डायनामाईट श्रिंप

Story: चमचमीत रविवार |
31st January, 11:04 pm
डायनामाईट श्रिंप

साहित्य

स्वच्छ केलेले, शेपट्या काढलेले मध्यम आकाराचे श्रिंप/कोळंबी साधारण २५० ग्राम, १ अंडे, ३-४ चमचे सोया सॉस, १ वाटी मैदा + मक्याचे पीठ एकत्र करून, अर्धी वाटी मेयॉनीज, स्वीट चिली सॉस पाव वाटी, सिराचा सॉस २-३ चमचे, मीठ, 

मीरपूड, तेल, सजावटीसाठी भाजलेले तीळ, कांद्याची पात बारीक चिरून.


कृती : 

ही डिश तयार करण्यासाठी साधारण ३० मिनिटांचा वेळ लागत असला, तरी कोळंबी (श्रिंप) आधी १ ते २ तास मॅरिनेट करून ठेवल्यास त्याची चव अधिक छान मुरते. जर तुम्ही गोठवलेली (फ्रोझन) कोळंबी वापरणार असाल, तर ती आधी सामान्य तापमानावर आणून (थॉ करून) व्यवस्थित कोरडी करून घ्यावी. सुरुवातीला एका बाऊलमध्ये एक अंडे फोडून ते थोडे फेटून घ्यावे. त्यामध्ये सोया सॉस आणि दोन चिमूट मिरपूड घालावी. सोया सॉसमध्ये मिठाचे प्रमाण पुरेसे असल्याने वेगळ्या मिठाची फारशी गरज भासत नाही; मात्र आवडत असल्यास लसणाच्या एक-दोन पाकळ्या किसून त्यात टाकाव्यात, ज्यामुळे चव अधिक खुलते. या तयार मिश्रणात कोळंबी घालून किमान एक ते दोन तास मॅरिनेशनसाठी ठेवावी.

दुसरीकडे, एका उथळ भांड्यात किंवा ताटलीत मक्याच्या पीठाचे आणि मैद्याचे मिश्रण घेऊन त्यात किंचित मीठ घालावे आणि ते व्यवस्थित हलवून पसरून घ्यावे. त्यानंतर कढईत तेल तापायला ठेवावे. कोळंबी अंड्याच्या मिश्रणातून निथळून बाहेर काढावी आणि पिठाच्या कोरड्या मिश्रणात दोन्ही बाजूंनी नीट बुडवून घ्यावी. कोळंबीला पीठ लागल्यावर ती हलकी झटकून घ्यावी आणि गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावी. तुम्हाला तळलेले पदार्थ चालत नसतील, तर तुम्ही ही कोळंबी दोन्ही बाजूंनी नीट शॅलो फ्राय देखील करू शकता. तळून झाल्यानंतर कोळंबी पेपर नॅपकिनवर काढावी, जेणेकरून त्यातील जास्तीचे तेल निथळून जाईल आणि ती कुरकुरीत राहील.


- शिल्पा रामचंद्र 
मांद्रे