भाजपने गोव्यात विरोधी पक्षांची धूळधाण केल्यानंतरही त्यातून कुठलाच बोध त्यांनी घेतलेला नाही, जिल्हा पंचायत निवडणुकीत एकत्र येण्यासाठी विरोधी पक्ष पुढाकार घेत नाहीत हे यावरून स्पष्ट होते. विरोधक एकत्र नाही आले तर भाजप सहजपणे बाजी मारेल. जिल्हा पंचायत निवडणुकीत आणि पुढेही ती शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. २० डिसेंबरला निवडणूक आणि २२ तारखेला मतमोजणी होणार आहे. मागच्या काही निवडणुकांप्रमाणे यावेळीही आरक्षणाला आव्हान देऊन प्रकरण न्यायालयात गेल्याने जिल्हा पंचायत निवडणुकीची तारीख बदलण्यात आली. आधी १३ डिसेंबर होती, नंतर २० डिसेंबर निश्चित करण्यात आली. पक्षीय स्तरावर आणि विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी जिल्हा पंचायत निवडणूक होत असल्यामुळे सारेच राजकीय पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. आम आदमी पक्षाने आपले २२ उमेदवार जाहीर करून जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचाराला सर्वात प्रथम सुरुवात केली. त्यानंतर गोवा फॉरवर्डने काही ठिकाणी आपले उमेदवार निश्चित करून प्रचार सुरू केला. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून १९ उमेदवार निश्चित केले. काँग्रेसची यादी अद्यापही बाहेर आलेली नाही. यात नवे काय? निवडणूक कुठलीही असली तरी काँग्रेसच्या नशिबातच अंतर्गत वाद, तंटे, बंड आहेत. त्यामुळे यावेळीही काँग्रेस उशिराच उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
मगो पक्ष सरकारमध्ये सहभागी असला तरी, त्याने आपलेही उमेदवार या निवडणुकीत उतरवण्याची तयारी चालवली आहे. आरजीपीनेही वेगवेगळ्या मतदारसंघांत आपले उमेदवार देण्याचे ठरवले आहे. विरोधी पक्षांची युती होण्यावरून वाद सुरू असतानाच विरोधी पक्षातील आप आणि गोवा फॉरवर्ड हे दोन्ही पक्ष उमेदवार जाहीर करत आहेत आणि प्रचारही करत आहेत. काँग्रेस आणि आरजीपीचे उमेदवार अजून जाहीर व्हायचे आहेत, त्यामुळे विरोधकांची युती यावेळी होण्याची शक्यता कमी आहे असेच दिसते. सगळेच स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विरोधक एकत्र आले नाहीत तर त्याचा मोठा फायदा भाजपला होऊ शकतो. गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीतही भाजपनेच बाजी मारली होती. यावेळीही विरोधक एकसंध राहिले नाहीत, तर भाजपला निवडणूक फारच सोपी जाऊ शकते. भाजपने आपला मित्र पक्ष असलेल्या मगोलाही युतीविषयी न विचारता आपले उमेदवार जाहीर केल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये सध्या तणाव धुमसत आहे. पण फक्त त्याचा स्फोट झालेला नाही. भाजपसोबत सत्तेत असलेल्या अपक्ष आमदारांना त्यांचे उमेदवार देण्यासाठी संधी असेल असे भाजपने म्हटले असले, तरी मगोच्या ताब्यातील कुर्टी आणि अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या डिचोलीतील लाटंबार्से मतदारसंघांत भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. एकूणच भाजप ‘एकला चलो रे’च्या तयारीतच आहे असे दिसते. २०२७ मध्येही तीच चाल चालण्याच्या तयारीला भाजप लागला आहे का, असा प्रश्न सत्तेत सहभागी असलेल्या अपक्ष आणि मगोला पडला असेल. पण भाजप आपल्या मित्रपक्षांनाच सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढणार, असे दिसण्यालाही काही प्रमाणात वाव आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मगोला तीन जागा देतानाच काही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याचेही जाहीर केले आहे. कुडतरी, कुठ्ठाळी मतदारसंघांसह सासष्टीत काही भागातील अपक्ष उमेदवारांना जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप पाठिंबा देणार आहे. मित्रपक्षांशी वैर घेऊन किंवा त्यांना दुखवून चालणार नाही, याची जाणीव कदाचित भाजपला असेल. कुर्टी, लाटंबार्सेनंतर पुढे भाजप काय करतो, त्याकडे त्यांच्या मित्रपक्षांच्याही नजरा आहेत. पण २०२७ मध्ये पुन्हा सत्ता मिळवायची असेल, तर सोबत असलेल्या सर्वांना खूश ठेवण्यातच फायदा आहे याचीही जाणीव भाजपला असेल.
भाजप दोन दिवसांत आपले सर्व उमेदवार जाहीर करेल, पण अद्याप विरोधी पक्षांचे उमेदवार निश्चित होत नाहीत. विरोधकांची युती यावेळी जिल्हा पंचायत निवडणुकीत झाली नाही तर २०२७ मध्ये ती होण्याची शक्यता कमी आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी म्हणून विरोधकांनी एकत्र येणे आवश्यक होते. पण काही अदृश्य राजकीय शक्ती विरोधकांना एकमेकांपासून दूर ठेवत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधक एकत्र आल्यास भाजपला त्याचा सर्वांत मोठा फटका बसू शकतो. या गोष्टींची जाणीव विरोधी पक्षांना नाही, हे आश्चर्यच आहे. विरोधी गटात सारेच प्रशांत किशोर होण्यासाठी धडपडत आहेत. प्रशांत किशोरच्या हाती बिहारमध्ये काय आले, याचाही अभ्यास त्यांनी करायला हवा. भाजपने गोव्यात विरोधी पक्षांची धूळधाण केल्यानंतरही त्यातून कुठलाच बोध त्यांनी घेतलेला नाही, जिल्हा पंचायत निवडणुकीत एकत्र येण्यासाठी विरोधी पक्ष पुढाकार घेत नाहीत हे यावरून स्पष्ट होते. विरोधक एकत्र नाही आले तर भाजप सहजपणे बाजी मारेल. जिल्हा पंचायत निवडणुकीत आणि पुढेही ती शक्यता नाकारता येत नाही.