पणजीतील वाहतूक कोंडी लोकोत्सवाचे निमित्त आणि शिस्तीचा अभाव

गोव्याच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारा 'लोकोत्सव' नुकताच पार पडला. मात्र, या उत्सवादरम्यान पणजी शहरात निर्माण झालेली भीषण वाहतूक कोंडी प्रशासकीय नियोजनाचा अभाव आणि वाहनचालकांच्या बेजबाबदारपणावर प्रकाश टाकणारी ठरली आहे.

Story: कॉलिंग अटेंशन |
31st January, 11:14 pm
पणजीतील वाहतूक कोंडी लोकोत्सवाचे निमित्त आणि शिस्तीचा अभाव

नुकतीच पणजी येथे 'लोकोत्सवाची' सांगता झाली. यामध्ये गोव्यासह देशभरातील हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री झाली. विविध पारंपरिक कलांनी लोकांचे मनोरंजन केले. लोकोत्सव हा स्थानिक तसेच देशभरातील कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. याद्वारे कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी आणि वस्तू विक्रीसाठी एक मोठे व्यासपीठ मिळते. असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे, मात्र यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे देखील लक्ष दिले पाहिजे. मागील अनेक वर्षांपासून लोकोत्सव होत आहे, परंतु या दरम्यान पणजीत होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

​या उत्सवादरम्यान कला अकादमीसमोरील पदपथ तसेच बांदोडकर रस्त्यावर 'नो पार्किंग' क्षेत्रातच वाहने पार्क केली जात होती. यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. बाल भवन ते पणजी जेटी, काकुलो जंक्शन ते विवांता जंक्शन, काकुलो जंक्शन ते मधुबन जंक्शन आणि मधुबन ते टीबी इस्पितळ ते पाटो या भागांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. असे असूनही, अपवाद वगळता पोलीस कुठेच दृष्टीस पडले नाहीत. अर्थात, पणजीतील वाहतूक कोंडीस केवळ लोकोत्सव जबाबदार आहे असे नाही; आणि केवळ लोकोत्सवातच वाहतूक कोंडी होते असेही नाही. ही समस्या बारा महिने कायम असते, अशा उत्सवांच्या काळात तिची तीव्रता वाढते इतकेच.

​शहरात इतर वेळीही वाहतूक कोंडीची समस्या कायम असते. काकुलो जंक्शन ते मधुबन जंक्शन रस्त्यावर अनेक हॉटेल्स सुरू झाली आहेत. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी येथे बेजबाबदारपणे वाहने उभी केली जातात. शहरातील प्रमुख रस्त्यांवर 'नो पार्किंग' असतानाही दोन्ही बाजूंनी वाहने लावली जातात, ज्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी अपुरे पडत आहेत. अशा वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने समस्येत भर पडली आहे. बांदोडकर रस्त्यावर काही बसेस अनधिकृत थांबे घेतात, त्यामुळेही कोंडी वाढते. विशेषतः गोवा मनोरंजन संस्थेसमोर वाहनांच्या रांगा लागतात. या रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी अनेक जण सांतइनेजमधील अंतर्गत रस्त्यांचा वापर करतात, मात्र तिथेही वाहनांची संख्या वाढल्याने कोंडी होत आहे.

​वाहतूक कोंडीच्या समस्येला चालकांचा नियमशून्य दृष्टिकोन, गांभीर्याचा अभाव, कुठेही पार्किंग करणे, विनाकारण वाहने थांबवणे आणि पोलिसांची अनुपस्थिती अशी अनेक कारणे आहेत. वाहनचालकांनी रस्ता आपल्या मालकीचा समजून कुठेही पार्किंग करणे बंद केले, तर ही समस्या नक्कीच कमी होईल. प्रत्येक वेळी प्रशासनाला दोष न देता, आपण स्वतः नियम पाळतो का, याचाही विचार झाला पाहिजे. एक जबाबदार चालक म्हणून आपण सर्वच मागे पडत आहोत, हे मान्य करावे लागेल.

​चालकांना नियमांचे योग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. केवळ वाहन चालवता येते म्हणून परवाना देऊ नये; त्या व्यक्तीला नियमांची माहिती आणि जाण आहे का, याची प्रभावी पडताळणी झाली पाहिजे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात वाहतूक नियमांचे शिक्षण देणे गरजेचे आहे. जेव्हा मूलभूत 'ट्रॅफिक सेन्स' तयार होईल, तेव्हाच पणजी आणि राज्यातील वाहतुकीच्या समस्या सुटू शकतील.

 

-  ​पिनाक कल्लोळी

(लेखक गोवन वार्ताचे 

प्रतिनिधी आहेत.)