पुतळ्याचे काम पूर्ण झाले, आता त्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झाल्यानंतर मठ परिसरात पुढील दोन महिन्यांत रामायणावर आधारित थीम पार्क उभारण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच गोव्यातील मागास असलेल्या काणकोण तालुक्यालाही नव्या अर्थाने अध्यात्म केंद्र होण्याची संधी मिळणार आहे.

गोवा ही खऱ्या अर्थाने देवभूमी आहे. इथल्या मातीतच सातेरीचा अधिवास आहे. देशातील इतर ठिकाणी नसतील इतकी विविध समाजांची देवस्थाने गोव्यात आहेत. देव-देवींच्या मंदिरांनी पवित्र असलेली गोमंतभूमी नेहमीच श्रद्धेने भारलेली असते. सातेरी, केळबाई, शांतादुर्गा, मंगेश, नागेश, महालसा, कामाक्षी, वेतोबा, आजोबा, मल्लिकार्जुन, लईराई, मोरजाई, कालिका, शर्वाणी, रुद्रेश्वर, महालक्ष्मी, विजयदुर्गा, श्री विठ्ठल, श्री राम, देवकीकृष्ण, महादेव, भूमिका, चंद्रेश्वर, फातर्पेकरीण, कुंकळ्ळीकरीण, बाळ्ळीकरीण अशा शेकडो देवांचे स्थान म्हणून गोव्याची ख्याती आहे. जगाच्या नकाशावर समुद्र किनाऱ्यांमुळे प्रसिद्ध असलेला गोवा हा भारताच्या नकाशावर हिंदूंची मंदिरे आणि ख्रिस्ती धर्मीयांच्या चर्चेसमुळे प्रसिद्ध आहे. देशातील इतर भागांत देवस्थानांचे जसे अर्थकारण पाहून लोकांनी धार्मिक स्थळांचे व्यावसायीकरण केले, तशा प्रकारचे व्यावसायीकरण गोव्यात झालेले नाही हे विशेष. गोव्यातील कोणत्याही मंदिरात देवाचे कुठल्याही दिवशी, शांतपणे, मनसोक्त डोळे भरून 'याची देही, याची डोळा' दर्शन घेता येते. पोर्तुगीज काळात जेव्हा धर्मांतराचे वारे वाहत होते त्याही काळात गोव्यातील लोकांनी देवतांना सुरक्षित ठेवले. पोर्तुगीजांनी मंदिरे उद्ध्वस्त केली, पण गोव्यातील भाविकांनी वेगवेगळ्या मार्गांनी देवतांना सुरक्षित ठेवले, अशा अनेक कथा गोव्यात नेहमी ऐकायला मिळतात. वेगवेगळ्या समाजाच्या कुलदेवतांचे माहेरघर म्हणून गोव्याचा उल्लेख केला, तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. शेकडो देवस्थाने गोव्याच्या भूमीत असल्यामुळे रोज कुठल्या ना कुठल्या देवस्थानामध्ये एखादा उत्सव साजरा होत असतो. अशा या पवित्र भूमीत वेगवेगळ्या समाजांचे, संप्रदायांचे मठाधीश आहेत आणि त्यांचे मठही गोव्यात चांगल्या संख्येने आहेत. गोव्याचे पावित्र्य जपण्याचे आध्यात्मिक कार्य या सर्वांकडून सुरू असते. गोव्यातील संप्रदायांचा शिष्यवर्गही देशभर आहे.
मंदिरांमुळे गोव्याची देवभूमी म्हणून असलेली ओळख पुढे मठांच्या आणि संप्रदायांच्या कार्यामुळे आध्यात्मिक भूमी म्हणून होते. म्हणूनच सरकारही गोव्याला आध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र करण्यासाठीही प्रयत्नशील असते. या अध्यात्माच्या प्रवासात महत्वाचा वाटा उचलतात, ते इथले मठ आणि त्यांच्या परंपरा. अशाच प्रवासात आता भर पडत आहे श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ मठाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रभू श्री रामांच्या भव्य ७७ फुटी उंच कांस्य पुतळ्याची. मठाच्या ५५० व्या वर्षपूर्ती निमित्ताने सुरू असलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मठात सध्या ५५० वर्षपूर्तीचा उत्सव सुरू असून या निमित्ताने काणकोणात श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या परिसरात पुढील दहा दिवसांत दीड ते दोन लाख भाविक हजेरी लावू शकतात. यामुळे गोव्यातील आध्यात्मिक पर्यटनाला प्रभू श्री रामांच्या पुतळ्याच्या अनावरणाने सुरुवात होणार आहे. काणकोणचेच नव्हे, तर गोव्यातील पर्यटनाचे नवे पर्व या निमित्ताने सुरू होणार आहे.
गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या काठावर उभारलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ५९७ फुटी पुतळ्यामुळे तिथे पर्यटनाला चालना मिळाली. पण अनेक राज्यांमध्ये देवतांचे मोठे पुतळे आता आकर्षणाचे केंद्र बनत आहेत. कोईंबत्तूर येथे उभारलेला आदियोगी पुतळ्यामुळे तिथे आध्यात्मिक पर्यटनात वाढ झाली. राजस्थानमधील नाथद्वारा येथे श्रद्धेचा पुतळा म्हणून प्रसिद्ध असलेला भगवान शंकराचा पुतळाही प्रसिद्ध आहे. कर्नाटकात मुर्डेश्वरमधील शिवाचा पुतळा आणि बडोदा येथे असलेला शिवाचा पुतळा या सर्वांमुळे त्या परिसरात पर्यटनाचा वाव मिळाला आणि स्थानिक रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या. गोव्यातील पर्तगाळ मठाच्या परिसरात उभारलेला प्रभू श्री रामाचा पुतळाही गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणार आहे, यात शंका नाही. पुतळ्याचे काम पूर्ण झाले, आता त्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झाल्यानंतर मठ परिसरात पुढील दोन महिन्यांत रामायणावर आधारित थीम पार्क उभारण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच गोव्यातील मागास असलेल्या काणकोण तालुक्यालाही नव्या अर्थाने अध्यात्म केंद्र होण्याची संधी मिळणार आहे. पर्यटनामुळे स्थानिक क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, शिवाय काणकोण तालुक्यातील इतर मंदिरांच्या भेटीसाठीही पर्यटकांना संधी मिळू शकेल. काणकोण तालुक्यातील किनारे प्रसिद्ध असले तरी अंतर्गत पर्यटनाला या निमित्ताने नव्याने सुरुवात होईल. काणकोणसाठीच नव्हे तर गोव्यासाठी हा उपक्रम फायद्याचा ठरणार आहे.