
श्री दत्त पद्मनाभ पीठ हे देव, देश आणि धर्म यांसाठीचे महान कार्य अखंडित दिव्य सद्गुरु परंपरेच्या अधिष्ठानाखाली कार्यरत आहे. श्री भगवान दत्तात्रेय स्वामी, श्रीपाद वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, सद्गुरु सिद्धपादाचार्य स्वामीजी, सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामीजी, सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजी, सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजी, सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी तथा विद्यमान पीठाधीश्वर सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी या भव्य-दिव्य अखंडित पूज्य सद्गुरु परंपरेचे अधिष्ठान म्हणजे या पूज्य गुरुपीठाचा मानदंड होय.
या गुरुपीठाच्या सद्गुरु परंपरेची शिकवण सामान्यातील सामान्य मनुष्य जीवनात सद्गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व पटवून देणारी आहे. गोरगरीब कष्टकरी समाज सुशिक्षित व सुसंस्कारित व्हावा, या उदात्त हेतूने या पीठाने कार्य करून समाजाला सन्मार्गाची दिशा दाखवली. आध्यात्मिक ज्ञानाचे बाळकडू श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या दिव्य सद्गुरु परंपरेने समाजाला प्रदान केले आहे.
सद्गुरु चरित्र : सद्गुरु
सुशेणाचार्य स्वामीजी
सत्यश्रेष्ठ गुरुगम्य ईश्वरी ज्ञानोपदेशक सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामीजींनी संप्रदायाच्या विस्तारासाठी आपल्या असंख्य शिष्यांतून सोळा भारती नियुक्त केले होते, व धर्मोपदेशाची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली. त्यातील सोळावे भारती म्हणजे सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजी यांची गोमंतकात नियुक्ती करण्यात आली.
बालपण आणि प्रारंभिक जीवन
सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजींचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातोसे गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे जन्मनाव संभाजी, आईचे नाव सीताबाई व वडिलांचे रामजी मांजरेकर होते. त्यांचा परंपरागत झाडपाल्याच्या औषधविद्येच्या माध्यमातून परोपकार व शेती व्यवसाय होता. पूजनीय स्वामीजींच्या बालवयातच वडिलांचे अकाली निधन झाल्यामुळे, पालनपोषणाची जबाबदारी आईवर आली. गरीब परिस्थितीमुळे त्यांना कधीच शाळेत जाणे झाले नाही. लहानपणी चुकलेल्या, भरकटलेल्या गुरांना योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांच्या हाती काठी आली. जसे वय वाढत गेले तसे काठीबरोबर नांगर हाती आला. जमिनीची मशागत करून भूमी सुजलाम्-सुफलाम् करण्याचे कार्य त्यांनी केले.
जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग
स्वामीजी अवघ्या चौदा वर्षांचे असतानाचा हा प्रसंग आहे. पावसाळ्याचे दिवस होते, श्रावणमास. झाडपाल्याच्या वनस्पती शोधण्यासाठी ते तेरेखोल नदी ओलांडून गोमंतक हद्दीत आले. अचानक नदीला पूर आला आणि पाण्याचा प्रवाह खूप जोरात होता. अंधार दाटून येत होता, त्यामुळे लवकर घरी जाण्यासाठी स्वामीजींनी स्वतःला नदीत झोकून दिले. पोहून पोहून हातपाय थकले आणि दमछाक झाल्यामुळे स्वामीजी पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊ लागले.
बुडायला होणार म्हणून त्यांनी ईश्वराचा धावा केला. त्यावेळी "पोरा भिऊ नकोस" असा धीरगंभीर आवाज स्वामीजींना ऐकू आला. एका जटाधारी तेजःपुंज महापुरुषाने त्यांच्या पोटाखाली हात घालून त्यांना अलगद सुखरूप काठावर आणले व 'बाळा सुखरूप राहा' असा आशीर्वाद देऊन ती भव्य दिव्य मूर्ती अदृश्य झाली. हा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महासत्पुरुष अर्थात सद्गुरूंनीच मला वाचविले याची त्यांना मनोमय खात्री झाली. त्या क्षणाचे प्रतिबिंब स्वामीजींच्या मनात कोरले गेले आणि सद्गुरु चरणी कृतज्ञता व्यक्त करून ते घरी परतले. तेव्हापासून त्या महापुरुषाच्या दर्शनाची तळमळ त्यांच्या मनात वाढतच गेली.
