लाईक्स, व्ह्यूज आणि हरवलेलं बालपण...

सोशल मीडियाच्या युगात मुलांचे बालपण कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये कैद होत आहे. लाईक्स आणि व्ह्यूजच्या शर्यतीत मुलांची निरागसता आणि गोपनीयता हरवत असून, पालकांनी 'सजग पालकत्वा'चा विचार करणे काळाची गरज आहे.

Story: मनी मानसी |
09th January, 09:42 pm
लाईक्स, व्ह्यूज आणि हरवलेलं बालपण...

“मुलं आठवणींसाठी नसतात; आठवणी मुलांसाठी असतात.”

कधीकाळी बालपण म्हणजे अंगणातल्या मातीत माखणे, गुडघ्यांवरचे खरचटणे, न केलेल्या गृहपाठासाठी ओरडा खाणे, भरपूर कल्ला करणे आणि दिवसाअंती थकून गाढ झोपी जाणे होते. त्या थकून जाण्यात एक नैसर्गिक निरागसपणा होता. परंतु आजचे बालपण मात्र कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये अडकलेले आहे; सोशल मीडियावरील लाईक्स, व्ह्यूज आणि तुलना यांच्या प्रकाशझोतात. ही मुलं जगतायत की फक्त जगण्याचं सादरीकरण करतायत, हा प्रश्न आता फक्त तत्त्वज्ञानाचा राहिलेला नाही; तो रोजच्या पालकत्वाचा देखील झाला आहे. नुकत्याच एका चर्चासत्रात प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी देखील याच विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता की, आपण आपल्या मुलांना आठवणी देतोय की अपेक्षांचं ओझं?

मुलांचे मेंदू “मी आहे” आणि “मी दिसतो” यांत फरक करायला शिकत असतात. पण सतत दिसणे आणि पाहिले जाणे, तेही कॅमेऱ्यात, ही प्रक्रिया ते पेलू शकत नाहीत. ज्यामुळे हळूहळू 'Self-worth' म्हणजे 'Engagement metrics' अशी शिकवण मनात घट्ट बसते आणि "मी कोण आहे" यापेक्षा "लोक मला कसं पाहतात" हेच महत्त्वाचं आहे असं वाटू लागतं. आरशात स्वतःला तपासणे, सतत दाद मागणे, “माझा व्हिडिओ किती जणांनी पाहिला?” असा प्रश्न विचारणे, याने 'Validation-seeking' वर्तन वाढते; त्याउलट, कौतुक थांबताच तितकीच अस्वस्थता वाढते.

पालकांची भूमिका: प्रेम की प्रेझेंटेशन?

पालक इथे खलनायक नसतात, कारण तेही या प्रवाहात अडकलेले असतात. “हे फक्त आठवणींसाठी” म्हणत घेतलेले फोटो, पण त्यासाठी दहा रिटेक्स, ठराविक पोझेस, कॅप्शन्स आणि त्या गडबडीत मुलाचं 'Spontaneous self' हरवत जातं. नकळत मूल ‘ब्रँड’ बनतं. अपूर्णतेचा ताण, समाजाशी तुलना हे सगळं पालकांकडून मुलांवर प्रोजेक्ट होतं. एक आई सांगते, “माझ्या मुलीला हसायचा कंटाळा आला होता, पण पोस्टसाठी हसावंच लागतं ना..” दुर्दैवाने त्या माऊलीला हे कळलंच नाही की त्या हसण्यात आनंद नव्हता, तर जबाबदारी होती.

याचे मुलांवर होणारे परिणाम 'ट्रॉमा लेन्स'मधून पाहिले तर...

