घाणेकर कुटुंबीयांंच्या घरातील ३५ लाखांचा मुद्देमाल केला होता लंपास

पणजी : म्हापसा येथील डाॅ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा घालून घाणेकर कुटुंबीयांना बंधक बनवून घरातील ३५ लाखांचा मुद्देमाल पळवल्या प्रकरणी गुन्हा शाखेने संशयित राजू बी, सफिकुल अमीर यांच्यासह सहा फरार बांगलादेशी दरोडेखोराविरोधात सुमारे ३०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ३६ साक्षीदारांची साक्ष नमूद करण्यात आली आहे.
गणेशपुरी म्हापसा येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर ७ ऑक्टोबर रोजी सशस्त्र दरोडा घालण्यात आला होता. त्यावेळी दरोडेखोरांनी सुरीचा धाक दाखवून, कुटुंबीयांना बंधक बनवून आणि मारहाण करून सुमारे ३५ लाखांचा ऐवज त्यांनी लुटला होता. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ३३१ (३), ११५ (२), ३५१ (३), १२६ (२), ३१० (२), ६१ (२), १११ व ३ (५) या कलमांनुसार गुन्हा नोंद करून तपास सुरु केला. दरम्यान मुख्य दरोडेखोरांनी बांगलादेशात पळ काढला.
याच दरम्यान पोलिसांनी इब्बलुरू बंगळूरू येथील राजू बी. (२७) आणि सफिकुल रोहूल अमीर (३७) या दोघांना अटक केली. या दोघांनी सहा जणांच्या मुख्य टोळीला बांगलादेशमध्ये सुखरूप पळून जाण्यास मदत केली होती. अटक करण्यात आलेले मुख्य दरोडेखोरांचे नातेवाईक आहे. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग केले. त्यानंतर गुन्हा शाखेने तपासपूर्ण करून मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात राजू बी. (२७) आणि सफिकुल रोहूल अमीर (३७) याच्यासह फरार शेख नदीम खान, सुमन मल, मोहम्मद सैफूल मलीक आण मोहम्मद शाकायत याच्यासह इतर अज्ञात दरोडेखोर विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ रोजी होणार आहे.