केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेत माहिती

पणजी : गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून एकूण ६३.२० कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. या निधीमध्ये केंद्र सरकारचा ७७ टक्के वाटा असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली आहे.
लोकसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन निधीतून अनुदान दिले जाते. तसेच वार्षिक बागायती व फळपिकांचे २ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात नुकसान झाल्यासही या निधीतून मदत मिळते.
नुकसान भरपाईच्या दरांनुसार, पावसाळी (कोरडवाहू) पिकांचे नुकसान झाल्यास ८,५०० रुपये प्रति हेक्टर, बागायती शेतांचे नुकसान झाल्यास १७,००० रुपये प्रति हेक्टर, तर बागायती व फळपिकांचे नुकसान झाल्यास २२,५०० रुपये प्रति हेक्टर इतकी भरपाई दिली जाते.
२०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शेतकऱ्यांना एकूण ६३.२० कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली असून, त्यापैकी ४८.८० कोटी रुपये केंद्र सरकारच्या वाट्यातून मिळाले आहेत. या कालावधीत दरवर्षी सरासरी १२ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, २०२४-२५ या आर्थिक वर्षातच १३.६० कोटी रुपयांची सर्वाधिक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच या निधीतील केंद्र सरकारचा वाटा २०२०-२१ मधील ९.६० कोटी रुपयांवरून २०२४-२५ मध्ये १०.४० कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट होते.
आपत्ती व्यवस्थापन निधीतून दिलेली नुकसान भरपाई
आर्थिक वर्ष नुकसान भरपाई (कोटी रुपये)
२०२०-२१ १२.००
२०२१-२२ १२.००
२०२२-२३ १२.८०
२०२३-२४ १२.८०
२०२४-२५ १३.६०