कारणांपलीकडे थांबलेलं मन

स्वतःला explain न करणं म्हणजे नात्यांपासून दूर जाणं नव्हे. कधी कधी ते स्वतःकडे परत येणं देखील असतं. कारण, सगळ्या भावना explain करण्यासाठी नसतात. सगळे निर्णय justify करण्यासाठी नसतात. जिथे तुम्हाला सतत स्वतःला explain करावं लागतं, तिथे थोडं स्वतःला प्राधान्य द्यायचा हक्क तुम्हालाही आहे.

Story: मनी मानसी |
06th February, 10:42 pm
कारणांपलीकडे थांबलेलं मन

सतत स्वतःला समजावून सांगणं, स्वतःच्या प्रत्येक कृतीविषयी अंतर्गत किंवा बाह्य स्पष्टीकरण देणं वा तसं करण्याची सतत गरज भासणं हे वरवर ऐकायला एखाद्या संवादासारखं अर्थात सेल्फ टाॅक वगैरे वाटू शकतं. परंतू प्रत्यक्षात मात्र ह्याचे प्रमाण अति झाल्यावर तो एक प्रकारचा भावनिक श्रमाचा भाग बनतो!

अरेच्चा! असं का बरं?

जेव्हा आपल्याला आपली प्रत्येक भावना, प्रत्येक निवड, प्रत्येक निर्णय, कृती साऱ्यांविषयीच कारणांसह सतत स्पष्टीकरण द्यावं लागतं, तेव्हा सुरुवातीला हा संवाद वाटतो पण हळूहळू ते ओझं बनत जातं... इतरांना स्पष्टीकरण देता देता आपण ते नकळत स्वतःलाही द्यावयास सुरूवात करतो आणि ह्या थकव्यात मन हळूहळू थकायला लागतं व आपल्याला त्याची जाणीव होईस्तोवर मेंदू पार होरपळून जातो.

आपण स्वतःला explain का करत राहतो?

गैरसमज टाळण्यासाठी. नाती टिकवण्यासाठी. समोरच्याला दुखावू नये म्हणून. कधी कधी तर “मी चुकीचा नाही” हे स्वतःलाच सिद्ध करण्यासाठी स्पष्टता आवश्यक असते, हे खरं. पण जेव्हा प्रत्येक भावना, प्रत्येक मर्यादा, प्रत्येक निर्णयासाठी मोठी स्पष्टीकरण द्यावं लागतात तेव्हा आत काहीतरी झिजायला लागतं.

इथेच explain आणि justify यांच्यातला फरक हरवतो. मुळात, explain (समजावून सांगणं) म्हणजे मला कसं वाटतंय ते सांगणं, भावना किंवा निर्णयाला विशिष्ट कारणांची यादी जोडणं... का? कारण एक भीती मनी असते, की चुकून गैरसमज होईल, नातं बिघडेल, आपण चुकीचे ठरू. हेच explanation प्रमाणाबाहेर गेलं की ते justification बनतं आणि आपण सतत justify करू लागतो, तेव्हा संवाद समतोल राहत नाही. आपण ऐकले जात नाही; तपासले जातो. आणि तिथेच आपलं मन थकून जातं.

त्यात आजच्या काळात हा थकवा अधिकच जाणवायला लागला आहे. आपण सतत उपलब्ध आहोत, visible आहोत त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर आपलं मत अपेक्षित आहे. वर Boundaries ठेवल्या की लगेच प्रश्न, “असं का?”, “तू बदललास”, “पूर्वीसारखा राहिला नाहीस”. भावनांनाही तर्क द्यावा लागतो, कारण ‘फीलिंग’ पुरेशी मानली जात नाही. या सगळ्यात स्वतःची बाजू मांडत बसताना माणूस हळूहळू आतून रिकामा होतो.

 

कसं ओळखावं की मन अति-स्पष्टीकरणाने थकलंय?

 बोलायची इच्छा असूनही गप्प बसावंसं वाटतं.

 ️संवाद टाळला जातो.

 ️स्वतःच्या भावना कमी लेखल्या जातात.

 ️“काहीही सांगितलं तरी त्यांना समजणार नाही” अशी शांत निराशा मनात बसते.

 ️कधी कधी भावनिक सुन्नपण येतं, जणू काही वाटणंही थकवणारं झालंय.

 ️मज्जासंस्था कायम alert मोडमध्ये राहते.

 

मग ह्यावर काय करता येईल?

Express (व्यक्त करणं) म्हणजे भावना जशी आहे तशी मांडणं, अतिरिक्त कारण न देता, काहीही सिद्ध न करता. “मला सध्या असं वाटतंय” इथपर्यंत स्वतःला थांबवणं. ह्यात मान्यता अर्थात validation मागितली जात नाही तर उपस्थिती अर्थात existence पुरेशी असते.

आता, व्यावसायिक किंवा औपचारिक संदर्भात मात्र explain करणं आवश्यक असू शकतं. पण जवळच्या नात्यांमध्ये सतत explain करावं लागत असेल, तर तिथे भावनिक सुरक्षितता कमी आहे, असं समजायला हरकत नाही कारण सुरक्षित नात्यांमध्ये सतत explain करावं लागत नाही तिथे ऐकणं आणि समजून घेणं गरजेचं असतं.

 

प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देणं थांबवण्याचा छोटा सराव कसा कराल?

 समजून घेणं आणि समजावून सांगणं यात फरक ओळखणं.

 ️शांततेला अपयश न मानणं.

 गरज वाटली, तर समुपदेशनात सुरक्षित संवादाचा आधार घेणं.

लक्षात ठेवा, स्वतःला explain न करणं म्हणजे नात्यांपासून दूर जाणं नव्हे. कधी कधी ते स्वतःकडे परत येणं देखील असतं. कारण, सगळ्या भावना explain करण्यासाठी नसतात. सगळे निर्णय justify करण्यासाठी नसतात. जिथे तुम्हाला सतत स्वतःला explain करावं लागतं, तिथे थोडं स्वतःला प्राधान्य द्यायचा हक्क तुम्हालाही आहे. 


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा, ७८२१९३४८९४