पर्यटनाचा आलेख उंचावला : २०२५ मध्ये विदेशी पर्यटकांचा आकडा ५ लाखांच्या घरात

पणजी : राज्यात गेल्या पाच वर्षांत साडेसोळा लाख विदेशी पर्यटकांनी (foreign tourists) गोव्याला पसंती दिली आहे. दरवर्षी या संख्येत सातत्याने वाढ होत असून, विदेशी पर्यटकांचा ओघ आता कोविडपूर्व काळाप्रमाणेच पुन्हा पूर्वपदावर येण्याचे संकेत मिळत असल्याची माहिती पर्यटन खात्याने दिली.पर्यटन खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२१ ते २०२५ या कालावधीत एकूण १६,२९,५४८ विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. २०२१ मध्ये कोविड काळात हा आकडा २२ हजारांच्या घरात होता. त्यानंतर २०२२ मध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन दीड लाखाचा टप्पा ओलांडला. २०२३ व २०२४ मध्ये ही संख्या ४.५० लाखांच्या वर गेली आणि २०२५ मध्ये विदेशी पर्यटकांचा आकडा तब्बल ४.९५ लाखांवर पोहोचला आहे. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये ४९,८९१ पर्यटकांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
राज्यात विदेशी पर्यटकांचा प्रवाह वाढवण्यासाठी पर्यटन खाते विशेष प्रयत्न करत आहे. गोव्यातील दोन्ही विमानतळ (दाबोळी आणि मोपा) २४ तास उपलब्ध असल्याने परदेशातून थेट विमान जोडणी सुलभ झाली आहे. याचा मोठा फायदा पर्यटनाला होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पर्यटन खात्याचे शिष्टमंडळ विविध देशांतील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून गोव्यातील कौटुंबिक पर्यटन आणि प्रोत्साहनपर योजनांची माहिती देत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील जाहिरात आणि पर्यटकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांमुळे गोव्याकडे परदेशी पर्यटकांचा कल वाढला असून, आगामी काळात ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता पर्यटन विभागाने वर्तवली आहे.
वर्षनिहाय विदेशी पर्यटकांची आकडेवारी
वर्ष पर्यटक
२०२१ : २२,१२८
२०२२ : १,६९,००५
२०२३ : ४,५२,७०२
२०२४ : ४,६७,९११
२०२५ : ५,१७,८०२