प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासमोर 'सुरुवात नक्की कुठून करावी?' हा मोठा प्रश्न असतो. युनियन पब्लिक सर्विस कमिशन (UPSC) सारख्या प्रतिष्ठित परीक्षेची तयारी करताना केवळ अफाट वाचन करून चालत नाही, तर अभ्यासाचा पाया भक्कम असणे अनिवार्य आहे.

हालेख अशा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल ज्यांना घरच्या घरी स्वतःची 'फाउंडेशन बॅच' सुरू करायची आहे आणि ज्यांना भारतीय रेल्वेमधील विविध करिअर पर्यायांची माहिती करून घ्यायची आहे.
UPSC साठी NCERT आणि शालेय पुस्तकांचे नियोजन
नागरी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम अत्यंत व्यापक आहे. बऱ्याचदा विद्यार्थी थेट संदर्भ ग्रंथ वाचायला घेतात, पण संकल्पना स्पष्ट नसल्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो. कोणताही वयोगटातील विद्यार्थी घरच्या घरी केवळ ४ महिन्यांचे नियोजन करून ही तयारी सुरू करू शकतो.
१. पायाभरणीचे १६ आठवडे (Foundation Planning):
अभ्यासाचे नियोजन महिन्यांच्या ऐवजी आठवड्यांमध्ये विभागणे जास्त प्रभावी ठरते. ४ महिन्यांच्या कालावधीत एकूण १६ आठवडे मिळतात. या काळात आपल्याला आपण शाळेत असताना नेमके काय शिकलो, याचे पुन्हा एकदा सखोल वाचन आणि आकलन करायचे असते. इयत्ता ५ वी पासून ते १० वी पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या शालेय पुस्तकांचा यात समावेश असावा.
२. सुरुवातीचे टप्पे (इयत्ता ५ वी व ६ वी):
पहिल्या ४ आठवड्यांमध्ये इयत्ता ५ वी आणि ६ वीची NCERT प्रमाणित पुस्तके वाचायला घ्यावीत. यामध्ये प्रामुख्याने इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, अंकगणित आणि इंग्रजी व्याकरण या विषयांचा समावेश असावा. दररोज किमान तीन वेगवेगळ्या विषयांचे वाचन केल्यास अभ्यासात कंटाळवाणेपणा येत नाही. केवळ वाचणे पुरेसे नाही, तर वाचलेल्या भागावर मनन करणे आणि त्याचे नेमके आकलन करून घेणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
३. उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तर (इयत्ता ८ वी ते १० वी):
पुढील १२ आठवड्यांचा काळ हा इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वी च्या पुस्तकांसाठी राखून ठेवावा. ५ वी आणि ६ वी चे विषय तुलनेने सोपे असल्याने ते लवकर संपवून जो वेळ उरेल, तो १० वी पर्यंतच्या कठीण विषयांसाठी वापरावा. या वर्गांची पुस्तके अधिक 'कॉम्प्रेहेन्सिव्ह' (सर्वसमावेशक) असतात आणि संकल्पना समजून घ्यायला थोडा जास्त वेळ लागू शकतो. यामध्ये प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis), आरशातील प्रतिमा (Mirror Images), भारतीय स्वातंत्र्यलढा, हवामानशास्त्र आणि संसदीय कार्यप्रणाली (Parliamentary Affairs) यांसारख्या गंभीर विषयांचा सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे. आजपर्यंतच्या UPSC टॉपर्सनी याच पद्धतीचा अवलंब करून आपले यश संपादन केले आहे.
भारतीय रेल्वेतील प्रशासकीय आणि तांत्रिक संधी
UPSC केवळ आयएएस (IAS) किंवा आयपीएस (IPS) पदांसाठीच नाही, तर भारतीय रेल्वेतील उच्च पदांसाठी देखील परीक्षा घेते.
१. इंजीनियरिंग सर्विसेसेस (IES):
अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवीधरांसाठी 'इंजिनिअरिंग सर्विसेसेस' ही एक सुवर्णसंधी आहे. या परीक्षेतून निवडले गेलेले अधिकारी आयएएस (IAS) दर्जाच्या अधिकाऱ्यांप्रमाणेच रेल्वेच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय विभागाचा डोलारा सांभाळतात.
२. बिगर-तांत्रिक (Non-Technical) आणि विविध विभाग:
रेल्वे हा जगातील सर्वात मोठ्या नियोक्त्यांपैकी एक आहे. येथे केवळ इंजिनिअर्सच नाही, तर ॲडमिन (Admin), एचआर (HR), लीगल (Legal), कॉम्प्युटर आयटी, कला (BA), वाणिज्य (B.Com) आणि फार्मसी (B.Pharma) पदवीधरांसाठीही अनेक जागा भरल्या जातात. विशेषतः वित्त (Finance) विभागामध्ये चार्टर्ड अकाउंटंट (CA), कंपनी सेक्रेटरी (CS), एलएलबी (LLB) आणि ICWA पदवीधरांना प्राधान्य दिले जाते. रेल्वेचा लेखाजोखा सांभाळणे, भांडवल उभारणी आणि पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक (Infrastructure & Investment) यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या तज्ज्ञांकडे सोपवल्या जातात.
३. रेल्वे सुरक्षा बल (RPF):
देशाच्या या अमूल्य संपत्तीच्या संरक्षणासाठी रेल्वे पोलीस विभाग म्हणजेच 'रेल्वे प्रोटेक्शन फोर्स' कार्यरत असते. सुरक्षेची आवड असलेल्या तरुणांसाठी हे एक उत्तम करिअर आहे.
निष्कर्ष
विद्यार्थ्यांनी नियमितपणे 'एम्प्लॉयमेंट न्यूज' (रोजगार समाचार) वाचणे आणि रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.indianrailways.gov.in) भेट देणे गरजेचे आहे. योग्य नियोजनाने शालेय पुस्तकांपासून सुरुवात केल्यास तुम्ही केवळ UPSC च नाही, तर रेल्वेमधील कोणत्याही उच्च पदापर्यंत पोहोचू शकता.

- अॅड. शैलेश कुलकर्णी
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि
करिअर समुपदेशक आहेत.)