बनावट बँक हमी दिलेल्या कंपनीच्या मालकाची अटकपूर्व जामिनासाठी धाव

कांपाल-रेईस मागूश दरम्यान रोप वे प्रकल्पासाठी मिळविली होती निविदा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 mins ago
बनावट बँक हमी दिलेल्या कंपनीच्या मालकाची अटकपूर्व जामिनासाठी धाव

पणजी : मांडवी नदीच्या किनाऱ्यावर कांपाल आणि रेईस मागूश दरम्यान पर्यटन खात्याने रोप वे प्रकल्प हाती घेतला आहे. या संदर्भात निविदा प्राप्त झालेल्या कंपनीने बनावट बँक हमी दिल्याचे समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कंपनीच्या मालकांनी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० रोजी होणार आहे.
या प्रकरणी गोवा पर्यटन विकास महामंडळ लिमिटेड (जीटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक कपील पैगीणकर यांनी ४ जून २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, मांडवी किनाऱ्यावर ‘पणजी आणि रेईस मागूश दरम्यान प्रवासी रोपवेचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी जीटीडीसीने प्रवासी रोपवेचे विकास, संचालन आणि देखभाल’ करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार, रॉयल राईड्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत ९ डिसेंबर २०१६ रोजी सवलत करार करण्यात आला. या करारानुसार, कंपनीला बँक हमी देणे बंधनकारक होते. त्यानुसार, वरील कंपनीने जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेडची प्रत्येकी २,४५,००,००० रुपयांच्या २ बँक हमी सादर केल्या. याची रक्कम ४.९० कोटी आहे. या हमी संदर्भात सदर बँक शाखेकडे चौकशी केली होती. त्यानुसार, बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी २१ मे २०२५ रोजीच्या पत्राद्वारे सदर बँक हमी बनावट असल्याची माहिती दिली. अशी तक्रार पणजी पोलीस स्थानकात नमूद करण्यात आली आहे. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साईन शेट्ये यांनी कंपनीचे ताहीर अहमद याच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला. 

आज पुढील सुनावणी

पोलिसांनी रॉयल राईड्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक यांची चौकशी करण्यासाठी त्याच्याकडे पत्रव्यवहार केला. दरम्यान कंपनीचे मालक नाझीर अहम्मद भट, नासीर अहम्मद भट आणि शाईस्ता भट यांनी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० रोजी होणार आहे.             

हेही वाचा