
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यानंतर जागतिक समीकरणे ज्या वेगाने बदलू लागली आहेत, त्याचे सर्वात तीव्र प्रतिबिंब दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये उमटताना दिसत आहे. अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याभोवती अमेरिकेने अशी कोंडी केली आहे की, त्यांना राजकीय श्वास घेणेही कठीण झाले आहे. ट्रम्प प्रशासनाचा ताज्या निर्णयाने तर जग दचकून गेले. अमेरिकेने व्हेनेझुएलाची संपूर्ण हवाई हद्द बंद केली आहे. हा निर्णय म्हणजे मादुरो यांच्या सत्तेच्या ताबूतातील अखेरचा खिळा मानला जात आहे.
ट्रम्प नेहमीच शब्दांपेक्षा कृतीला महत्त्व देतात. निवडणुकीतूनच त्यांनी व्हेनेझुएलामध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित करणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले होते. मादुरो यांनी जनमत नाकारून ज्या प्रकारे सत्ता टिकवली, ते अमेरिकेला कधीच मान्य नव्हते. त्यामुळेच अमेरिकेने एद्मुंदो गोन्झालेझ यांना व्हेनेझुएलाचे वैध अध्यक्ष म्हणून मान्यता दिली. आतापर्यंत आर्थिक निर्बंध, राजकीय दबाव यावर चालणारी लढत आता हवाई नाकाबंदीत रूपांतरित झाली आहे. व्हेनेझुएलाच्या आकाशात अमेरिकेची परवानगी नसताना कोणतेही विमान उडू शकत नाही. त्यामुळे मादुरो यांची पळून जाण्याची शक्यता जवळजवळ शून्यावर आली आहे. सीमेजवळ तैनात असलेल्या अमेरिकन लढाऊ विमानांची उपस्थिती हा संकेत अधिक स्पष्ट करते. शिवाय, रशिया किंवा इराणसारखे मादुरो समर्थक देशदेखील त्यांना मदत करण्यासाठी व्हेनेझुएलात उतरू शकत नाहीत. ही केवळ नो-फ्लाय झोन नसून एका देशाला जगापासून पूर्ण तोडण्याची रणनीती आहे. यामुळे मादुरो सरकारची रसद, शस्त्रसाठा आणि संवादाचे मार्ग जवळजवळ संपुष्टात येऊ शकतात.
ट्रम्प यांनी दिलेला संदेशही तितकाच कठोर आहे. ‘सत्ता शांततेने सोडा, अन्यथा परिणाम भयानक असतील.’ त्यांनी मादुरोंना अमेरिकेच्या तुरुंगाचे दार खुले असल्याचा उघड इारा दिला आहे. परिस्थिती पाहता, मादुरो यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांनीही आता बाजू बदलणे सुरू केले, तर आश्चर्य ठरणार नाही. बुडत्या जहाजावर कोणीही टिकत नाही. या संघर्षाचा सर्वात मोठा फटका मात्र सामान्य व्हेनेझुएलन नागरिकांनाच बसत आहे. वर्षानुवर्षे आर्थिक संकटात होरपळून निघालेल्या या जनतेसमोर आता आशा आणि भीती यांचा अनिश्चित संगम निर्माण झाला आहे. एकीकडे मादुरो राजवटीपासून सुटका, तर दुसरीकडे संभाव्य लष्करी कारवाईचे सावट.
अमेरिकेने हवाई हद्द बंद करणे हे सर्वसाधारणपणे युद्धापूर्वीचे शेवटचे पाऊल मानले जाते. ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्यावर एक गोष्ट तरी स्पष्ट झाली आहे. ते व्हेनेझुएलाचा प्रश्न आता हवेत टांगून ठेवणार नाहीत. मादुरो यांच्या पुढे फक्त दोनच वाटा उरल्या आहेत: शरणागती किंवा संपूर्ण पतन. पुढील काही दिवस या देशाचे भविष्य ठरवणारे ठरणार आहेत. कारण सध्या व्हेनेझुएलाच्या आकाशात दिसणारी शांतता ही खऱ्या वादळापूर्वीची शांतता आहे.
- सचिन दळवी