युक्तिबाज वन्यजीव

बिनविषारी फुलपाखरे विषारी फुलपाखरांचे अनुकरण (mimicry) करत आपण विषारी प्रजातींसारखे असल्यागत भासवतात ज्यामुळे शिकारी त्यांचापासून दूर राहतात. रंग, आकार आणि हालचालींच्या मदतीने फुलपाखरे शिकाऱ्यांची फसवणूक करतात आणि स्वतःचे प्राण वाचवतात.

Story: साद निसर्गाची |
31st January, 10:46 pm
युक्तिबाज वन्यजीव

निसर्गात टिकून राहण्यासाठी वन्यप्राणी अनेक युक्त्या करत असतात. प्राण्यांनी वापरलेल्या हया युक्त्या अतिशय मजेशीर, विलक्षण व अनोख्या असतात. यापैकी एक अत्यंत रंजक व प्रभावी युक्ती म्हणजे मृत पावल्याचे नाटक करणे. शत्रूने हल्ला केल्यानंतर किंवा शत्रूच्या हल्ल्याची चाहूल लागल्यावर काही प्राणी आपली हालचाल पूर्णपणे बंद करतात. आपण मृत पडलो आहो हे भासवण्यासाठी हे प्राणी आपले शरीर एकदम सैल सोडतात. वन्यजीवांच्या हया वर्तनाला शास्त्रीय भाषेत ‘थॅनॅटोसिस’ किंवा ‘टॉनिक इमोबिलिटी’ (मृतवत निश्चलता) असे म्हणतात.

काल रात्री मी एक इंग्रजी सिनेमा बघत होते. सिनेमात एक मुलगी नाक मोडत आपल्या आईकडे मोठया भावाची तक्रार करते. भावाकडे बोट दाखवत ती म्हणते, "मॉमी, हि इज नॉट अॅटऑल स्लिपिंग. हि इज जस्ट playing possum टू अवॉयड द वर्क". इंग्रजी भाषेत ‘playing possum’ हे सुभाषित प्रचलित आहे. मृत असल्याचा आव आणणे/बेशुद्ध किंवा झोपेचं सोंग घेणे/जाणीवपूर्वक निश्चल राहणे/मृत असल्यासारखे भासवणे असा याचा अर्थ होतो, हे माहित होते. पण 'possum' म्हणजे? नक्की काय बरे असेल? हे जाणून घेण्यासाठी सहज शोधलं अन् ह्या म्हणीचा वन्यजीवाशी संबंध असल्याचे लक्षात आले.

 'playing possum' ही म्हण ‘ओपोसम’ हया अमेरिकन प्राण्यावरून अस्तिवात आल्याचे समजते. ‘ओपोसम’ हा प्राणी जीवाला काही धोका जाणवल्यास आपोआप निश्चल पडतो. हया अवस्थेत त्याचे शरीर सैल पडते, डोळे अर्धवट/उघडे राहतात आणि जीभ बाहेर येते. हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास मंदावतो. हया अवस्थेत ‘ओपोसम’ दुर्गंधीयुक्त द्रव सोडतो. हया द्रवामुळे त्याला कुजल्याचा दुर्गंध येतो ज्यामुळे भक्षक प्राणी त्याच्या आसपास सुद्धा भटकत नाही. कोल्हे, घार यासारखे शिकारी प्राणी बहुतेक मृत किंवा कुजलेले भक्ष खात नाही. ते जिवंत प्राण्याची शिकार करतात. धोका टळला की ओपोसम आपोआप पूर्वस्थितीत येतो.

पश्चिम घाटात आढळून येणारा नाकाड्या चापडा (हंप-नोज्ड पिट व्हायपर) हा विषारी साप शत्रूपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आपले शरीर जमिनीवर सपाट पसरवतो जेणेकरून तो आकाराने अधिक मोठा व भितीदायक दिसेल. त्याचे हे वर्तन शत्रूला घाबरवण्यासाठी पुरेसे असते. बिनविषारी हिरवा पाणसाप (ग्रीन किलबॅक) साप स्वत:च्या संरक्षणासाठी आपण भुजंग असल्यासारखा भासवतो. शत्रू आल्यास भुजंगासारखा फणा काढत शत्रूला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. उत्तर अमेरिकेत सापडणारा ‘हॉग-नोज्ड साप’ शिकारी प्राण्यांना फसवण्यासाठी मेल्याचे नाटक करतात. 

पश्चिम घाटात आढळणारे पाणघोणस, तस्कर, पट्टेरी कवड्या यासारखे साप स्वरक्षणसाठी मेल्याचं नाटक करतात. येथे आढळणारा 'बुश फ्रॉग' स्पर्श केला तरी हालचाल करत नाही. काही धोका जाणवल्यास तो निपचित पडून राहतो. उडी मारणे, आवाज करणे किंवा पळून जाण्यापेक्षा तो निपचित पडून राहणे पसंत करतो. मृत्यूचे नाटक करताना तो स्वतःला कोरड्या पानांसारखा भासवतो. धोका जाणवताच बुश फ्रॉग अचानक हालचाल थांबवतो व शरीर पूर्णपणे सैल सोडत श्वासोच्छ्वास अगदी मंद करतो. दूरून पाहता तो जिवंत आहे की नाही, हे ओळखणे कठीण होते. शिकारी बहुतेक वेळा हालचाल नसलेल्या भक्ष्याकडे दुर्लक्ष करतात. अश्या पद्धतीने बुश फ्रॉग स्वत:चा जीव वाचवतो. 

नाईटजार सारखा पक्षी किंवा हरणटोळ (ग्रीन वाइन) साप शिकाऱ्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी छद्मावरण (camouflage) करतात. हे प्राणी पश्चिम घाटातील घनदाट, रंगीबेरंगी व अंधुक जंगलाचा वापर करत स्वतःला लपवतात. इतकेच नव्हे तर काही बिनविषारी फुलपाखरे विषारी फुलपाखरांचे अनुकरण (mimicry) करत आपण विषारी प्रजातींसारखे असल्यागत भासवतात ज्यामुळे शिकारी त्यांचापासून दूर राहतात. रंग, आकार आणि हालचालींच्या मदतीने फुलपाखरे शिकाऱ्यांची फसवणूक करतात आणि स्वतःचे प्राण वाचवतात. पश्चिम घाटासारख्या जैवविविधतेने समृद्ध परिसंस्थेत ही युक्ती फुलपाखरांच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. ब्ल्यू मॉर्मन, ग्रेट एगफ्लाय, कॉमन मॉर्मन या फुलपाखरांची मादी शत्रू दिसताच विषारी फुलपाखरांचे अनुकरण करतात. रंग बदलून विषारी फुलपाखरासारखे दिसणे, पंखांची रचना किंवा उडण्याच्या पद्धतीचे अनुकरण करत बिनविषारी फुलपाखरे भक्षकांपासून स्वत:चे 

रक्षण करतात.


- स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या 

प्राध्यापिका आहेत.)