प्रस्तावित युनिटी मॉलबाबतची भूमिका आमदारांनी स्पष्ट करावी !

आंदोलकांची मागणी : रुडॉल्फ फर्नांडिस यांच्या कार्यालयावर धडक


11th January, 11:17 pm
प्रस्तावित युनिटी मॉलबाबतची भूमिका आमदारांनी स्पष्ट करावी !

युनिटी मॉलविरोधात आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करताना चिंबल ग्रामस्थ. (कैलास नाईक)
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉलचा वाद अधिकच चिघळला आहे. आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी बोंदीर, सांताक्रूझ येथील आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. आमदार सरकारसोबत आहेत की चिंबलच्या जनतेसोबत, असा थेट सवाल करून ग्रामस्थांनी आमदारांच्या कार्यालयाला घेराव घातला. यावेळी ‘भायर यो भायर यो..’ ‘आमका नाका, आमका नाका युनिटी मॉल आमका नाका’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
आंदोलकांनी केवळ आमदारांचाच नव्हे, तर स्थानिक पंच आणि जैवविविधता समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांचाही तीव्र निषेध केला. ज्या जागेवर पूर्वी आयटी पार्क होणार होते, तिथे अचानक युनिटी मॉल कसा आला, असा सवाल करत कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प गावात होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी मांडली. २८ डिसेंबरपासून सुरू असलेले हे आंदोलन आता अधिक तीव्र झाले असून, तोयार तळ्याकाठी झालेल्या जाहीर सभेनंतर ग्रामस्थ कायदेशीर आणि रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत.


पाच प्रतिनिधी आले तर आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी : आमदार रुडॉल्फ
आंदोलनावर बाजू स्पष्ट करताना आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी आंदोलकांना चर्चेचे आवाहन केले. ते म्हणाले की, युनिटी मॉलला विरोध करणारे एकदाही माझ्याकडे चर्चेसाठी आले नाहीत. मी जमावाशी एकाच वेळी बोलू शकत नाही, मात्र पाच प्रतिनिधी चर्चेसाठी आले तर आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याची माझी तयारी आहे. शिविगाळ, आरडाओरडा सुरू असल्यामुळे मी बाहेर गेलो नाही. प्रेमाने संवाद साधल्यास मार्ग निघू शकतो. तोयार तळ्याला धोका पोहोचू दिला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनीही तळे सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. प्रकल्पाला मान्यता देताना सरकारने स्थानिकांना विश्वासात घ्यायला हवे होते.
आमदारांचे आरजी नेत्यांवर गंभीर आरोप
आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. आरजीचे नेते हिंसक पद्धतीने वागत असून ते जमिनींचे दलाल बनले आहेत. या नेत्यांना कोण आर्थिक मदत पुरवते याची मला माहिती असून योग्य वेळी त्यांची नावे जाहीर करेन, असा इशाराही आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी दिला.
युनिटी मॉलला परवाना देण्यात माझा सहभाग नाही : गौरी नाईक

युनिटी मॉलला परवाने वा मान्यता जिल्हा पंचायत देत नसते. युनिटी मॉलला परवाने वा मंजुरी देण्याला जिल्हा पंचायत सदस्य म्हणून माझा कोणताच सहभाग नाही, असे जिल्हा पंचायत सदस्य गौरी नाईक यांनी सांगितले. युनिटी मॉलाविषयी चर्चा करण्याची तयारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दाखवली आहे. आंदोलन करण्याऐवजी चर्चेेसाठी पुढे या, असे आवाहनही गौरी नाईक यांनी ‌आंदोलकांना केले.