग अवलंबून तिने स्वतःला मोकळे केले.

हातातील बांगड्या, गळ्यातील मणी, केसांतील फुले, पायांतील जोडवी आणि कपाळावरील ठसठशीत कुंकू ही तिच्या जगण्याची प्रेरणा होती. तिचे अस्तित्व त्या त्या घराला जाणवायचे, ते मुळी परंपरेने श्रेष्ठ ठरविलेल्या याच प्रतीकांतून! सासू, सासरे, नणंद, दीर यांना जरी तिने नावे ठेवली, तरीही कुटुंबासाठी राबताना त्यांच्यासाठीही सर्व काही केले जायचे. “सासरचा वासा लागतो ठसाठसा...” ही तिची परंपरेने प्रवाहित झालेली दुखरी नस होती; ती सलते, पण सरत नाही.


पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)