आग आम्ही लावली नव्हती : अॅड. रावकडून जामिनासाठी युक्तिवाद

म्हापसा : आमच्या बर्च क्लबस्थळी (Birch Club) घडलेली दुर्घटना ही दुर्दैवी होती. त्याचे आम्हालाही दु:ख आणि वेदना आहेत. आमचे कर्मचारी त्यात मरण पावले. या दुर्घटनेला आम्हाला कारणीभूत धरता येणार नाही. कारण ज्या पायरो गनने (कृत्रिम फटाके) आग लागली, ती आम्ही घटनास्थळी लावली नव्हती, असा दावा सौरभ लुथरा (Saurabh Luthra) यांच्यातर्फे अॅड. पराग राव (Adv. Parag Rao) यांनी न्यायालयात केला.
मंगळवारी २० रोजी म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सौरभ लुथरा याच्या जामीन अर्जावर अॅड. परेश राव यांनी युक्तिवाद केला. तसेच गौरव लुथरा याच्या जामिनावर ज्येष्ठ वकील अॅड. सुबोध कंटक यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. त्यानंतर न्यायालयाने ही सुनावणी २२ जानेवारीपर्यंत तहकूब केली. त्यादिवशी फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकील या जामीन अर्जाच्या विरोधार्थ युक्तिवाद करतील.
ज्या वेळी ही दुर्घटना घडली (६ डिसेंबर), तेव्हा लुथरा बंधू त्यांच्या पूर्वनियोजित थायलंड (फुकेट) दौऱ्यावर होते. आमची पारपत्रे सध्या निलंबित आहेत, त्यामुळे देशाबाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही तपासाला पूर्ण सहकार्य करू आणि गोव्यातच उपलब्ध राहून तपासाला सहकार्य करू, अशी हमी वकिलांमार्फत देऊन जामीन अर्ज मंजूर करण्याची विनंती अॅड. राव यांनी न्यायालयाकडे केली.
सुनावणीदरम्यान घटनेच्या दिवशीचा तो व्हिडिओ न्यायालयात दाखवण्यात आला. यावेळी अॅड. राव यांनी युक्तिवाद केला की, स्टेजवर नृत्यांगना नृत्य करत असताना पायरो गनचा वापर झाला. हा प्रकार जो कोणी हाताळत होता, ती त्याची जबाबदारी होती. क्लबमध्ये आवश्यक सर्व अग्निसुरक्षा साधने उपलब्ध होती, ज्याची खरेदी बिले न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. आग नेमकी पायरो गनमुळे लागली की शॉर्ट सर्किट, तुटलेली वीज वाहिनी किंवा घातपातामुळे, हा सखोल तपासाचा भाग आहे.
दरम्यान, जिथे लाग पसरली, त्या डेकवर घटनेच्या वेळी १३० लोक उपस्थित होते. हे लोक तिथून सुखरूप बाहेर पडले. परंतु, जे व्यक्ती खाली बेसमेंटमध्ये गेले व तिथे असलेले कर्मचारी हे धुरामुळे मरण पावले. त्यामुळे एक्झीटचा अभाव किंवा अडथळ्यामुळे कुणी मरण पावले, असे म्हणता येणार नाही. क्लबला आग नेमकी कशामुळे लागली, हा तपासाचा भाग आहे. ही आग नेमकी पायरो गन, लुज वीज कनेक्शन, तारेचे तुटणे किंवा घातपात होता, हे तपास यंत्रणांनी शोधून काढावे, असे अॅड. राव म्हणाले.
यंत्रणेने पूर्वग्रह ठेवल्याचा आरोप
घटना घडल्यानंतर, आम्ही फुकेटहून येण्याची तयारी ठेवली. तसे आम्ही लेखी कळविले. आमचे मोबाईल फोन चालूच होते. परंतु, आमच्याशी संपर्क साधला गेला नाही. लुथरा बंधूंना मोठे परिश्रम करून पकडून आणले, हे भासविण्यासाठी यंत्रणेचा हा पूर्वग्रह होता. यासाठीच जाणूनबुजून आमचे पारपत्र १० डिसेंबरला निलंबित केले, असा दावा लुथरांच्या वतीने अॅड. राव यांनी न्यायालयात केला.
करारपत्रातील बनावटगिरीचा आरोप चुकीचा
क्लबचे मालक सुरेंद्रकुमार खोसला आणि लुथरा बंधूंच्या कंपनीमधील करारात घरक्रमांक नंतर जोडल्याचा पोलिसांचा दावा वकिलांनी फेटाळून लावला. तो क्रमांक पंचायतीच्या नोंदीमध्ये पूर्वीपासूनच असून, हा कंपनीचा अंतर्गत दस्ताऐवज असल्याने त्यात पोलिसांनी बनावटगिरीचा आरोप करणे चुकीचे असल्याचा दावाही अॅड. राव यांनी केला.