
उत्तराखंडमध्ये मतदार याद्यांची अचूकता वाढवण्यासाठी निवडणूक आयोग लवकरच विशेष गहन पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया सुरू करणार आहे. डिसेंबर २०२५ अथवा जानेवारी २०२६ पासून ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. इतर राज्यांतून विवाह करून उत्तराखंडमध्ये आलेल्या महिलांसाठी ही प्रक्रिया विशेष महत्त्वाची ठरणार आहे. मतदान प्रक्रियेची पारदर्शकता आणि मतदार याद्यांची विश्वसनीयता राखण्यासाठी आयोगाने पुढाकार घेण्याचे ठरवले आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी, उत्तराखंड यांच्या कार्यालयाने २००३ सालची मतदार यादी अलीकडे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. देशातील काही राज्यांत विशेषतः उत्तर प्रदेशात २००३ ची मतदार यादी आधीच ऑनलाईन करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या मते, ही जुनी यादी मतदारांच्या मूळ नोंदी तपासण्यासाठी उपयुक्त ठरत असून, स्थलांतर किंवा विवाहानंतर बदललेल्या पत्त्यांच्या सत्यतेची खात्री करण्यासाठी ती संदर्भ बिंदू म्हणून वापरली जात आहे.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, २००३ नंतर इतर राज्यांतून विवाह करून उत्तराखंडमध्ये आलेल्या महिलांना ‘एसआयआर’ दरम्यान आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. जर त्यांचे नाव त्यांच्या माहेरच्या राज्यातील २००३ च्या मतदार यादीत नोंदलेले असेल, तर त्या नोंदीची प्रत आणि अतिरिक्त माहिती सादर करणे बंधनकारक असेल. ज्यांचे नाव त्या काळात मतदार यादीत नव्हते, त्यांनी आई-वडिलांची २००३ मधील नोंद, मतदान विभाग, ओळख तपशील असे सर्व पुरावे जमा करावे लागतील.
निवडणूक आयोगाने या प्रक्रियेचा उद्देश कोणालाही अडचणीत आणणे नसल्याचे स्पष्ट केले आहे. मतदार यादीतील दुहेरी नोंदी रोखणे, स्थलांतरितांच्या नोंदी अचूक करणे तसेच अनेक वर्षांत झालेल्या बदलांची व्यवस्थित पडताळणी करणे हाच यामागील प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः विवाहानंतर महिलांनी नव्या पत्त्यावर स्थलांतर केल्यामुळे त्यांच्या नोंदी जुन्या आणि नव्या दोन्ही ठिकाणी राहण्याची शक्यता असते. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये कोणतीही विसंगती राहू नये, यासाठी ‘एसआयआर’ आवश्यक मानले जात आहे.
सध्या राज्यातील मतदार यादी अद्याप ‘फ्रीज’ करण्यात आलेली नाही. परिणामी नागरिकांना नाव दुरुस्ती, पत्ता बदल, नवीन नावे समाविष्ट करणे किंवा अनावश्यक नावे वगळणे इत्यादी सर्व सुधारणा तत्काळ करता येत आहेत. अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ‘एसआयआर’ सुरू होण्यापूर्वी शक्य त्या सुधारणा करून घ्याव्यात, कारण पुनरीक्षण सुरू झाल्यावर कागदपत्रांची मागणी आणि पडताळणीची प्रक्रिया विस्तृत होणार आहे.
- प्रसन्ना कोचरेकर