पोलिसांचे यश

बायणा-वास्को येथील दरोड्यानंतर गोवा पोलिसांना गुन्हेगार सापडत नाहीत म्हणून जनतेतूनही टीका होत होती. आता गोवा पोलिसांना दोन प्रकरणात यश आले आहे. तपासकार्य गांभीर्याने घेऊन पोलिसांनी काम केले, तर गुन्हे नियंत्रणात येतील आणि गुन्हेगारही सापडतील.

Story: संपादकीय |
15 hours ago
पोलिसांचे यश

गेल्या सात महिन्यांपासून गोव्यात सतत पडणारे दरोडे आणि मोठ्या चोऱ्या यामुळे पोलिसांची झोप उडाली. पण त्यांच्या हातीही काही लागत नव्हते. अखेर बायणा-वास्को येथील दरोड्यातील संशयितांना मुंबईत अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे किमान एका तरी दरोड्यातील संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. जुने गोवा पोलिसांनी अन्य एका सराईत गुन्हेगाराला कर्नाटकातून अटक केली आहे. त्या चोराचे कारनामे गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकात प्रसिद्ध आहेत. शंभरपेक्षा जास्त चोऱ्या त्याने आतापर्यंत केल्या आहेत. त्यामुळे दोन प्रकरणातील संशयित आरोपींना एकाच वेळी अटक झाल्यामुळे पोलिसांना तेवढाच दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांची बरीच नाचक्की झाली होती. सरकारने गेल्या आठवड्यात तातडीने सुमारे ३५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. काही उपअधीक्षक बदलले, तर उत्तर गोवा अधीक्षकपदी गोमंतकीय अधिकाऱ्याला आणण्यात आले. तरीही आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. एकाच दिवशी पोलिसांनी दोन चांगल्या कामगिरी केल्या आहेत. आता अन्य दोन दरोड्यातील आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. बायणा दरोडा प्रकरणी जी टोळी पकडली आहे, त्याबाबत पोलीस जेव्हा सविस्तर माहिती देतील त्यानंतरच तपशील समोर येईल. इतर दरोड्यांतील गुन्हेगार पकडण्याचे आणि एकूणच गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहेच. 

दोना पावला येथील धेंपो विस्ता बंगल्यावरील दरोड्यानंतर म्हापशातील गणेशपुरी परिसरातील डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावर दरोडा पडला. त्यानंतर सांताक्रूझ परिसरात मोठी चोरी झाली. त्यानंतर बायणा-वास्को येथे नायक कुटुंबियांच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये मोठा दरोडा पडला. या साऱ्या प्रकरणांतील आरोपी पोलिसांना चकवा देत होते. धेंपो विस्ता बंगल्यावरील दरोड्यातील एकाही संशयिताला पोलीस पकडू शकले नव्हते. मात्र डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावरील दरोड्यातील तपासावेळी माग काढताना पोलिसांना काही संशयित सापडले, ज्यांनी दरोडेखोरांना गोव्यात दरोडे घालण्यासाठी मदत केली होती. म्हणजे हे संशयित दोना पावला दरोड्यानंतरही गोव्यात होते, पण ते पोलिसांना सापडले नव्हते. कदाचित त्या दरोड्यावेळी पोलिसांनी तपासही गांभीर्याने केला नसावा. दोना पावला आणि गणेशपुरी दरोड्यातील चोर एकच होते, हेही पोलिसांना ते चोर बांगलादेशात पळून गेल्यानंतर लक्षात आले. गोव्यात दरोडा घालण्यासाठी बांगलादेशातून दरोडेखोर येतात ही विचित्र वाटणारी गोष्ट असली, तरी हे प्रकार खरे आहेत. म्हणजे या विदेशी टोळ्या फक्त गोव्यातच दरोडे घालण्यासाठी येत आहेत हे विशेष. २०२२ मध्ये देशात एटीएम फोडण्याच्या अनेक घटना देशात घडल्या होत्या. त्यावेळी गोव्यातही दोन एटीएम फोडण्याचे प्रकार घडले होते. त्यातही बांगलादेशातील टोळीचा सहभाग होता. ओडिशा, आंध्रप्रदेश, गोवा, कर्नाटक अशा राज्यांमधील एटीएम फोडून ही टोळी बांगलादेशात पसार झाली होती. आता पुन्हा बांगलादेशातील टोळ्या काही महिन्यांच्या अंतराने भारतात येऊन दरोडे घालत आहेत. गोव्यात सध्या दोन दरोड्यातील आरोपी बांगलादेशी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे २०२२ मधील टोळीच सक्रिय झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही. गोव्यातील दोन दरोड्यांमध्ये बांगलादेशातील चोर होते, असे पोलिसांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे बायणा-वास्को येथील दरोड्यातील जे संशयित पकडले आहेत, ते ओडिशातील आहेत असे पोलिसांचे म्हणणे आहे. अधिक चौकशीनंतरच त्यांचा गोव्यातील इतर दरोड्यांमध्ये हात होता का किंवा अन्य चोऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता का, ते उघड होईल. त्यासाठी सखोल चौकशीची गरज आहे. 

बायणा-वास्को येथील दरोड्यानंतर गोवा पोलिसांना गुन्हेगार सापडत नाहीत म्हणून जनतेतूनही टीका होत होती. सांताक्रूझ परिसरात एका घरात २५ लाखांची चोरी झाली होती. या चोरीतील आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे आणि त्याने गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात शंभरपेक्षा जास्त चोऱ्या केल्या आहेत. विशेष म्हणजे तिन्ही राज्यांतील पोलिसांनी त्याला अनेकदा पकडले आहे. पण तो सुटतो आणि पुन्हा चोरी करतो. अशा लोकांना शिक्षा करण्यासाठी पोलिसांनी गांभीर्याने प्रकरण न्यायालयात मांडायला हवे. समाजात धोका निर्माण करणाऱ्या अशा चोरांचा कायमचा बंदोबस्त व्हायला हवा. गोवा पोलिसांना दोन प्रकरणात यश आले आहे. तपासकार्य गांभीर्याने घेऊन पोलिसांनी काम केले, तर गुन्हे नियंत्रणात येतील आणि गुन्हेगारही सापडतील. त्यासाठी पोलिसांनी आत्मपरीक्षण करून आपण कुठे कमी पडतो त्याचा विचार करायला हवा.