युनिटी मॉल : गोवा सरकारकडून जनतेची दिशाभूल

चिंबल ग्रामस्थांचा गंभीर आरोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
युनिटी मॉल : गोवा सरकारकडून जनतेची दिशाभूल

पणजी : चिंबल (Chimbal) येथे प्रस्तावित ‘युनिटी मॉल’ (Unity Mall) प्रकल्पाबाबत सरकारकडून सातत्याने दिशाभूल केली जात असल्याचा आरोप चिंबल ग्रामस्थांनी केला आहे. सरकार ही इमारत ४ मजली असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात ती ९ मजली असणार आहे, अशी धक्कादायक माहिती आरटीआय अंतर्गत समोर आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
युनिटी मॉलच्या विरोधात चिंबल ग्रामस्थांचे २८ डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे. १५ जानेवारी रोजी विधानसभेवर काढलेल्या मोर्चादरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला चर्चेचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे बुधवारी बैठक पार पडली, मात्र मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर आंदोलकांचे समाधान झाले नाही. प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार चिंबल जैवविविधता मंडळ समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी व्यक्त केला आहे.
युनिटी मॉल प्रकल्प ‘तोयार’ तळ्याच्या प्रभाव क्षेत्रापासून सुरक्षित अंतरावर असल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र, हा दावा खोटा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकल्पाचा तळ्यावर आणि पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचा आता एनआयओ आणि जलस्रोत विभागामार्फत नव्याने अभ्यास केला जाणार आहे.
आज होणार मोजमाप
युनिटी मॉलच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संबंधित जागेचे मोजमाप केले जाणार आहे. सरकार आणि ग्रामस्थांच्या दाव्यांमधील तफावतीमुळे या मोजमापावेळी पुन्हा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा