दिलेल्या मुदतीत थकबाकी न भरल्यास जोडणी तोडण्याचा इशारा

मडगाव : मडगावजवळील राय येथील ग्रामस्थांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तब्बल ७७ दिवसांचे पाणी बिल एकत्रित पाठवल्याने अनेकांना २ ते ४ हजारापर्यंत बिल आले आहे. थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांना थेट पाणी जोडणी कापण्याच्या नोटिशी बजावण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
राय येथील स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून पाणी बिले नियमितपणे दिली गेली नाहीत. आता अचानक दोन-अडीच महिन्यांचे एकत्रित बिल मोठ्या रकमेसह पाठवण्यात आले आहे. हा उशीर खात्याकडून झाला असताना, त्याचा आर्थिक फटका आणि दंड ग्राहकांना का, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
स्थानिक रहिवासी अँथनी फर्नांडिस यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, अनेक महिने आम्हाला बिलेच मिळाली नाहीत. अचानक हजारो रुपयांची बिले भरण्यास सांगितले जात आहे. हे अन्यायकारक आहे. जर बिले वेळेवर आली असती, तर लोकांनी ती नियमित भरली असती. मारिया बर्बोसा या रहिवाशाने सांगितले की, पाणी ही मूलभूत गरज आहे. वाढीव बिले आणि वरून नळ कापण्याची धमकी यामुळे वृद्ध आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण आहे. म्हणणे ऐकून न घेता नोटिशी बजावणे हे प्रशासकीय असंवेदनशीलतेचे लक्षण आहे. पाणी जोडणी कापण्याच्या नोटिशी तत्काळ रद्द करण्यात याव्यात. प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन सुधारित बिले देण्यात यावीत. बिलिंगमध्ये इतका मोठा उशीर का झाला, याचे स्पष्टीकरण विभागाने द्यावे.
दरम्यान, काही नागरिकांनी यासंदर्भात स्थानिक सार्वजनिक बांधकाम कार्यालयात धाव घेतली, मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.
वाढीव बिलांवर संशय
केवळ बिलाची रक्कमच नाही, तर मीटर रीडिंगच्या अचूकतेवरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेकांच्या मते, प्रत्यक्ष वापर कमी असतानाही जास्त रीडिंग दाखवण्यात आले आहे. मीटर रीडिंग न घेताच अंदाजे बिले पाठवली असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.