
नेमेचि येतो पावसाळा उक्तीप्रमाणे यंदाही इफ्फी सुरू झाला आहे. यंदाच्या इफ्फीची सुरुवात सालाबादप्रमाणे श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे न होता जुने गोमेकॉ परिसरात झाली. केंद्रीय खात्याकडून यंदाचा उद्घाटन सोहळा खुल्या आवारातील घेण्याबाबत विचारणा झाली होती. यानुसार हा बदल करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. यंदा उद्घाटन सोहळ्याला सिने तारकांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे काही जणांचा हिरमोड झाला असेल. मात्र ही कमतरता समारोप सोहळ्यामध्ये भरून निघेल अशी आशा.
इफ्फीच्या सुरुवातीला यंदाही चित्रपट निवडीवरून वाद झालेच. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला चित्रपटाची इफ्फीमध्ये निवड न झाल्याने एकूणच निवड प्रक्रियेवर गंभीर आरोप करण्यात आले. अर्थात आयोजकांनी याला काहीही उत्तर दिले नाही. कदाचित इफ्फीचे निकष वेगळे असू शकतात. यंदा महोत्सवातील चित्रपटांची निवड अनेक रसिकांना फारशी पसंत पडली नाही. मात्र मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रचारकी भारतीय चित्रपट कमी होते. असे असले तरी अशा चित्रपटांची जागा आंतरराष्ट्रीय चित्रपटांनी घेतल्याचे अनेकांचे मत आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही चित्रपटाची तिकिटे न मिळणे, अॅप बंद पडणे, बुकिंग करूनही रांगेत थांबावे लागणे, स्वयंसेवकांची मदत करण्यापेक्षा मला काय त्याचे ही मनोवृत्ती आदी कायम होते. यंदा मास्टरक्लासही असेच कंटाळवाणे झाले. इफ्फीला भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ व्यक्ती मिळाल्या नसाव्यात. म्हणूनच कदाचित ठराविक व्यक्तींना पुन्हा पुन्हा बोलवण्यात आले. एआय, व्हीएफएक्स अशा विषयांवर चार सत्र घेण्यात आली. यामध्ये बोलणारे तज्ज्ञ देखील तेच. एका ज्येष्ठ व्यक्तीला मुलाखत घेण्यासाठी बोलवले होते, ती व्यक्ती समोरच्याला बोलू न देता आपलेच अनुभव सांगत राहिली.
यावेळी मास्टर क्लासमधील विषय महत्त्वाचे असले तरी चित्रपटसृष्टीशी निगडीत अन्य विषयदेखील निवडता आले असते. यंदा प्रथेप्रमाणे मास्टर क्लासमध्ये देखील आलेल्या तज्ज्ञांनी आपल्या येऊ घातलेल्या प्रकल्पांची, चित्रपटांची जाहिरातबाजी केली. मागील काही वर्षात इफ्फीचे झपाट्याने व्यावसायिकीकरण झाले आहे. मात्र यामध्ये खऱ्या चित्रपट रसिकांची निराशा होत आहे. यामुळेच कदाचित मागील काही वर्षात इफ्फीला येणाऱ्या प्रतिनिधींची संख्या कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची संख्या तर त्याहून कमी आहे. आयोजकांनी हा महोत्सव सुरू करण्याचा हेतू काय होता हे पुन्हा एकदा पाहून समतोल राखणे आवश्यक आहे.
पिनाक कल्लोळी