  •  ओळखीचा गोंधळ: मला माझ्या अस्तित्वामुळे महत्त्व आहे की मी सादरीकरण करतो म्हणून? हा प्रश्न लहान वयातच मनात रुजतो आणि आत्ममूल्य कायम बाह्य मान्यतेवर अवलंबून राहतं.
  •  सीमारेषांचे उल्लंघन: गोपनीयता ही कधीच माझी नव्हती, अशी खोलवर जाणीव तयार होते. स्वतःचं आयुष्य सार्वजनिक मालमत्तेसारखं असल्याचा अनुभव त्यांना येतो.
  •  विकसन प्रक्रियेत व्यत्यय: मुलं प्रेक्षकांसाठी जन्मलेली नसतात. चुका, गोंधळ, विसर आणि मुक्त खेळ यांतूनच त्यांची व्यक्तिमत्त्वनिर्मिती होते.
  • भविष्यातील मानसिक जखमा: इंटरनेट विसरत नाही; पण मुलं विसरतात. कालच्या क्षणांची सार्वजनिक नोंद उद्याच्या ओळखीवर कायमची छाया टाकू शकते.
  •  संमतीचा अभाव: “नाही” म्हणण्याचा अधिकारच नसणे, हा अनुभव पुढील आयुष्यातही सीमारेषा (Boundaries) ओळखण्यात अडथळा ठरतो.

एक किशोरवयीन मुलगा सांगतो की, लहानपणीचे व्हिडिओ त्याचे मित्र त्याला आज शोधून दाखवतात; तो लाजतो, गोंधळतो कारण त्याच्या आठवणी त्याच्या हातात नाहीत. याने तो ओशाळून जातो व त्याच्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम होतो. त्याला चुकण्याची, विसरण्याची मुभा हवी असते; परंतु इंटरनेट विसरत नाही आणि मोठे झाल्यावर त्याच न विसरलेल्या क्षणांचे डिजिटल ठसे 'ट्रिगर' बनू शकतात.

त्यामुळे आजच्या पालकांनी स्वतःलाच हा प्रश्न आवर्जून विचारावा... ज्या गोष्टींसाठी संमतीच घेतली नाही, त्या आठवणी सुरक्षित कशा असतील? ही पोस्ट मी माझ्यासाठी करतोय/करतेय की माझ्या मुलासाठी?

'Attention' आणि 'Affection' यात फरक आहे. बालपण हे 'Sacred' (पवित्र) असतं, 'Scalable' नाही. 'Monetize' झालेलं बालपण परत विकत घेता येत नाही.

पालक काय करू शकतात?

  •  पोस्ट करण्यापूर्वी मुलाची स्पष्ट संमती घ्या.
  •  कॅमेऱ्याशिवायही आठवणी जपण्याचा प्रयत्न करा.
  •  तुलना टाळा; प्रयत्नांचं कौतुक करा.
  •  मुलाच्या ‘नाही’ ला मान द्या.
  •  डिजिटल ब्रेक्स (Digital Breaks) ठरवा.

कदाचित यासाठी उद्या एखादा कायदा येईल, कदाचित येणारही नाही. पण तोपर्यंत आपल्याकडे एक गोष्ट नक्की आहे, ती म्हणजे आपली जाणीव.

मुलांचं बालपण हे सुरक्षित असावं, नैसर्गिक असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते त्यांचं स्वतःचं असावं. प्रत्येक क्षण टिपला गेला नाही, तर तो हरवत नाही, तो मुलांच्या मनात साठतो. मुलं ‘इंटरनेट कंटेंट’ नाहीत, ती माणसं आहेत. त्यांना चुकण्याचा, लपण्याचा, हसण्याचा आणि कधी कुणालाच न दाखवता रडण्याचाही हक्क आहे. आज आपण जेव्हा त्यांची गोपनीयता जपतो, तेव्हा आपण त्यांच्या उद्याच्या सुरक्षिततेची बीजं पेरतो.

कदाचित पालकत्व म्हणजे सगळं दाखवणं नाही.. कॅमेऱ्यापेक्षा डोळ्यांनी पाहणं आणि लाईक्सपेक्षा नात्याची ऊब महत्त्वाची आहे हे उमगणं म्हणजेच सजग पालकत्व.

पुढच्या वेळी पोस्ट करण्याआधी आपण क्षणभर थांबलो, तर कदाचित एक मूल त्या क्षणात मोकळेपणाने जगेल. आपल्यासाठी नव्हे, स्वतःसाठी. जर हा लेख आज तुम्हाला अस्वस्थ करत असेल, तर तो योग्य ठिकाणी पोहोचलेला आहे.


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक, डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४