बनाव उघड

पूजा नाईकने आपण गोव्यातील ६१३ उमेदवारांकडून सरकारी नोकरी देतो सांगून पैसे घेतले होते, असे सांगितले होते. ते ज्या व्यक्तीला दिल्याचे ती सांगते ती व्यक्ती अस्तित्वातच नाही, असेही पोलिसांना आढळले आहे. म्हणजे तिने केलेला सगळाच बनाव होता, हे आतापर्यंतच्या तपासातून उघड झाले आहे.

Story: संपादकीय |
22 hours ago
बनाव उघड

नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे घेण्याच्या प्रकरणातील प्रमुख संशयित पूजा नाईकने केलेले सगळे दावे खोटे ठरले आणि आरोपही तथ्यहीन असल्याचे पोलिसांनी चौकशीनंतर जाहीर केल्यामुळे एकूणच हा बनाव पूजाने रचला होता, हे अखेरीस स्पष्ट झाले. जिल्हा पंचायत निवडणुका जवळ आलेल्या असताना पूजा नाईकला कोणीतरी पडद्यामागच्या सूत्रधारांनी पुढे करून मंत्री, अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचे बोलायला लावले होते, असा संशय पूर्वीपासूनच व्यक्त होत होता. पूजा नाईकने दिलेली माहिती आणि केलेली विधाने साफ खोटी निघाली, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गुन्हा शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पूजा नाईक, तिचा पती आणि मुलींच्या खात्यांमध्ये २०१९ ते २०२४ या दरम्यान ८ कोटींचे व्यवहार झाले आहेत. पूजा नाईकने आपण गोव्यातील ६१३ उमेदवारांकडून सरकारी नोकरी देतो सांगून पैसे घेतले होते, असे सांगितले होते. ते ज्या व्यक्तीला दिल्याचे ती सांगते ती व्यक्ती अस्तित्वातच नाही, असेही पोलिसांना आढळले आहे. म्हणजे तिने केलेला सगळाच बनाव होता, हे आतापर्यंतच्या तपासातून उघड झाले आहे. तिने अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचे पुरावे नाहीत. तिने ज्या फोनमध्ये व्हिडिओ होते, ते पोलिसांना दिल्याचे म्हटले होते. पण तो फोन तिच्या पतीने एका व्यक्तीला कधीचा विकला होता, असे तपासात निष्पन्न झाले. तिने तन्वी नाईक नावाच्या महिलेला पैसे दिल्याचे सांगितले होते, पण ती महिला कुठेच तपासावेळी सापडली नाही. ती महिलाच अस्तित्वात नाही. आता पूजा आपण तन्वीला ओळखत नाही असे सांगते. पर्वरीतील ज्या फ्लॅटमध्ये पैसे दिल्याचे ती सांगते, तो फ्लॅट कधीच सरकारी कामांसाठी वापरात नव्हता. तिथे विद्यार्थी भाड्याने राहतात. मगो पक्षाच्या कार्यालयात ती कधी कामाला होती, याचेही पुरावे सापडलेले नाहीत किंवा हजेरीपटावरही तिचा उल्लेख नाही. म्हणजे तिने रचलेली सगळी कहाणीच खोटी निघाली आहे. तिच्यावर विश्वास ठेवून, तिच्या मुलाखतींना महत्त्व देणाऱ्या प्रसारमाध्यमांचीही तिने चेष्टा केली आहे. सर्वांनाच आपण साव असल्याचे दाखवून तिने मुलाखती दिल्या, पण त्यातला शब्दान् शब्द खोटा निघाला. ती लोकांकडून पैसे घेऊन चैनीचे जीवन जगली; तिला पैसे गोळा करण्याचे व्यसन लागले होते, असेच तिच्या वागण्यातून उघड होते. पोलीस तपासातही तिने पैशांची कशी चैन केली, ते उघड झाले आहे. 

पूजाकडे ६ अलिशान गाड्या आणि तीन जेसीबी आहेत. मंडूर - तिसवाडी येथे घरावर ४५ लाख, बेतकी - खांडोळा येथील घरावर ४५ लाख, डोंगरी येथे मंडप बांधण्यासाठी १५ लाख रुपये खर्च केले तर पूजा आणि तिच्या पतीने मिळून १ कोटीचे दागिने विकल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर तब्बल ६१३ लोकांकडून पैसे घेणाऱ्या या महिलेचे कारनामे लोकांच्या लक्षात आले नाहीत. शिकलेले लोक तिच्या भूलथापांना बळी पडले आणि आपले पैसे गमावून बसले. आज तेच पैसे पूजा नाईककडे परत मागणाऱ्यांना ती उत्तरे देणे टाळत आहे. लोकांना पैसे परत देतो असे दाखवून देण्यासाठी ती अधिकाऱ्यांच्या नावांचाही वापर करत असावी. यदाकदाचित अधिकाऱ्यांकडे तिने व्यवहार केलेही असतील, पण तिथे पुरावेच नाहीत तर ते अधिकारी आरोप कसे मान्य करतील? 

कर्मचारी भरती आयोग स्थापन झाल्यानंतर नोकऱ्या मिळणे कठीण झाल्याचे लक्षात आल्यामुळे लोक जेव्हा पैसे मागू लागले, तेव्हाच हा गंभीर प्रकार समोर आला. जर आयोग स्थापन झाला नसता आणि मंत्र्यांच्या हातीच नोकऱ्या देण्याचे अधिकार असते, तर पूजा नाईक असो वा पैसे घेतलेले इतर आरोपी असो, त्यांचे कारनामे इतक्या लवकर उघड झाले नसते. अजूनही कितीतरी लोक गंडवले गेले असते. अशा बनवाबनवी करणाऱ्या लोकांच्या नादी सुशिक्षित लोकांना लागू नये, गुणवत्तेवर नोकरी मिळवण्यासाठी मेहनत करावी. घामाचे पैसे अशा लोकांना देऊन स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यापेक्षा मेहनतीने काम मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. फसवणारे पावलोपावली भेटतील. जोपर्यंत पैसे देणारे आहेत, तोपर्यंत पैसे घेणारेही तयार होतील.