कृती समितीचा इशारा : १५ रोजी भव्य मशाल मिरवणूक

तुये हॉस्पिटल कृती समितीच्या धरणे आंदोलनात सहभागी कार्यकर्ते. (निवृत्ती शिरोडकर)
..
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : तुये हॉस्पिटल गोमेकॉ हॉस्पिटलला लिंक करण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देत नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहील. या आंदोलनाअंतर्गत १५ जानेवारीला भव्य मशाल मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा तुये हॉस्पिटल कृती समितीने दिला. पहिल्या दिवशी, रविवारी हॉस्पिटल परिसरात साखळी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्थानिकांसह राज्यातील सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मांद्रेचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच प्रशांत ऊर्फ बाळा नाईक म्हणाले, तुये हॉस्पिटल गोमेकॉला लिंक करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समितीच्या शिष्टमंडळाला दिले होते. ते आश्वासन त्यांनी लेखी द्यावे आणि आरोग्याची समस्या सोडवावी. काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. जितेंद्र गावकर म्हणाले की, तुये हॉस्पिटल कृती समितीच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. लिंक हॉस्पिटलचा लाभ पेडणे तालुक्यातील जनतेला होईल. अत्याधुनिक सोयी सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होण्याची गरज आहे. पार्सेचे नागरिक रोहिदास आरोलकर यांनी सरकारने चालढकल केली तर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा दिला.
यावेळी आम आदमी पक्षाच्या नेत्या सुवर्णा हरमलकर, पेडणे नागरिक समितीचे अॅड. सदानंद वायंगणकर, झुजे लोबो, किशोर नाईक गावकर, संदेश सावंत, प्रणव परब यांनी विचार मांडले. आंदोलनाला गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कलंगुटकर, स्वप्नील शेर्लेकर, संजय राऊत, नारायण रेडकर, तुयेच्या सरपंच अमिता साळगावकर, आनंद साळगावकर, नीलेश कांदोळकर, संजय राऊत, तुळशीदास राऊत, संजय कोले, भास्कर नारुलकर, नारायण गडेकर, रोहिदास हरमलकर, उदय नागवेकर, स्नेहा नाईक, विल्सन परेरा, पंच उदय मांजरेकर, डॉ. वासुदेव देशप्रभू, तुळशीदास राऊत, चंद्रकांत कानोलकर, सुरेश हरमलकर, पुंडलिक धारगळकर, अॅड. प्रसाद शहापूरकर, सुवर्णा हरमलकर, उदय मांद्रेकर, अॅड. सदानंद वायंगणकर आदींनी पाठिंबा दिला.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन : देवेंद्र प्रभुदेसाई
पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई म्हणाले की, पेडणे तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नाशी हे हॉस्पिटल निगडित असल्याने आम्हाला कृती करावी लागत आहे. आठ वर्षापासून हॉस्पिटलची नवीन इमारत उभी आहे. या इमारतीत गोमेकॉशी संलग्न असलेले सुसज्ज लिंक हॉस्पिटल व्हावे, अशी पेडणेकरांची इच्छा आहे. मोपा विमानतळामुळे पेडणे तालुका नावारूपास येत असताना लिंक हॉस्पिटल महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
हॉस्पिटल सुरू होण्यासाठी अांदोलन सुरू केलेल्या तुये हॉस्पिटल कृती समितीचे अभिनंदन. सुसज्ज हॉस्पिटल सुरू होण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी समितीने घेतली आहे. सरकारने वेळ न दवडता हे हॉस्पिटल लिंक हॉस्पिटल म्हणून कार्यान्वित करावे.
_ राजन कोरगावकर, मिशन फॉर लोकल