सद्गुरु चरणी नतमस्तक
पुढे नोकरीच्या शोधात स्वामीजी मुंबईला गेले. करीरोड येथे गिरणगावात, गिरणीत त्यांना नोकरी मिळाली. एक दिवशी फिरायला गेले असता वाटेत त्यांना त्यांच्याच गावचा एक गृहस्थ भेटला, जो श्री सद्गुरुभेटीस जात होता. त्यावेळी करीरोड येथील श्री दत्त मंदिरात सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामीजींचे वास्तव्य होते. सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामीजींनी त्यांना जवळ बोलावले आणि विचारले की, "पोरा मला ओळखलेस?" हा दिव्य आवाज ओळखीचा होता. तोच आवाज, तीच तेजःपूंज मूर्ती पाहून नदीतील त्या प्रसंगाची आठवण झाली आणि सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजींनी सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामीजींच्या चरणी मिठी मारली, नतमस्तक झाले आणि म्हणाले, "हे सद्गुरो, त्यावेळी पाण्यातून वर काढलेत, आता भवसागरातून वर काढा व माझा उद्धार करा."
सिद्धपदाचे अधिकारी
यानंतर सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजींचा सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामीजींच्या दर्शनाचा ओढा वाढतच गेला. एके दिवशी त्यांना सद्गुरु पद्मनाभ स्वामीजींकडून सत्यश्रेष्ठ ज्ञानाची दीक्षा प्राप्त झाली व गुरुगृहाचे नाव श्री सुशेणाचार्य स्वामी असे ठेवण्यात आले. एकनिष्ठ सद्गुरुसेवा, कठोर साधना आणि तपामुळे ते सिद्धपदाचे अधिकारी झाले. अक्षर ओळख नसतानाही त्यांनी शब्द, वाणी, दासबोध यावर प्रभुत्व संपादन केले.
गोमंतकात संप्रदायाची मुहूर्तमेढ
संप्रदायाचा प्रसार-प्रचार करण्यासाठी सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामीजींनी त्यांना 'जा व गोमंतकातील कचरा साफ कर' अशी आज्ञा केली. सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजींनी मुंबईतील नोकरी सोडून आपल्या सद्गुरुंच्या आज्ञेचे पालन करत स्वगावी आले आणि परकीय सत्तेच्या अमलाखाली असलेल्या गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला.
गोमंतकातील पुराणप्रसिद्ध तीर्थ क्षेत्राच्या परिसरातील हातुर्ली गावाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले व तेथेच देव, देश व धर्म कार्य विस्तारार्थ संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. तेथे त्यांनी प्रतिवर्षी श्रावणमासात यज्ञोपवित धारण विधी आणि जन्माष्टमी हे दोन उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली. बालपणी भरकटलेल्या गुरांना मार्गावर आणले, नांगर घेऊन जमिनीची मशागत केली. त्याचप्रमाणे सिद्धपदाचा अधिकार प्राप्त झाल्यावर, त्यांनी वाट चुकलेल्या माणसांना योग्य मार्गावर आणले.
समाधी आणि पुण्यतिथी
सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजींनी पोर्तुगीज शासित राज्य असतानासुद्धा गोमंतकात हे दिव्य महान कार्य केले आणि आपल्या पश्चात् संप्रदायाचे अलौकिक कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी अखंड सद्गुरु परंपरेचे उत्तरदायित्व आपले परमशिष्य सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजींकडे सुपूर्द केले.
सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजी श्रीदत्त जयंती शुभदिनी (मार्गशीर्ष पौर्णिमा, श्रीशके १८५५, शुक्रवार, १ डिसेंबर १९३३) रोजी, पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी भ्रूमध्यावर दृष्टी लावून 'अक्षय अमर अलक्ष सुदर्शन' या महामंत्राचा उद्घोष केला आणि दीर्घ प्रणवोच्चार करून समर्थपदी लीन झाले. सातोसे (सिंधुदुर्ग) येथे त्यांचे दिव्य समाधी स्थान आहे. आज (गुरुवारी) मार्गशीर्ष पौर्णिमा श्रीदत्त जयंती तसेच सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजींचा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सद्गुरुंच्या श्रीचरणी कोटी कोटी अभिवादन, जय सच्चिदानंद!