अमृततुल्य नारळ

नारळ हा केवळ एक वृक्ष नसून गोव्याच्या संस्कृतीचा आणि पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहे. 'कल्पवृक्ष' मानल्या जाणाऱ्या या झाडाचे महत्त्व, उपयोग आणि संवर्धन.

Story: साद निसर्गाची |
07th February, 09:53 pm
अमृततुल्य नारळ

​कित्येक ठिकाणी नारळांच्या झाडांची (माड) कत्तल करून ती जमीन अन्य कामांसाठी वापरात आणली जात असल्याची उदाहरणे गोव्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. अन्न, औषध, उद्योग, शेती आणि दैनंदिन जीवनात नारळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ज्या माडाचे फळ गोवेकरांचे जेवण रुचकर बनवते, ज्याचा प्रत्येक भाग घर सजवण्यासाठी उपयोगात आणला जातो, जी झाडे आपल्या प्रत्येक भागात दीर्घकाळ कार्बन साठवून ठेवत हवा शुद्ध ठेवण्याचे काम करतात, अशा नारळाच्या झाडांना आपण गृहीत धरतो की काय, असा प्रश्न यावरून उपस्थित होतो.

​नारळपाणी हे अत्यंत नैसर्गिक व पौष्टिक पेय आहे. औषधी गुणधर्म असलेले हे पेय शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. खोबरे, ओले खोबरे आणि कीस हे मिठाया, विविध पदार्थ, चटण्या तयार करण्यासाठी व स्वयंपाकात वापरले जातात. नारळाशिवाय हिंदू बांधवांचे धार्मिक विधी संपन्न होत नाहीत. नारळाचे तेल आयुर्वेदिक औषधांत, साबण, सौंदर्यप्रसाधने निर्मितीसाठी, तसेच केस व त्वचेची निगा राखण्यासाठी वापरले जाते. झाडाचे खोड आणि करवंटीचा उपयोग इंधन, हस्तकला वस्तू, फर्निचर, लाकडी वस्तू, भांडी व शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. हल्ली शहरी भागात आयोजित करण्यात येणाऱ्या कित्येक समारंभांत किंवा कार्यक्रमांत आपल्याला माडाच्या झावळ्यांची सजावट पाहायला मिळते. नारळाची पेंड ही जनावरांच्या खाद्यासाठी व सेंद्रिय खत म्हणून वापरली जाते. नारळाचा फुलोरा 'ताडी' तयार करण्यासाठी वापरला जातो.

​नारळाच्या झाडाचा जवळजवळ प्रत्येक भाग उपयोगात येतो, यामुळे कचरा निर्माण होत नाही आणि हे झाड शाश्वत विकासाचे उत्तम उदाहरण ठरते. नारळापासून आपण तंतू, दोर, चटया, भांडी यांसारख्या नैसर्गिक वस्तू तयार करू शकतो. या वस्तू प्लास्टिकला उत्तम पर्याय ठरून प्लास्टिकचा भस्मासुर आटोक्यात ठेवण्यास मदत करू शकतात. किनारपट्टी भागात केलेली नारळाची लागवड वादळी वारे आणि समुद्राच्या भरती-ओहोटीचा परिणाम कमी करत मानवी वस्ती व शेतीचे संरक्षण करते. जमिनीत खोलवर पसरलेली माडाची मुळे माती घट्ट पकडून समुद्रकिनाऱ्यावरील व नद्यांच्या काठची माती वाहून जाण्यापासून रोखतात. नारळाची झाडे पक्षी, कीटक, खार, सरडे अशा अनेक जीवांना निवारा व अन्न पुरवतात, ही गोष्ट इथे आवर्जून नमूद करण्याची गरज भासू नये.

​नारळाचे झाड सतत आपल्या खोडात, पानांत आणि मुळांत कार्बन साठवते. नारळाचे झाड अनेक वर्षे जगत असल्यामुळे जिवंत असताना साठवलेला कार्बन दीर्घकाळ वातावरणात परत जात नाही. याला 'कार्बन साठवण' (Carbon Sequestration) असे म्हणतात. नारळाचे लांबलचक झाड परिसरातील तापमान संतुलित ठेवते.

​नारळाचा उगम दक्षिण-पूर्व आशिया व हिंद महासागर परिसरात मानला जातो. नारळाचे फळ पाण्यावर तरंगू शकते. समुद्रप्रवाहांमुळे नारळ किनाऱ्यावर वाहत येऊन गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले आणि तिथे रुजले, असे मानले जाते. नैसर्गिक समुद्रप्रवाह, प्राचीन समुद्री व्यापार, धार्मिक-सांस्कृतिक परंपरा आणि पोर्तुगीज काळातील शेतीविकास. या सर्व कारणांमुळे नारळ गोव्यात आल्याचे मानले जाते.

​नारळाचे झाड केवळ उपयुक्तच नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे. 'कल्पवृक्ष' म्हणून ओळखले जाणारे हे झाड मानवी जीवनाबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन आणि संतुलन राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. नारळाचे झाड मानवाच्या जीवनाशी, संस्कृतीशी आणि पर्यावरणाशी घट्ट नाते असलेले झाड आहे. उष्ण व दमट हवामानात वाढणारे हे झाड विशेषतः कोकण, गोवा व किनारपट्टी भागात निसर्गसंतुलन राखण्यात मोलाची भूमिका बजावते. प्राचीन साहित्य, धार्मिक ग्रंथ आणि शिल्पकलेत नारळाचा उल्लेख आढळतो. त्यामुळे नारळाचे झाड केवळ नैसर्गिकच नव्हे, तर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. परिणामी, नारळाची लागवड वाढवणे हे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.


स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)