गोवा फिल्म सिटीला पर्यटन, सांस्कृतिक सादरीकरणे आणि जागतिक दर्जाच्या आदरातिथ्याशी जोडणारे एक लँडमार्क केंद्र म्हणून विकसित करून योग्य प्रकारे राबविल्यास, या प्रकल्पातून गोव्याला दीर्घकालीन आर्थिक, सांस्कृतिक आणि रोजगारविषयक लाभ मिळू शकतात.

भारताच्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पडदा नुकताच पडला. गोव्यात आता 'इफ्फी'ने ऐन पंचविशीत पाऊल ठेवले आहे. तीन दशकांहून अधिक काळ उलटल्यानंतर 'इफ्फी'ला स्वत:चे असे हक्काचे घर मिळाले नव्हते. गोव्याच्या रूपाने चोवीस वर्षांपूर्वी इफ्फीला घरही मिळाले. गोव्यात आपल्या घरात ऐन पंचविशीत प्रवेश करणाऱ्य 'इफ्फी'कडून साहजिकच बऱ्याच अपेक्षा जगभरातील सिनेमा रसिकांना होत्या आणि अजूनही आहेत. चोवीस वर्षांचा हा काळ तसा लहान म्हणता येणार नाही. 'इफ्फी'ला गोव्यात हक्काचे घर देताना देणाऱ्यांनी आणि घेणाऱ्यांनीही एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच तसा निर्णय घेतला असावा. आता दोन तपांच्या काळात 'इफ्फी' गोव्यातील आपल्या हक्काच्या घरात किती रुजला, किती बहरला हा चर्चेचा विषयही ठरू शकेल, पण एखाद्या त्रयस्थाला त्याबाबत विचारले गेल्यास इफ्फी जेथे होता तेथेच आहे असेच साधारणत: उत्तर कदाचित ऐकण्यास मिळेल. इफ्फीच्या आयोजनातून वा इफ्फीला हक्काचे घर दिल्याने गोव्यातील पर्यटन उद्योगालाही चालना मिळेल, हेही एक उद्दिष्ट होते आणि त्याचा विचार करता त्या आघाडीवर निश्चितच फायदा झाला हे मान्य करावेच लागेल. पण मुख्य उद्दिष्ट ते नव्हते तर निसर्गरम्य गोव्यात चित्रपट संस्कृती रुजावी, चित्रपट निर्मितीचे हे जागतिक केंद्र व्हावे, हा प्रयत्न होता पण चोवीस वर्षांनंतरही गोव्यात इफ्फीसाठी सुसज्ज असा कन्व्हेंशन हॉल मिळत नाही आणि फिल्म सिटीच्या निर्मितीवर तर ठोस असे एक पाऊलही पुढे पडत नाही. फिल्म सिटीची निर्मिती ही गोव्यासाठी काळाची गरज असून कोणत्याही परिस्थितीत सरकारला 'फिल्म सिटी'चे शिवधनुष्य उचलावेच लागेल.
गोव्यात मागील अनेक वर्षे 'इफ्फी'त प्रत्यक्ष सहभागी होणारे सिने रसिक एकच गोष्ट अगदी नियमितपणे ऐकत परततात, ती म्हणजे आम्हाला गोवा हे चित्रपट निर्मितीचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनवायचे आहे. यंदाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याहून वेगळे काही बोलले नाहीत, इफ्फीच्या उद्घाटन समारंभात असो वा समारोपाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री तेच बोलले जे आम्ही मागील काही वर्षे नेमाने ऐकत आहोत. मुख्यमंत्री म्हणाले, "इफ्फी हा सर्जनशीलता आणि कलात्मकतेचा उत्सव आहे. क्रिएटिव्ह माईन्डस अंतर्गत तरुण निर्माते त्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाने सिनेमाचे भविष्य घडवत आहेत. भविष्याकडे पाहताना आमचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. आम्ही गोव्याला चित्रपट हब बनवणार आहोत. जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कार्यरत राहू." मुख्यमंत्री गोव्याला चित्रपट निर्मितीचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनवू पाहतात याचा आनंदच आहे, मग त्या दिशेने निदान एक तरी पाऊल उचलण्याची तयारी हवी ना. चोवीस वर्षे उलटली, पण त्या दिशेने एखादे ठोस पाऊल उचललेले दिसत नाही. चोवीस वर्षांच्या काळात आम्ही नेमके काय साध्य केले हे कळत नाही. कोकणी असो वा मराठी चित्रपटांची गोव्यात होणारी निर्मिती लक्षणीयरीत्या घटल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे, त्या आघाडीवर निदान धोरणात्मक निर्णय घेऊन गाडी मार्गी लावणे आवश्यक आहे. पण घेतलेल्या निर्णयांची कार्यवाही होत नसेल तर त्यावर काय सांगावे.
