तिलारी खोऱ्यातील घनदाट जंगलात झाली इतर हत्तींशी भेट; वनविभागाने सोडला सुटकेचा निःश्वास

पणजी : गेल्या वर्षभरापासून आपला मूळ कळप सोडून गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांत एकाकी जीवन जगणारा 'ओंकार' नावाचा नर हत्ती अखेर आपल्या कुटुंबात पुन्हा सामील झाला आहे. किमान ६-७ महीने सिंधुदुर्ग ते पेडणे दरम्यान येरझाऱ्या मारून थकलेल्या या हत्तीचे कळपात परतणे ही वन्यजीव प्रेमींसाठी आणि वनविभागासाठी अत्यंत दिलासादायक घटना मानली जात आहे.

हत्ती हे निसर्गतः अत्यंत सामाजिक प्राणी असतात. त्यांच्या कळपाची रचना ही शिस्तबद्ध आणि एकमेकांना आधार देणारी असते. सामान्यतः मादी हत्ती कळपाचे नेतृत्व करते, तर तरुण नर काही काळानंतर कळपापासून वेगळे होऊन स्वत:चा मार्ग शोधतात. अंदाजे ८-९ वर्षांचा असलेल्या 'ओंकार' हत्तीचे कळपापासून दुरावणे जरा धक्कादायक होते. १३ सप्टेंबर २०२५ रोजी त्याने पहिल्यांदा महाराष्ट्रातून गोव्यात प्रवेश केला होता. पेडणे तालुक्यातील मोपा, तांबोसे आणि उगवे यांसारख्या गावांमध्ये त्याचा वावर होता. दिवसाढवळ्या लोकवस्तीत घुसणाऱ्या या हत्तीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते, तर दुसरीकडे त्याच्या एकटेपणामुळे वनविभागाला त्याच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची चिंता सतावत होती.

गेल्या काही महिन्यांत ओंकारने गोवा आणि महाराष्ट्र सीमेवरील दाट जंगलातून वारंवार ये-जा केली. ३१ नोव्हेंबरला त्याचे गोव्यात पुन्हा आगमन झाले आणि १० डिसेंबरला तो पुन्हा बांबर्डे-दोडामार्गच्या दिशेने परतला. अखेर बांबर्डेच्या जंगलात त्याला त्याच्या हक्काचा कळप भेटला. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, हत्तींना गंध आणि आवाजावरून आपल्या कळपाचा मागोवा घेण्याची नैसर्गिक शक्ती असते. एकट्या पडलेल्या हत्तीच्या आयुष्यात कळपाची साथ मिळणे हे त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, कारण कळपामुळेच त्यांना सुरक्षितता आणि अन्नाचा शोध घेणे सोपे जाते.

ओंकार हत्तीने गोवा आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागात शेतीचे प्रचंड नुकसान केले होते आणि तो वारंवार लोकवस्तीत येत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला होता. या पार्श्वभूमीवर, त्याला जेरबंद करून त्याचे पुनर्वसन गुजरातमधील जामनगर येथील 'वनतारा' या आशियातील सर्वात मोठ्या बचाव आणि पुनर्वसन केंद्रात करण्याबाबत प्राथमिक चर्चा वनविभागाच्या स्तरावर सुरू होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचसमोर याप्रकरणी सुनावणी देखील झाली.

अनेकदा अशा 'लोन टस्कर' (कळपापासून दुरावलेले नर हत्ती) प्राण्यांना नैसर्गिक अधिवासात राहणे कठीण जाते किंवा ते अधिक हिंसक होतात, अशा वेळी त्यांना 'वनतारा' सारख्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या केंद्रात हलवण्याचा पर्याय विचारात घेतला जातो. मात्र, ओंकारने कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वतःहून आपला नैसर्गिक कळप शोधून त्यात सामील होणे, ही एक अत्यंत दुर्मिळ आणि सुखद घटना मानली जात आहे. ओंकारचा जन्म तिलारी खोऱ्यातील हेवाळे परिसरातील जंगलातच झाला असल्याने, हा भाग त्याच्यासाठी पूर्णपणे परिचित आहे. ओंकार मुळस आणि हेवाळे परिसरात वावरत असताना, उर्वरित पाच हत्तींचा कळप पाळ्ये, मोर्ले आणि घोटगेवाडी भागात होता. गेल्या महिन्यात या कळपाने घोटगेवाडीत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे.

तिलारी खोरे हे गेल्या २-३ दशकांपासून हत्तींचा नैसर्गिक अधिवास राहिले आहे. येथील घनदाट जंगल, अन्नाची उपलब्धता आणि प्रजोत्पादनास अनुकूल वातावरणामुळे हत्तींच्या पिढ्या येथेच वाढत आहेत. ओंकारसह अन्य दोन पिल्लांचा जन्मही याच परिसरात झाल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. सध्या सहाही हत्तींचा (ओंकार, ओंकारची आई, गणेश, लहान मादी आणि दोन पिल्ले ) हा कळप मोर्ले परिसरात एकत्र संचार करत असून, ओंकारच्या या 'घरवापसी'ने वनविभागाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
![]()