वाचताना अडखळणाऱ्या आमदाराबाबत उत्सुकता

Story: राज्यरंग |
04th December, 09:39 pm
वाचताना अडखळणाऱ्या आमदाराबाबत उत्सुकता

नुकत्याच स्थापन झालेल्या १८व्या बिहार विधानसभेचे पहिले अधिवेशन सोमवारी नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीने सुरू झाले. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी नियुक्त केलेले हंगामी अध्यक्ष नरेंद्र नारायण यादव यांनी सभागृहातील सदस्यांना शपथ दिली. पहिल्या दिवशी २४३ पैकी २३६ आमदारांनी शपथ घेतली. नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी काळात अनेक रंजक घटना घडल्या. शपथ वाचताना वारंवार अडखळणाऱ्या आमदार विभा देवी यांची सर्वाधिक चर्चा झाली.

हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू आणि मैथिली या पाच भाषांमध्ये आमदारांना शपथ लिखित स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली होती. अनेक आमदारांची शपथ घेण्याची पद्धत आणि निवडलेली भाषा यावर चर्चा झाली. जनता दल (यूनायटेड)च्या आमदार विभा देवी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांना कागदावर हिंदीमध्ये लिहिलेली शपथ नीट वाचता आली नाही. वाचताना त्या अडखळत होत्या. आमदार विभा देवी या ‘बाहुबली’ राजबल्लभ यादव यांच्या पत्नी आहेत. शपथ घेताना त्यांना शब्दांचा योग्य उच्चार जमत नव्हता. शपथ वाचताना त्या म्हणाल्या- ‘‘मी ईश्वराची सतत घेते...’’ म्हणजे त्यांनी ‘शपथ घेते’ याला ‘सतत घेते’ असे म्हटले. त्यांनी कसेबसे शपथपत्र वाचून पूर्ण केले.

विभा देवी यांनी नवादा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केला आहे. पण हा विजय प्रत्यक्षात त्यांचा नाही तर त्यांचे बाहुबली पती राजबल्लभ यादव यांचा आहे. राजबल्लभ यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. निवडणुकीच्या काही काळ आधी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. राजबल्लभ हे पूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे नेते होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते जनता दल (यू) मध्ये दाखल झाले.

विभा देवी यांच्या शपथविधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओवर विविध कमेंट्स केल्या जात आहेत. काही लोक अशा आमदाराला बिहारचे दुर्दैव म्हणत आहेत. विभा देवींना लिहून दिलेले वाचताना अडखळायला होते, यावरून त्या खूप कमी शिकलेल्या आहेत, हे स्पष्ट होते. निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वत:ला ‘साक्षर’ म्हटले आहे. त्यांचे शिक्षण ‘साक्षर’ असले तरी प्रतिज्ञापत्रातून त्यांचे वैभव दिसून आले आहे. 

लिहून दिलेले वाचताना अडखळणाऱ्या विभा देवी मतदारसंघाचा कारभार कसा सांभळतात, त्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतात का, बेराजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह मतदारसंघाचा विकास साधतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- प्रदीप जोशी