स्व. मनोहर पर्रीकर यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात इफ्फी गोव्यात आणला. इफ्फीला येथे हक्काचे घर दिले. इफ्फीचा भल्या मोठ्या शून्यातून गोव्यात सुरू झालेल्या प्रवासाचे आम्ही अगदी पहिल्या दिवसापासूनचे साक्षीदार आहोत. कन्व्हेन्शन सेंटर, फिल्म सिटी निर्मिती या गोष्टी पर्रीकर यांच्या काळापासून आम्ही ऐकत आहोत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून घेता आले तर आम्हाला दोन हात पुरणार नाहीत अशी परिस्थिती असतानाही या आघाडीवर एवढी उदासीनता का, हे कळत नाही. केंद्रातील सरकारचा भरभक्कम पाठिंबा असतानाही हे का होते, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जिद्दी आहेत, प्रामाणिक आहेत, त्यांना या उद्योगासाठी ठोस असे काही करायचे आहे, हे त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसते. त्यांना त्यासाठी प्रथम एखादे मोठे पाऊल उचलावे लागेल. गोवा हा प्रदेश जात्याच एक 'फिल्म सिटी' म्हणून जग त्याकडे पाहत असले तरी प्रत्यक्ष फिल्म सिटी येथे उभारणे ही काळाची गरज आहे. गोव्यात फिल्म सिटी उभारण्याकरिता गुंतवणूकदार रांगेत उभे असताना, जागेसाठीही तसा प्रश्न नसताना सरकारने त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. पुढील इफ्फीआधी सरकारने या आघाडीवर एखादे ठोस पाऊल उचलले तर ज्यासाठी इफ्फीचा अट्टाहास केला त्याचे सार्थक झाल्याचे म्हणता येईल. फिल्म सिटी उभारण्याचे जे अगणित फायदे अपेक्षित आहेत ते पाहता गोव्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती केंद्र बनवण्याचा पाया घालणे खूप महत्त्वाचे आहे .
आंतरराष्ट्रीय दर्जाची चित्रपट निर्मिती, पर्यटन आणि इंटरेक्टिव मनोरंजन याचे जागतिक केंद्र अशा संकल्पनेवरच महत्त्वाकांक्षी फिल्म सिटीची उभारणी केल्यास त्याचे अगणित फायदे या छोट्याशा प्रदेशाला होणे शक्य आहे. गोव्याचे परिवर्तन नजीकच्या काळात त्यामुळे होऊ शकेल. मोठ्या प्रमाणावर मनोरंजन परिसंस्था डिझाइन आणि संचलन करण्याच्या क्षेत्रात अनेक दशकांचा अनुभव असलेले हैदराबादच्या जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जलनपूरकर यांनाही गोव्यामध्ये या आघाडीवर अपार क्षमता दिसते. भारताचे पुढील भव्य आणि सर्जनशील आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून गोव्याचा उदय होऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. एकत्रित फिल्म, मनोरंजन आणि अनुभवात्मक गंतव्यांची जगभरातील मागणी झपाट्याने वाढत आहे आणि ते पाहता निसर्ग सौंदर्य, सर्जनशील समुदाय आणि जागतिक आकर्षण या बाबतीत गोव्याला त्याचा अनोखा फायदा होऊ शकतो असे त्यांना वाटते आणि त्यासाठी सर्व ते सहकार्य, समर्थन देण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली आहे. गोवा फिल्म सिटीला पर्यटन, सांस्कृतिक सादरीकरणे आणि जागतिक दर्जाच्या आदरातिथ्याशी जोडणारे एक लँडमार्क केंद्र म्हणून विकसित करून योग्य प्रकारे राबविल्यास, या प्रकल्पातून गोव्याला दीर्घकालीन आर्थिक, सांस्कृतिक आणि रोजगारविषयक लाभ मिळू शकतात. या प्रकल्पामध्ये भारताच्या मनोरंजन क्षेत्राच्या एकूण चित्रात गोव्याचे स्थान नव्याने परिभाषित करण्याची क्षमता निश्चितच आहे. नजीकच्या काळात गोव्यातील भारताचा हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एका वेगळ्याच उंचीवर नेण्यासाठी सरकारला हे मोठे पाऊल उचलावेच लागेल.

- वामन प्रभू
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९