आमदार जीत आरोलकर, आंदोलनकर्त्यांच्या संघर्षाला यश

पेडणे : पेडणे तालुक्यातील (Pernem Taluka) आरोग्य सुविधेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला असून, तुये येथील १०० खाटांचे हॉस्पिटल (Hospital) अखेर गोवा वैद्यकीय महाविद्यालय (Goa Medical College) (गोमेकॉ) हॉस्पिटलला लिंक करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या काळात उभारलेल्या या वास्तूच्या पूर्णत्वासाठी आणि लिंक हॉस्पिटलच्या दर्जासाठी आमदार जीत आरोलकर व स्थानिक कृती समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
हे हॉस्पिटल गोमेकॉला जोडले जावे, यासाठी तुये हॉस्पिटल कृती समिती, पेडणे तालुका विकास समिती आणि नागरिकांनी तीव्र लढा दिला होता. सलग पाच दिवस धरणे आंदोलन आणि त्यानंतर काढण्यात आलेल्या भव्य 'मशाल यात्रे'ची दखल आमदार जीत आरोलकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना घ्यावी लागली. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाविरुद्ध नसून केवळ उत्तम आरोग्य सेवेसाठी असल्याने हजारो नागरिक यात सहभागी झाले होते.
आमदार आरोलकर यांचा सरकारकडे पाठपुरावा
आमदार जीत आरोलकर यांनी निवडून आल्यानंतर या अर्धवट इमारतीचे काम पूर्ण करण्यासह ते ‘लिंक हॉस्पिटल’ व्हावे यासाठी सरकार दरबारी सतत प्रयत्न केले. हॉस्पिटल लिंक करण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना आरोलकर म्हणाले की, आता गोमेकॉतील तज्ज्ञ डॉक्टर, सर्जन आणि सर्व आधुनिक सोयी-सुविधा तुये हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होतील. जनतेची रास्त मागणी सरकारने पूर्ण केल्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचे आभार मानतो.
३० तारखेकडे सर्वांचे लक्ष
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, हे हॉस्पिटल ३० तारखेला सुरू होणे अपेक्षित आहे. सध्याची आरोग्य व्यवस्था या नवीन इमारतीत कधी स्थलांतरित होणार आणि प्रत्यक्ष सेवा कधीपासून सुरू होणार, याकडे आता संपूर्ण पेडणेवासीयांचे लक्ष लागले आहे.